रस्ता ८४ मीटरचाच करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्ता ८४ मीटरचाच करा
रस्ता ८४ मीटरचाच करा

रस्ता ८४ मीटरचाच करा

sakal_logo
By

पुणे, ता. १३ ः कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण रखडल्याने त्यावर मार्ग काढण्यासाठी महापालिकेने ८४ ऐवजी ५० मीटरचा रस्ता पहिल्या टप्प्यात करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, हा रस्ता लहान न करता भूसंपादनाची पूर्ण रक्कम शासनाकडून घेऊन ८४ मीटरचाच रस्ता करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. काही तरी करा, पण नागरिकांची या त्रासातून सुटका करा, अशी भूमिका स्थानिक आमदारांनी घेतली आहे, तर यासंदर्भात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे बैठक लावून निधी मिळविण्याचा प्रयत्न असल्याचे भाजपने सांगितले आहे.

कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाचे उद्‍घाटन होऊन चार वर्ष उलटून गेले, तरी हा प्रकल्प ठप्प झाला आहे. भूसंपादनासाठी रोख रकमेचीच मागणी केली जात असल्याने व महापालिकेची पैसे देण्याची तयारी नाही. यावर तोडगा काढण्यासाठी ५० मीटरचा रस्ता करून त्यासाठी भूसंपादनासाठीचे २८० कोटी शासनाकडून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींसह ‘सकाळ’च्या वाचकांनी त्यांची भूमिका मांडली.

‘‘भूसंपादन झालेले नसताना हा प्रकल्प सुरू केला, त्यामुळे हे काम ठप्प झाले. महापालिकेने ही चूक केली; पण त्याचे परिणाम नागरिक भोगत आहेत. खरेतर हा पूर्ण ८४ मीटरचा रस्ता होणे आवश्‍यक आहे. या भागातील नागरिक चार-पाच वर्षांपासून त्रस्त आहेत. आता किमान ५० मीटरचा तरी रस्ता करून काही प्रमाणात दिलासा दिला पाहिजे. यासाठी विधीमंडळात मुद्दा उपस्थित केला जाईल. तसेच महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेताना स्थानिक आमदार, खासदारांना विचारात घेतले पाहिजे.’’
- चेतन तुपे, आमदार

‘‘मी आमदार असताना या रस्त्याचे काम सुरू झाले, पण भूसंपादनाच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. हा रस्ता लवकर व्हावा यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहेत. शासनाने भूसंपादनासाठी पैसे द्यावेत, यासाठी बैठक घेऊन हा प्रश्‍न मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे.’’
- योगेश टिळेकर, माजी आमदार

‘‘रखडलेले भूसंपादन मार्गी लागण्यासाठी राज्य सरकारची मदत घेतली जाणार, याचा आनंद आहे. पण, पैसे मागायचे असतील; तर ५० ऐवजी ८४ मीटरच्या भूसंपादनासाठी मागावेत, त्यामुळे प्रश्‍न कायमचा सुटेल.’’
- विनोद रांजणे, स्थानिक रहिवासी

‘‘८४ ऐवजी ५० मीटरचा रस्ता केला, तर उर्वरित जागेवर अतिक्रमणे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात रस्ता करणे अवघड होईल. यासाठी आताच पूर्ण रस्ता करावा.’’
- धनंजय आतकरे, स्थानिक रहिवासी

‘‘प्रस्तावित पुरंदर विमानतळाचा प्रकल्प मार्गी लागल्यावर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ताण येणार आहे. त्यामुळे भविष्यात वाढणाऱ्या वाहतुकीचा विचार करून ८४ मीटरचाच रस्ता केला पाहिजे. नाहीतर पुन्हा एकदा हा रस्ता अपुरा पडेल.’’
- योगेश शेलार, स्थानिक रहिवासी

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d89211 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..