महापालिका : पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती निवडणूक प्रक्रिया थांबविण्याचे आयोगाचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिका : पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती 
निवडणूक प्रक्रिया थांबविण्याचे आयोगाचे आदेश
महापालिका : पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती निवडणूक प्रक्रिया थांबविण्याचे आयोगाचे आदेश

महापालिका : पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती निवडणूक प्रक्रिया थांबविण्याचे आयोगाचे आदेश

sakal_logo
By

पुणे, ता. ७ : चार सदस्यांचा एक प्रभाग आणि सदस्य संख्येत बदल करण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आगामी महापालिका निवडणुकीसाठी आतापर्यंत राबविण्यात आलेली सर्व प्रक्रिया पुढील आदेश देईपर्यंत थांबविण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर राज्यातील १४ महापालिकांना दिले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुका पुन्हा एकदा पुढे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या आदेशामुळे अंतिम प्रभागरचना, मतदारयाद्या अंतिम करणे आणि अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीलादेखील स्थगिती दिली. राज्यातील सत्ताबदल झाल्यानंतर शिंदे सरकारने महापालिकेच्या सदस्यसंख्येत कपात करण्याचा निर्णय घेतला. तसेच तीन सदस्यांचा एक प्रभाग अशी रचना करण्याचे आदेश रद्द करीत नव्याने चार सदस्यांचा एक प्रभाग तयार करण्याचा निर्णय घेतला. तसे आदेश चार ऑगस्ट रोजी पुण्यासह १४ महापालिकांना दिले होते. राज्य सरकारने काढलेल्या नव्या आदेशामुळे प्रभागरचनेत बदल होणार आहे. तसेच आरक्षणातही बदल होणार आहे. त्यामुळे सर्व प्रक्रिया नव्याने राबवावी लागणार आहे. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत सर्व प्रक्रिया स्थगिती देण्यात येत असल्याचे कुरुंदकर यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

प्रभागरचनेचा पूर्वेतिहास
- ३१ डिसेंबर २०१९ - प्रारूप प्रभागरचना तयार करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे महापालिकेला आदेश.
- आदेशात एक सदस्याचा वॉर्ड करण्याची सूचना
- ३० सप्टेंबर २०२१ - एक ऐवजी तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीचा राज्य सरकारकडून निर्णय
- १ ऑक्टोबर २०२१ - ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षण ठेवण्याचे आदेश
- ५ ऑक्टोबर २०२१ - तीन सदस्यांची प्रभागरचना तयार करण्याचे महापालिकेला आदेश
- २ नोव्हेंबर २०२१ - लोकसंख्या आणि सदस्यसंख्येत राज्य सरकारकडून बदल
- ६ नोव्हेंबर २०२१ - प्रभागरचनेला मुदतवाढ
- ६ डिसेंबर २०२१ - प्रारूप प्रभागरचना महापालिकेकडून आयोगाला सादर
- १५ डिसेंबर २०२१ - आयोगाकडून प्रभागरचनेतील त्रुटी दुरुस्त करून पाठविण्याचे पत्र
- ६ जानेवारी २०२२ - दुरुस्ती करून आयुक्तांकडून प्रारूप प्रभागरचनेचा आराखडा सादर
- २८ जानेवारी २०२२ - प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध करण्यास आयोगाकडून मान्यता
- १ फेब्रुवारी २०२२ पासून हरकती-सूचना दाखल करून घेण्यास मान्यता
- २ मार्च २०२२ - सुनावणी प्रक्रिया करून अंतिम मान्यतेसाठी आयोगाकडे प्रस्ताव सादर
- १३ मे २०२२ - अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध
- १३ जून २०२२ - अनुसूचित जाती, जमाती आणि महिला आरक्षण अंतिम
- २९ जुलै२०२२ - ओबीसी आरक्षण सोडत
- ५ ऑगस्ट २०२२ - ओबीसी आरक्षणाचे गॅझेट अंतिम होणे अपेक्षित.
- परंतु ४ ऑगस्ट २०२२ ला राज्य सरकारकडून निर्णयात बदल, चारचा प्रभाग आणि सदस्यसंख्येत कपात करून त्याचदिवशी निवडणूक आयोगाकडून यापूर्वीच्या प्रभागरचना व आरक्षणासह सर्व प्रक्रियेला स्थगिती.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d87815 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..