...आता कला शाखा हुशार विद्यार्थ्यांची! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

...आता कला शाखा हुशार विद्यार्थ्यांची!
...आता कला शाखा हुशार विद्यार्थ्यांची!

...आता कला शाखा हुशार विद्यार्थ्यांची!

sakal_logo
By

मीनाक्षी गुरव ः सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १४ : दहावीत ९३.२० टक्के गुण मिळूनही समीरचा (नाव बदलले आहे) कलाशाखेत जाण्याचा निर्णय कायम आहे. पण, त्याच्या या निर्णयाने त्याचे वडील (संजय नाव बदलले आहे) हे काहीसे नाराज असले, तरीही मुलाला ते भक्कम आधार देत आहेत. होय, बरं समीरला कला शाखा निवडण्याचे कारण विचारलं, तर ‘‘मला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेची तयारी करायची आहे. त्यासाठी मला अधिक चांगला अभ्यास करायचा आहे, म्हणून कला शाखा निवडली,’’ हे त्याने अगदी ठामपणे सांगितले.

होय, समीरप्रमाणेच दहावी-बारावीत ९० किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळालेले असंख्य विद्यार्थी विशिष्ट ध्येय डोळ्यासमोर ठेवून कला शाखेत शिकण्याचा पर्याय निवडत आहेत. आतापर्यंत जेमतेम अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची विद्याशाखा मानल्या जाणाऱ्या कला शाखेत दहावी आणि बारावीत ८५ ते ९० टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळालेले विद्यार्थी वळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अकरावी आणि प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश फेऱ्यांमध्ये कला शाखेचा कट-ऑफ हा वाढत असल्याचे निदर्शनास येते. शहरातील नामांकित महाविद्यालयांमध्ये विशेषत: अकरावी प्रवेश प्रक्रियेतील कला शाखेचा (इंग्रजी माध्यम) कट ऑफ हा विज्ञान शाखेपेक्षा अधिक असल्याचे दिसून येते.

विज्ञानशाखेपेक्षाही कला शाखेचा ‘कट-ऑफ’ जास्त

- इयत्ता अकरावीच्या पहिल्या फेरीत फर्ग्युसन महाविद्यालयाचा कला शाखेचा (इंग्रजी माध्यम) कट ऑफ ९६.४० टक्के इतका होता, तर विज्ञान शाखेचा कट-ऑफ ९५.२० टक्के होता. तर दुसऱ्या फेरीतही कलाशाखेचा कट ऑफ ९६.२० टक्के, तर विज्ञान शाखेचा ९४.४० टक्के होता.
- सिंबायोसिस महाविद्यालयाचा कला शाखेचा पहिल्या फेरीत असणारा ९३.२० टक्के कट-ऑफ दुसऱ्या फेरीत ९४ टक्क्यांइतका वाढला.
- मॉडर्न महाविद्यालयाचा (शिवाजीनगर) कला शाखेचा कट-ऑफ पहिल्या फेरीत ९१ टक्के इतका होता, तर दुसऱ्या फेरीत ९०.४० टक्के इतका आहे.


विद्यार्थ्यांचा कला शाखेकडे ओढा वाढण्याची कारणे

१. नवनव्या क्षेत्रांमध्ये खुल्या होणाऱ्या संधी
२. युपीएससी, एमपीएससी अशा स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी
३. मानसशास्त्र, राज्यशास्त्र, तत्वज्ञान, सामाजिक शास्त्र, अर्थशास्त्र यातून खुली होणारी दालने
४. कला शाखेत प्रवेश घेऊन अन्य पूरक अभ्यासक्रम शिकणे
५. कला शाखेत प्रवेश घेऊन अर्धवेळ नोकरी किंवा व्यवसायात पावलं टाकणं शक्य

‘‘दहावीमध्ये किंवा बारावीमध्ये ९० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळूनही अनेक विद्यार्थी केवळ स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी कला शाखेची निवड करत आहेत. सहा- सात वर्षांपासून हा ट्रेंड दिसत आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी पदवी शिक्षणासाठी शक्यतो राज्यशास्त्र, अर्थशास्त्र यात विशेष करून शिक्षण घेणे पसंत करतात. त्याचबरोबर मानसशास्त्र क्षेत्रातील विविध संधींचा विचार करता विद्यार्थी त्याकडे वळत असल्याचे दिसून येते.’’
- डॉ. आर. जी. परदेशी, प्राचार्य, फर्ग्युसन महाविद्यालय

‘‘स्पर्धा परीक्षांची तयारी आणि विशेष करून मानसशास्त्रात करिअर करायच्या उद्देशाने दहावी आणि बारावीमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळूनही अनेक विद्यार्थी कला शाखेची निवड करतात. मानसशास्त्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाण्याचाही विद्यार्थ्यांचा कल आहे. क्लिनिकल, औद्योगिक, बालक, क्रीडा मानसशास्त्र असे असंख्य करिअरचे पर्याय समोर असल्याने कलाशाखेकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. विज्ञान शाखेतून बारावीत चांगले गुण मिळालेले अनेक विद्यार्थी देखील पदवी शिक्षणासाठी कला शाखेकडे वळत असल्याचे दिसून येते.’’
- डॉ. राजेंद्र झुंजारराव, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय (शिवाजीनगर)

‘‘मला केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा (युपीएससी) द्यायची आहे, त्यामुळे मला अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, तसेच शिक्षण घेत असतानाच युपीएससीच्या परीक्षेची पूर्व तयारी करता यावी, या उद्देशाने मी कला शाखेची निवड केली आहे.’’
- प्रीती मुजुमले, विद्यार्थिनी (दहावीत ९१.४० टक्के)

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d90123 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..