निवड समिती सदस्यांकडून दुजाभाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवड समिती सदस्यांकडून दुजाभाव
निवड समिती सदस्यांकडून दुजाभाव

निवड समिती सदस्यांकडून दुजाभाव

sakal_logo
By

पुणे, ता. १० ः राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणि वरिष्ठ राष्ट्रीय जलतरण स्पर्धेच्या निवड चाचणीत निवड समिती सदस्यांनी दुजाभाव केल्याचा आरोप जलतरणपटू मिहीर आंब्रे याने केला आहे. आजारी असताना सवलत देण्याचा नियम असतानाही माझ्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले, मात्र इतर काही खेळाडूंना तोच नियम लावत सवलत देण्यात आली, असे मिहीर याने सांगितले.

‘‘राष्ट्रीय स्पर्धांसाठीच्या महाराष्ट्र संघाच्या निवड चाचणीचे आयोजन ठाणे येथे करण्यात आले होते. स्वीमिंग फेडरेशन ऑफ इंडियाने नेमलेल्या निवड समितीद्वारे ही चाचणी घेण्यात आली. या काळात मी आजारी असल्याने निवड चाचणीतून सवलत देण्याची मागणी केली. निवड चाचणीच्या तीन महिन्यांपूर्वी ‘फिना’ची मान्यता असलेल्या स्पर्धेत भाग घेतला असल्यास त्या स्पर्धेतील कालावधी निवड चाचणीत ग्राह्य धरला जाऊ शकतो, असे चाचणीसाठीच्या पत्रकात नमूद केले होते. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वीच ‘फिना’ची मान्यता असलेल्या सिंगापूर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेतला माझा कालावधी या चाचणीसाठी ग्राह्य धरला जावा, अशी विनंती मी एका निवड समिती सदस्याला केली. इतर दोन स्पर्धकांबाबत हा कालावधी ग्राह्य धरण्यात आला, मात्र वैद्यकीय कारण असूनही माझी मागणी फेटाळून लावण्यात आली’’, असे मिहीर याने सांगितले.

‘पहिल्या दिवशी शंभर मीटर बटरफ्लाय प्रकारात मी आजारी असल्याने पूर्ण क्षमतेइतका खेळ करू शकलो नाही. कालावधी सुधारण्यासाठी अजून एकदा प्रयत्न करण्याची संधी द्यावी, अशी विनंती केली. पण ती फेटाळण्यात आली. त्यानंतर निवड समितीत असलेल्या वीरधवल खाडे, कुशल रॉय, राजू पालकर आणि नीता तळवलीकर या सर्व सदस्यांना इमेलवरद्वारे विनंती करूनही काहीही प्रतिसाद मिळाला नाही. समितीचे नियम प्रत्येक स्पर्धकासाठी वेगळे आहेत का’, असा प्रश्न मिहीर याने विचारला आहे.

‘नियमांनुसारच चाचणी घेतली’

या आरोपांबाबत निवड समिती सदस्य नीता तळवलीकर म्हणाल्या, ‘‘निवड चाचणी नियमांनुसारच घेण्यात आली आहे. कोणत्याही स्पर्धकाला दोन संधी देण्याची तरतूद नियमांमध्ये नाही. तसेच, जर स्पर्धक आजारी असल्यास त्याने तसे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करायला हवे आणि कोणत्याच प्रकारात भाग घेऊ नये. मिहीर याने एका प्रकारात भाग घेतल्यानंतर आजारपणासाठीची सवलत देण्याची विनंती केली. सदर खेळादरम्यान तो आजारी पडला असल्यास निरीक्षकाला तसे सांगायला हवे. यातील काहीही न झाल्याने त्याची विनंती मान्य करण्यात आली नाही.’’

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d88902 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..