‘रुपी’च्या ठेवीदारांचे ३५० कोटी परत मिळणार ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rupee bank
‘रुपी’च्या ठेवीदारांचे ३५० कोटी परत मिळणार ?

‘रुपी’च्या ठेवीदारांचे ३५० कोटी परत मिळणार ?

पुणे : रुपी सहकारी बॅंकेत पाच लाख रुपयांपर्यंत रक्कम असलेल्या बहुतांश ठेवीदारांना ठेव विमा (डीआयसीजीसी) महामंडळाकडून सुमारे सातशे कोटी रुपये मिळाले. परंतु रिझर्व्ह बॅंकेने रूपी बॅंकेचा परवाना रद्द केल्यामुळे उर्वरित मोठ्या ठेवीदारांचे ३५० कोटी रुपये अडकले आहेत. हे ठेवीदार रिझर्व्ह बॅंकेच्या निर्णयाच्या विरोधात केंद्र सरकार आणि उच्च न्यायालयात अपील करणार आहेत. दरम्यान, बॅंकेची गुंतवणूक आणि मालमत्ता पाहता ठेवी परत मिळतील, अशी मोठ्या ठेवीदारांना अपेक्षा आहे.

रुपी बॅंकेच्या तत्कालीन संचालकांनी आर्थिक गैरव्यवहार केला. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने रुपी बॅंकेवर फेब्रुवारी २०१३ मध्ये आर्थिक निर्बंध लादून प्रशासकाची नियुक्ती केली. त्यानंतर हार्डशिप योजनेंतर्गत ३० सप्टेंबर २०२१ पूर्वी एक लाख ठेवीदारांना त्यांच्या वैद्यकीय, मुलांच्या शिक्षणासाठी चारशे कोटींच्या ठेवी परत करण्यात आल्या. परंतु ठेवीदारांना पैसे परत मिळविण्यासाठी ९ वर्षे संघर्ष करावा लागला. पाच लाखांच्या आतील ठेवीदारांच्या सातशे कोटींच्या ठेवी परत करण्यात आल्या. सुमारे ९० टक्के ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळाल्या आहेत. तर, पाच लाखांच्या आतील काही ठेवीदारांनी अद्याप अर्ज केलेले नाहीत. त्या ठेवीदारांचे २३० कोटी रुपये देणे शिल्लक आहेत. मात्र, पाच लाखांवरील विमा संरक्षण नसलेल्या साडेचार हजार ठेवीदारांच्या ३५० कोटींच्या ठेवी अडकल्या आहेत.

विलीनीकरणाचे प्रयत्न निष्फळ

रुपी बॅंकेच्या विलीनीकरणासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेने रिझर्व्ह बॅंकेकडे प्रस्ताव दिला होता. परंतु रिझर्व्ह बॅंकेने बरेच दिवस घोंगडे भिजत ठेवले. त्यानंतर सारस्वत बॅंकेनेही रुपीच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव दिला होता. परंतु ठेव विमा महामंडळाकडून ठेवीदारांना सातशे कोटी रुपये परत करण्यात आले. त्यामुळे सारस्वतचाही प्रस्ताव मागे पडला. गुजरातच्या मेहसाना बॅंकेतही विलीनीकरणाचे प्रयत्न सुरू होते. मात्र, हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.

ईडीमार्फत चौकशीची मागणी

‘‘रुपी बॅंकेच्या प्रशासकाची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत होती. तसेच, उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असताना रिझर्व्ह बॅंकेने रुपीचा परवाना रद्द केला. त्यामुळे ठेवीदार संतप्त झाले आहेत. नागरी सहकारी बॅंका संपुष्टात आणणे, हे रिझर्व्ह बॅंकेचे उद्दिष्ट आहे. त्यांनी तत्कालीन संचालक मंडळाला वाचविण्यासाठीच हा उद्योग केला आहे,’’ असा आरोप रुपी बॅंक ठेवीदार हक्क समितीचे सहसंयोजक भालचंद्र कुलकर्णी यांनी केला.

रुपी बॅंकेची ८३० कोटींची गुंतवणूक आहे. मालमत्ता विक्रीतून सुमारे शंभर कोटी मिळतील. तसेच, थकबाकीदारांकडून शंभर कोटी वसूल केल्यास उर्वरित ठेवीदारांच्या ३५० कोटींच्या ठेवी परत करणे अवघड नाही. डीआयसीजीसी ही बॅंकेकडून विम्याची रक्कम घेते. मग बॅंकेच्याच गुंतवणुकीतून ठेवीदारांचे पैसे देणार असतील तर डीआयसीजीसीची गरजच काय, असा प्रश्न कुलकर्णी यांनी केला. रुपी बॅंकेत गैरव्यवहार करणाऱ्या तत्कालीन संचालक आणि मोठ्या थकबाकीदारांची ईडीमार्फत चौकशी करावी. तसेच, रिझर्व्ह बॅंकेच्या व्यवस्थापनाची माजी न्यायाधीशामार्फत स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

रुपी बॅंकेला सुधारणा करण्यासाठी दहा वर्षांचा कालावधी दिला गेला. परंतु मोठ्या ठेवीदारांच्या एका गटाच्या भूमिकेमुळे रुपीच्या पुनरुज्जीवनामध्ये अडचण निर्माण झाली. या ठेवीदारांनी ठरवले असते तर बॅंक अडचणीतून बाहेर येणे शक्य होते. कोणतीही बॅंक रुपीचे विलीनीकरण करताना नुकसान सहन करण्यास तयार नव्हती. तसेच, रिझर्व्ह बॅंक अनुकूल नसती तर रुपी बॅंक यापूर्वीच संपुष्टात आली असती.
- सतीश मराठे, संचालक- रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया

रुपी बॅंकेचा परवाना पुनरुज्जीवित करण्याबाबत केंद्र सरकारच्या वित्त
मंत्रालयाकडे अपील करण्यात येणार आहे. यासोबतच उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागणार आहोत. तसेच, लोकप्रतिनिधींसमोर प्रश्न मांडणार असून, आम्ही त्यात यशस्वी होऊ अशी अपेक्षा आहे.
- सुधीर पंडित, प्रशासक, रुपी सहकारी बॅंक

रुपी बॅंकेची स्थिती (ठेवीदार आणि ठेव रक्कम कंसात)

पाच लाखांपर्यंतचे ठेवीदार ४ लाख ८६ हजार ५०८ (७०२ कोटी रुपये)
पाच लाखांवरील ठेवीदार ४ हजार ७३१ ( ६०२ कोटी रुपये)
दहा हजार रुपयांपर्यंतचे ठेवीदार सुमारे ३ लाख २५ हजार
एकूण विमा संरक्षित ठेवी ९४३ कोटी रुपये (त्यापैकी वाटप सुमारे ७०० कोटी)
पाच लाखांवरील ठेवी ३५० कोटी रुपये (विमा संरक्षण नाही)

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d89682 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..