संस्कृतसाठी कार्यरत संस्थांपुढे नवे आव्हान, नवी संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संस्कृतसाठी कार्यरत संस्थांपुढे नवे आव्हान, नवी संधी
संस्कृतसाठी कार्यरत संस्थांपुढे नवे आव्हान, नवी संधी

संस्कृतसाठी कार्यरत संस्थांपुढे नवे आव्हान, नवी संधी

sakal_logo
By

दरवर्षी श्रावण पौर्णिमेला वैश्विक संस्कृत दिवस साजरा केला जातो. यंदा पौर्णिमा काल व आज, अशी दोन दिवस असल्याने तो आज साजरा केला जात आहे. यानिमित्ताने पुण्यातील संस्कृत साहित्याचे जतन, अध्ययन, अध्यापन, संशोधन आदींसाठी योगदान देणाऱ्या प्रातिनिधिक संस्थांमधील तज्ज्ञांची मनोगते जाणून घेऊया.
- नीला शर्मा

डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद जोशी म्हणाले, ‘‘जगातील सर्वाधिक प्राचीन भाषांपैकी एक म्हणून संस्कृतची ओळख आहे. या भाषेचा विशाल कोश प्रकल्प आमच्याकडे साकारला जात आहे. आपल्या देशातीलच नव्हे तर परदेशी अभ्यासकांनाही पुरातन भारतीय इतिहास व संस्कृतीबाबत जिज्ञासा असते. वेदकाळापासून ते अठराव्या शतकापर्यंत संस्कृतमध्ये सातत्याने साहित्याचा प्रवाह दिसून येतो. हा खजिना कोणत्याही अभ्यासकासाठी महत्त्वाचे संसाधन ठरणारा आहे. केंद्र शासनाच्या नव्याने येऊ घातलेल्या शैक्षणिक धोरणात आपल्याकडील प्राचीन विद्यांवर भर दिलेला आहे. या अंतर्गत संस्कृतला उत्तेजन देण्यासाठी विशेष उपक्रम राबविले जातील. संस्कृतसाठी कार्यरत शैक्षणिक संस्थांना हे आव्हान तर आहेच, पण ही सुवर्णसंधीही आहे. संस्कृतच्या जतन व संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थांची संख्या अगदीच मोजकी आहे. अपेक्षित कार्यपट फार मोठा असल्याने यासाठी जास्त संस्थांची आवश्यकता आहे. संस्कृत भाषेतून उच्च व उच्चतर शिक्षणासाठी वाव आहे. यासाठीही संबंधित संस्थांनी तयार राहायला हवे.’’
केंद्र शासनाच्या नव्या धोरणाचा लाभ संस्कृतच्या माध्यमातून तत्त्वज्ञान, योग, आयुर्वेद आदी अनेक प्राचीन विद्याशाखांना पायाभूत संशोधनासाठी होऊ शकतो. या दृष्टिकोनातून संशोधन संसाधने उपलब्ध करण्यासाठी विविध ग्रंथांचे अनुवाद, सूची, संदर्भग्रंथ तयार करण्याचे आव्हान संस्थांपुढे आहे. अनेक अभ्यासकांना यातून उत्तम काम करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. कोणतेही धोरण अमलात आणण्यासाठी माध्यमे लागतात. संबंधित संस्था या संदर्भात माध्यम असल्याने, अनेक संस्थांना या प्रक्रियेत उर्जितावस्थेला येण्यासाठीही वाव आहे, असेही त्यांनी सांगितले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संस्कृत विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. मुग्धा गाडगीळ म्हणाल्या, ‘‘आमच्याकडे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या रचनेनुसार संस्कृतचा दोन वर्षे कालावधीचा पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे. यात वेद, वेदांत, न्यायमीमांसा, साहित्य व साहित्यशास्त्र यांसारख्या विषयांमध्ये विशेष अभ्यास समाविष्ट असतो. याचप्रमाणे प्राकृत भाषेचा पदव्युत्तर अभ्यासक्रमही आमच्याकडे आहे. प्राचीन भारतीय विद्याशाखांच्या सामाजिक-सांस्कृतिक अभ्यासासाठी संदर्भसाधन म्हणून, संस्कृतप्रमाणेच प्राकृतही गरजेची असते. संस्कृत ही अभिजनांची तर प्राकृत ही जनसामान्यांची भाषा. गेल्या दशकभरात या दोन्हींसाठी आमच्या विभागात विद्यार्थ्यांची संख्या निश्चिततच वाढली आहे. याशिवाय संस्कृत व प्राकृतचे छोटेखानी प्रमाणपत्र अभ्यासक्रमही आम्ही चालवतो. तो नव्याने या भाषा शिकणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, हरियाणा, गुजरात आदी राज्यांमधूनही आमच्याकडे विद्यार्थी येतात. कोरिया, जपान, व्हिएतनाम व इटली, इराण, अफगाणिस्तान आदी देशांमधील विद्यार्थीही आमच्या विभागातून शिकून गेले आहेत.’’
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ या शताब्दी पूर्ण केलेल्या संस्थेच्या संस्कृत विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. अंबरीष खरे यांनी सांगितले की, लोकमान्यांच्या मृत्यूनंतर महात्मा गांधींच्या प्रेरणेने टिमविची स्थापना झाली. संस्कृत विभाग हा येथील सर्वात जुना विभाग. आचार्य लिमये, पं. भागवत गुरुजी यांसारख्या थोर विद्वानांनी या संस्थेत अध्यापन केले. संस्थेच्या कार्यामुळे यथावकाश अभिमत विद्यापीठ म्हणून टिमविला मान्यता मिळाली. (डीम्ड या अर्थाने अभिमत हा शब्दही टिमविनेच रूढ केला). शालेय स्तरावरील संस्कृत परीक्षांपासून पीएचडीपर्यंतचे संस्कृताध्ययन करण्याची सोय टिमविमध्ये आहे. नियमित वर्गांबरोबरच बहिःस्थ पद्धतीनेदेखील काही अभ्यासक्रम राबविले जातात. केवळ महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थीच नव्हे, तर नोकरदार, गृहिणी, उद्योजक, व्यावसायिक आदीही आमच्या संस्थेतून संस्कृतचे शिक्षण घेतात.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d89000 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..