वार्षिक पडताळणी प्रक्रिया सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वार्षिक पडताळणी प्रक्रिया सुरू
वार्षिक पडताळणी प्रक्रिया सुरू

वार्षिक पडताळणी प्रक्रिया सुरू

sakal_logo
By

पुणे, ता. १६ ः माजी सैनिक अंशदायी आरोग्यसेवा योजना (ईसीएचएस) विभागाद्वारे आरोग्य योजनांचा लाभ केवळ पात्र असलेल्या लाभार्थ्यांना मिळावा या अनुषंगाने आता वार्षिक पडताळणी प्रक्रियेची सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी माजी सैनिकांनी आपल्या अवलंबितांची योग्य माहिती ईसीएचएस विभागाला पुरविण्याकरिता ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच, माजी सैनिकांनी अवलंबितांची सर्व माहिती कागदपत्रांसह ३१ ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याची मुदत दिली आहे.

ईसीएचएस विभागाद्वारे माजी सैनिक, सैनिकांच्या विधवा आणि त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा पुरविण्यात येत असून अनेकदा या योजनांचा गैरफायदा घेतल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. या योजनांसाठी लाभ घेण्यासाठी माजी सैनिकांच्या अवलंबितांना काही निकष ठेवले असून त्याकरिता नोकरी, लग्न न झाल्याचा पुरावा अशा कागदपत्रांना सादर करण्याची आवश्‍यकता असते. परंतु, या आवश्यक बाबींची माहिती ईसीएचएस विभागाला पुरविण्यात येत नसून आरोग्यसेवांचा लाभ घेण्याचे प्रकार घडत असल्यामुळे ज्या लाभार्थ्यांना आरोग्यसेवांची गरज आहे, त्यांना या योजनांचा लाभ मिळत नाही. परिणामी, या पडताळणी प्रक्रियेच्या माध्यमातून केवळ पात्र लाभार्थ्यांना सेवा सुरू ठेवली जाणार आहे.

पडताळणी प्रक्रियेसाठी माजी सैनिकांना आपल्या पाल्यांचे किंवा आई-वडिलांची योग्य माहिती, कागदपत्रे सादर करणे आवश्‍यक आहे. वेळेत माहिती व कागदपत्रे सादर न केल्यास त्यांच्या सेवा एक नोव्हेंबर २०२२ पासून थांबविण्यात येणार असल्याचे ईसीएचएस विभागाने नमूद केले आहे. वार्षिक पडताळणी प्रक्रियेबाबातच्या अधिक माहितीसाठी लाभार्थ्यांनी echs.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा.

हे आरोग्यसेवांसाठी पात्र नसतील
- माजी सैनिकांची मुले ज्यांचे वय २५ वर्षांच्या पुढे व त्यांचे मासिक उत्पन्न ९ हजारांपेक्षा अधिक
- विवाहीत मुलगा, मुलगी
- आई-वडील ज्यांचे महिन्याचे उत्पन्न ९ हजारांपेक्षा अधिक आहे

मूळ ‘ईसीएचएस’ धारकांच्या सेवा राहणार सुरू
माजी सैनिक व त्यांची पत्नी हे प्राथमिक ईसीएचएस लाभार्थी असून, त्यांना पडताळणी प्रक्रियेअंतर्गत कोणतेही कागदपत्रे सादर करण्याची आवश्‍यकता नाही. तसेच, यामुळे त्यांच्या आरोग्यसेवा थांबविल्या जाणार नाहीत. त्यांना केवळ दरवर्षी हयातीचा दाखला सादर करणे आवश्‍यक आहे.

वार्षिक पडताळणीसाठी अशी प्रक्रिया करा
- ‘ईसीएचएस’च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन लॉगइन करणे
- ‘डिपेंडंट’ या विकल्पाची निवड करणे
- यामध्ये ‘पॅन कार्ड’ किंवा ‘पॅन कार्ड नाही’ या दोन विकल्पांपैकी एक निवडणे
- तसेच त्यामध्ये नमूद केलेले कागदपत्रे अपलोड करणे

...अशी होणार पडताळणी
- माजी सैनिक ज्यांच्या मुलांचे ९ हजारांपर्यंत किंवा त्याहून कमी मासिक वेतन असल्यास ईसीएचएस सुविधा मिळणार
- या लाभार्थ्यांच्या ६४ केबी ईसीएचएस कार्डची मुदत एक वर्षासाठी वाढविण्यात येईल
- अवलंबितांचे मासिक उत्पन्न ९ हजारांपेक्षा अधिक असल्यास ते या आरोग्‍यसेवांचा लाभ घेण्यास पात्र नसतील

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d89454 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..