ज्ञानमंदिरा...जागर विद्येचा : सदर - शाळेत घडविले जातात शेतीचे ‘नायक’! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्ञानमंदिरा...जागर विद्येचा : सदर  - शाळेत घडविले जातात शेतीचे ‘नायक’!
ज्ञानमंदिरा...जागर विद्येचा : सदर - शाळेत घडविले जातात शेतीचे ‘नायक’!

ज्ञानमंदिरा...जागर विद्येचा : सदर - शाळेत घडविले जातात शेतीचे ‘नायक’!

sakal_logo
By

मीनाक्षी गुरव : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १९ : शाळेत रोपे बनवायला सांगितली अन्‌ त्यातून प्रेरणा घेत आदित्य गावडे याने चक्क ‘नर्सरी’च उभारली. तर शाळेतून शेतीचे धडे घेतलेले अजिंक्य डोंगरे आणि साई हिंगे हे पुढील शिक्षण घेत यशस्वीपणे शेतीही करत आहेत. एकीकडे शालेय शिक्षण घेतानाच दुसरीकडे शाळेतच मिळालेले शेतीविषयक शिक्षण हे अशा आतापर्यंत जवळपास अडीचशे विद्यार्थ्यांना ‘भविष्यातील शेतीचे नायक’ म्हणून घडविण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.

मंचरपासून अवघ्या आठ किलोमीटरवर असणाऱ्या गावडेवाडीतील हिरकणी विद्यालयातील हा आगळावेगळा उपक्रम. शाळेत शिक्षणासह विद्यार्थ्यांना शेती आणि शेतीला पूरक व्यवसायाचेही प्रात्यक्षिकांवर आधारित धडे ‘फाली’ या उपक्रमांतर्गत दिले जातात. त्या अंतर्गत शाळेतील इयत्ता आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांना आधुनिक शेती कशी करायची, रोपे कशी तयार करावीत, आर्थिक नियोजन याचे शिक्षण दिले जाते. ‘विद्यार्थ्यांनी आधुनिक शेती व संबंधित व्यवसायात यशस्वी व्हावे,’ या उद्देशाने हा उपक्रम राबविला जातो.

‘फाली’ उपक्रमातून शेतीचा अभ्यास
‘भारतातील शेतीचा भविष्यातील नायक’ (फ्युचर ॲग्रिकल्चरल लिडर्स ऑफ इंडिया- फाली) या नावाने उपक्रम सुरू करणारी ही शाळा. शेतीशी संबंधित कंपन्यांच्या मदतीने शाळेत आधुनिक शेती आणि शेतीविषयक तंत्रज्ञान अभ्यासक्रम सुरू आहे. यातून शास्त्रशुद्ध शेतीची माहिती उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयक आवड निर्माण होत आहे. रोपे तयार करणे, रोपवाटिकांना भेटी, शेतमाल प्रक्रिया उद्योगांस भेटी व प्रात्यक्षिक यावर भर देऊन विद्यार्थ्यांना शेतीविषयक धडे दिले जातात.

विद्यार्थ्यांनी केलेले प्रयोग :
- झेंडू, कारली, ब्रोकली, मिरची, दोडके अशी उत्पादने घेतली
- उत्पादनांची यशस्वी विक्री
- माती तपासणी करणे
- दुग्धजन्य पदार्थ, गांडूळ खत निर्मिती
- सेंद्रिय व रासायनिक शेती करणे
- छोट्या स्वरूपात कीटकनाशके तयार करणे

शाळेत आठवी असताना टोमॅटोचे रोप बनविण्याचे शिक्षण दिले जात होते. त्याप्रमाणे टोमॅटोची रोपे बनविली. पाहुण्यांनी ही रोपे विकत घेण्याची इच्छा दर्शविली आणि तेथूनच ‘नर्सरी’ची मुहूर्तमेढ रोवली गेली. शाळेत असतानाच छोटेखानी नर्सरी सुरू केली आहे. आता नर्सरीचा विस्तार अर्धा एकर जागेइतका वाढला असून दरवर्षी पाच ते सहा लाख रोपे तयार करून त्यातून एक ते दीड लाख रुपये मिळतात. शाळेतील शेतीविषयक धडे प्रत्यक्षात उपयुक्त ठरत आहेत.’’
- आदित्य गावडे, शाळेचा माजी विद्यार्थी, प्रथम वर्ष, अभियांत्रिकी अभ्यासक्रम -आयटी

शाळेत गेल्या पाच-सहा वर्षांपासून ‘फाली’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शेतीविषयक शिक्षण दिले जात आहे. या उपक्रमांतून शाळेने आजवर जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीयस्तरावर पारितोषिके मिळवली. शेतीचे धडे घेऊन शाळेतून बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणानंतर पुन्हा शेतीकडे वळाले असून अनेकांनी नर्सरी, शेतीला पूरक औषधे व खते विक्री व्यवसाय सुरू केले आहेत.
- विनोद बोंबले, मुख्याध्यापक, हिरकणी विद्यालय, गावडेवाडी

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d90593 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..