
पुणेकरांनो, महापालिकेला कामे सुचविण्याची संधी; असा करा अर्ज
पुणे - पुणे महापालिकेच्या आगामी २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात नागरिकांना त्यांच्या भागातील कामे सुचविण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. रस्ता, पाणी पुरवठा, सांडपाणी व्यवस्था, बस थांबे यासह इतर कामे सुचविता येणार आहेत.
पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक तयार करताना अधिकारी, नगरसेवक त्यांना आवश्यक वाटणाऱ्या कामांचा समावेश त्यात करतात, त्या कामासाठी पुरेशी तरतुदी देखील उपलब्ध करून दिली जाते. पण नागरिकांनाही या अंदाजपत्रकात तरतूद करून घेण्याची संधी २००६-०७ पासून दिली जात आहे.त्यानुसार आगामी वर्षाच्या अंदाजपत्रकासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे.
नागरिकांची कामे समाविष्ट करून घेताना एका नागरिकास ५ लाखापर्यंतचे काम सुचविता येतील, तर एका प्रभागात ७५ लाखापर्यंतची (तीन सदस्यांचा प्रभाग प्रमाणे) कामासाठीची तरतूद करता येणार आहे. यामध्ये रस्ते डांबरीकरण करणे, पाणी पुरवठ्याची व्यवस्था करणे, सांडपाणी व्यवस्था करणे, बस थांबे उभारणे, शाळा, विद्युत व्यवस्था, सीसीटीव्ही, वाहतूक नियंत्रण व्यवस्था, चेंबर-जाळी दुरुस्ती, अग्निशामक यंत्रणा, रंगकाम, विरंगुळा केंद्र, उद्यान, स्मशानभूमी, पादचारी मार्ग, इमारतीचे रंगकाम,स्वच्छतागृह, दवाखाने, ओपन जिम, पुरातन वास्तू संवर्धन आदी कामे नागरिकांना सुचविता येणार आहे. ही कामे ठरवून दिलेल्या नमुन्यात १ सप्टेंबर २०२२ पर्यंत सादर करायचे आहेत. त्यानंतर संबंधित क्षेत्रीय कार्यालयामार्फत प्रभाग समितीच्या मान्यतेने १० ऑक्टोबर पर्यंत महापालिका आयुक्तांना सादर करायची आहे.
याबाबतची अधिक माहिती व अर्जाचा नमुना www.punecorporation.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.
या कामांचा विचार नाही...
गतिरोधक बसविणे, पादचारी पूल उभारणे, खासगी जागेवर बांधकाम करणे, कर्मचारी नियुक्ती, मनुष्यबळ पुरविणे अशा कामांचा विचार यामध्ये केला जाणार नाही. नागरिकांनी जी काही कामे सुचविले असतील त्यांची तांत्रिक व कायदेशीर बाबींची छाननी करून, प्राधान्यक्रम ठरवून अंदाजपत्रकात समावेश केला जाणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d87574 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..