बुकिंग एका रिक्षेचे, आली दुसरीच! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बुकिंग एका रिक्षेचे, आली दुसरीच!
बुकिंग एका रिक्षेचे, आली दुसरीच!

बुकिंग एका रिक्षेचे, आली दुसरीच!

पुणे : मोबाईल ॲपवरून रिक्षा बुक केल्यावर जी रिक्षा बुक झाली, तीच रिक्षा व त्याचा चालक येणे अपेक्षित आहे. कारण, त्याची नोंद संबंधित सेवा देणाऱ्या कंपनीकडे झालेली असते. मात्र, गेल्या काही दिवसांत रिक्षा बुक केल्यावर नोंद झालेल्या रिक्षाऐवजी दुसरीच रिक्षा प्रवाशांच्या दारात उभी राहत आहे. याचा अर्थ ज्या रिक्षातून प्रवास करायचा आहे, त्याची नोंदच संबंधित कंपनीकडे नाही. त्यामुळे एखादी दुर्घटना घडली अथवा अनुचित प्रकार घडला, तर त्या संबंधित प्रवाशापर्यंत पोचणे अवघड होईल, यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

पुणे ‘आरटीओ’कडे सुमारे ८७ हजार रिक्षाची नोंद आहे. यापैकी ३२ हजार रिक्षा या खासगी सेवा देणाऱ्या कंपनीशी करार करून धावत आहेत. कंपनीकडे रिक्षा अथवा टॅक्सीची नोंद करताना रिक्षा व चालकाची कागदपत्रे जमा केली जातात. यावेळी रिक्षाचा व चालकाचा मोबाईल क्रमांकदेखील दिला असतो. त्यामुळेच रिक्षा अथवा कॅब बुक केल्यावर संबंधित रिक्षाचालकाचे नाव, रिक्षा क्रमांक, फोटो व मोबाईल क्रमांक येतो. मात्र, गेल्या काही दिवसांत बुक करतानाचा रिक्षा क्रमांक वेगळा व दारात आलेल्या रिक्षाचा क्रमांक हा वेगळा असल्याचे आढळून आले आहे. अनेक रिक्षाचालक नोंदणी करताना वेगळी रिक्षा दाखवत असून, प्रत्यक्षात मात्र वेगळ्या क्रमांकांच्या रिक्षातून प्रवासी वाहतूक होत आहे, हे बेकायदेशीर आहे. शिवाय, प्रवाशाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्हही निर्माण करणारे आहे. कंपनी व ‘आरटीओ’ने अशा रिक्षाचालकांवर कारवाई करणे गरजेचे आहे.

हे घडते कसे
- रिक्षाचा व्यवसाय करणाऱ्या अनेक व्यक्तींकडे दोन ते तीन रिक्षा असतात. यात कंपनीकडे प्रामुख्याने चालकाची नोंद, तसेच त्या सोबतच्या एका रिक्षांचे नोंद झालेली असते. काही वेळा नोंद केलेल्या चालकाकडून नोंद न केलेल्या रिक्षाचा वापर केला जातो. त्यामुळे प्रवाशांच्या दारात भलतीच रिक्षा उभी राहते.
- ज्या रिक्षा चालकांची नोंदणी कंपनीकडे झाली आहे, त्यांनी पहिल्या मालकाची रिक्षा सोडून दुसऱ्या मालकाची रिक्षा चालविण्यास घेतल्यावरदेखील असा प्रकार घडू शकतो. कारण, अनेक रिक्षाचालक मालक बदलतात. मात्र, ते बदलेल्या रिक्षांच्या नोंदणी बदलत नाहीत.

यात धोका काय?
एखादा गुन्हा घडला, तर संबंधित रिक्षाचा तपास लावायचा कसा? असा प्रश्न निर्माण होतो. शिवाय ज्या रिक्षातून प्रवास होतो. त्याचे फिटनेस कसे आहे. त्याचा विमा आहे की नाही? हे समजणारच नाही. प्रवासी सुरक्षाही धोक्यात येण्याची शक्यता आहे.

‘‘ॲपवर नोंद केलेल्या रिक्षाऐवजी जर दुसरी रिक्षा येत असेल, तर ते चुकीचे आहे. मात्र, अशी कोणतेही घटना आमच्या पाहणीत नाही. प्रवाशांनी यासंदर्भात काही तक्रार केल्यास संबंधित रिक्षाचालकांवर कारवाई केली जाईल.’’
- संजीव भोर, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

‘‘मला कात्रजहून पुणे रेल्वे स्टेशनला यायचे होते. यासाठी ॲपवरून रिक्षा बुक केली, त्यावेळी मोबाईलवर आलेला रिक्षाचा क्रमांक आणि प्रत्यक्षात आलेली रिक्षा यात बदल होता. यासंदर्भात चालकाला विचारल्यावर त्याने माहीत नसल्याचे सांगितले.’’
- स्नेहा कुलकर्णी, प्रवासी

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d89492 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..