
ट्रकच्या धडकेत जवानसह सहप्रवाशाचा मृत्यू
पुणे, ता. ६ ः पालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार लष्करातील जवानासह त्यांचा सहप्रवासी मृत्यू पावले आहेत. पुणे-सोलापूर रस्त्यावरील रेसकोर्स परिसरातील टर्फ क्लब येथे शुक्रवारी दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. हनुमंत काळे (वय ४३), दत्ता काळे (वय ४०, दोघे रा. आढळगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) अशी मृतांची नावे आहेत. तर इसरार अहमद मोहम्मद इलियास शेख (वय ४०, रा. शिवाजीनगर) असे अटकेतील ट्रक चालकाचे नाव आहे.
दुचाकीस्वार हनुमंत काळे हे लष्करात कार्यरत होते. सध्या ते सुटीनिमित्त नगरमधील आढळगाव येथे आले होते. दरम्यान, सुटीनंतर ते उत्तराखंडात कर्तव्यावर रुजू होणार होते, त्यासाठी ते त्यांचे नातेवाईक दत्ता काळे यांच्यासमवेत पुण्यात तिकीट बुकिंगसाठी आले होते. पुणे-सोलापूर रस्त्यावरून दोघेजण शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास जात होते. या वेळी ते टर्फ क्लब चौकात आले असताना मागून आलेला पालिकेच्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ट्रकने दुचाकी रस्ता दुभाजकास घासून काही अंतरापर्यंत फरफटत नेली. त्यामुळे या अपघातात जवानासह सहप्रवासीही गंभीर जखमी झाला. पोलिसांनी दोघांनाही तात्काळ ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक शिवाजी बुनगे या घटनेचा तपास करत आहेत. पोलिस कर्मचारी राजाराम कलजी यांनी याप्रकरणी वानवडी पोलिसात फिर्याद दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d87572 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..