‘पार्सल बॉय’ बनला कॅफेचा मालक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पार्सल बॉय’ बनला कॅफेचा मालक
‘पार्सल बॉय’ बनला कॅफेचा मालक

‘पार्सल बॉय’ बनला कॅफेचा मालक

sakal_logo
By

पुणे, ता. १० ः घरची परिस्थिती जेमतेम होती. वडिलांना हातभार लागेल या विचाराने दहावीचे शिक्षण घेताच एका हॉटेलमध्ये पार्सल बॉयची नोकरी धरली. काम केले तरच भविष्यात चांगले दिवस बघता येतील याची जाणीव होती. त्यामुळे पडेल ते काम केले. दिवसा काम आणि रात्री अभ्यास करून ११ वी आणि १२ वीची परीक्षा बाहेरून दिली. स्वतःच्या पायावर उभा राहील तो व्यवसाय उभारूच, असा मनाशी चंग बांधला होता, असे एका चहाची टपरी ते स्वप्नातले स्वतःच्या मालकीचे कॅफे उभारणारे विनोद दत्तात्रय बोत्रे सांगतात.

कमी शिक्षणामुळे कोठेही नोकरी मिळणार नाही. मिळाली तरी, त्या पगारातून घर चालविणे कठीण होईल, याचे भान होते. त्यामुळे आवडत्या हॉटेल कामामधूनच स्वतःचा व्यवसाय उभारावा असा विचार मनामध्ये होता. तसेच एक सुंदर कॅफे असावे असे स्वप्न होते. एका हॉटेलमध्ये काम करताना, घर ते हॉटेलकडे जाणाऱ्या नवी पेठेतील रस्त्यावरील एक टपरी भाड्याने देणार असल्याचे समजले. त्यानंतर आई-वडिलांचा सल्ला घेत वयाच्या २८ व्या वर्षी एक जानेवारी २०१० पासून चहाची टपरी सुरू करण्याचा निर्णय घेतला, असे विनोद यांनी सांगितले.

विनोद सांगतात, की हॉटेलमध्ये काम करताना कामगारांना चहा मागविला जात असे, त्यावेळी त्या चहाचा आस्वाद सर्वजण आनंदाने घेत. त्यातूनच चहाचा व्यवसाय उभारण्याची कल्पना सुचली. कोणताही व्यवसाय करायचा असेल, तर त्यासाठी त्या कामाचा अनुभव लागतो. असे माझे गुरू जवाहर चोरगे सांगत, त्यांनी काम शिकवण्यासोबतच उत्तम संस्कार केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच चहाच्या व्यवसायाची कल्पना साकार करता आली.

स्वामी समर्थांची घरात मनोभावे पूजा केली जाते. त्यांच्यावरील विश्वास आणि कष्ट करण्याच्या तयारीमुळे प्रामाणिकपणे व्यवसाय करतो. स्वामींची आणि आई-वडिलांच्या शिकवणीमुळे माणसे जोडण्याची कला अवगत आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळेच कॅफेला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे विनोद सांगतात.

...अन् आनंदाश्रू तरळले
आई, वडील, भाऊ आणि पत्नी यांची जबाबदारी आहे. चहाच्या टपरीतून महिन्याला तीन ते चार लाखांची आर्थिक उलाढाल होत होती. तर आता कॅफेतून पाच ते सहा लाखांहून अधिक रुपयांची आर्थिक उलाढाल होत आहे. कोणतेही व्यसन नाही, व्यवसायाची ठरलेली वेळ पाळणे आणि मेहनत करणे या जोरावर घरची परिस्थिती सुधारली. किती काळ भाड्याच्या टपरीत व्यवसाय करणार? असा विचार येत होता. त्यामुळे स्वतःचे दुकान असावे असे वाटत होते. नवी पेठेतील चांगल्या ठिकाणी एक दुकान विक्रीसाठी असल्याची माहिती मिळाली. हाताशी पैसे असल्याने लहान भाऊ सागरला सोबत घेत दुकानाचा व्यवहार केला आणि स्वप्नातले कॅफे उभारले, असे सांगताना विनोद यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

‘‘गेल्या काही वर्षात चहाला चांगले दिवस आले आहेत. मोठ्या फ्रेंचाइजी बाजारात दाखल झाल्या. याचा आमच्यासारख्या व्यावसायिकांवर चांगला परिणाम झाला. सध्या समाजात चहा व्यवसायिकांना मान मिळत आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी फ्रेंचाइजी विकत घेण्याचा ट्रेंड असला, तरी स्वतःचा ब्रँड बनवता आला पाहिजे. तो कष्टातूनच उभा राहिला, तर नक्कीच दीर्घकाळ टिकून राहील.’’
- विनोद बोत्रे

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d88861 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..