
‘पीओपी’ मूर्तींच्या बंदीसंदर्भात पालिकेत बैठक
पुणे, ता. ६ : गणेशोत्सव अवघ्या काही आठवड्यांवर आलेला असताना पुणे महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींच्या विक्रीबाबतचा संभ्रम कायम आहे. यावर स्पष्टता येण्यासाठी व या निर्णयाची अंमलबजावणी कशी पद्धतीने केली जावी, यासाठी सोमवारी (ता. ८) महापालिकेत बैठक होणार आहे.
गणेशोत्सवात घरोघरी श्री गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. पुणे शहरात ही संख्या दीड लाखाच्या पुढे आहे. यामध्ये बहुतांश प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची विक्री केली जाते. या मूर्त्या आकर्षक असतात, पण त्यावर वापरलेला रंग आणि पीओपीमुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो. विसर्जनाच्यावेळी जलप्रदूषण होते. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण महामंडळाने पालिकेस दोन महिन्यांपूर्वीच आदेश पाठवून पीओपीच्या गणेशमूर्ती विक्रीला बंदी घातली असल्याचे स्पष्ट केले. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी करण्यावरून गोंधळ असल्याने अद्याप बंदीच्या कार्यवाहीबाबत धोरण निश्चित झालेले नाही.
महापालिकेने याबाबत प्रदूषण नियंत्रण महामंडळाला पत्र पाठवून पीओपीच्या बंदीची अंमलबजावणी कशी करावी याबाबत मार्गदर्शन मागवले होते. कारवाई करताना मूर्तीचे पावित्र्य राखणे, विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाईसाठी रक्कम किती असावी, गुन्हे कोणत्या स्वरूपाचे दाखल करावेत याबाबत स्पष्टता येणे आवश्यक आहे. पण अद्यापपर्यंत पालिकेस कोणत्याही सूचना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे या संदर्भात घनकचरा विभाग, पर्यावरण विभाग आणि प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांची सोमवारी महापालिकेत बैठक होणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d87526 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..