गोविंदामध्ये सळसळता उत्साह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोविंदामध्ये सळसळता उत्साह
गोविंदामध्ये सळसळता उत्साह

गोविंदामध्ये सळसळता उत्साह

sakal_logo
By

पुणे, ता. १९ : ''गोविंदा रे गोपाळा...'', ''राजं आलं राजं आलं जिंकूनीया जगभरी शिवबा नाव गाज जी...'', ''यशोदेच्या तान्ह्या बाळा..'', ''लाल लाल पागोटा गुलाबी शेला...'' यासह अनेक हिंदी-मराठी गाण्यांवर दोन वर्षांनंतर ठेका धरत. स्पीकर्सच्या भिंतींमधून येणारा धडकी भरविणारा आवाज, आकर्षक रोषणाई आणि आकर्षण पद्धतीची सजावट अशा उत्साही वातावरणात शुक्रवारी दहीहंडी साजरी करण्यात आली.
कोरोनामुळे गेली दोन वर्ष दहीहंडी साजरी करण्यात आली नव्हती. मात्र महामारीचे संकट कमी झाल्याने शहरातील प्रमुख मंडळांसह गल्लीबोळातही मोठ्या थाटामाटात या उत्सवाचे आयोजन केले होते. गुरुवारी रात्रीपासूनच सार्वजनिक मंडळांकडून उत्सवाची तयारी सुरू होती. त्यातच आज पावसाने उघडीप घेतल्याने आणि दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळाल्याने दुपारपासूनच शहरातील रस्त्यांवर गर्दी झाली होती.
चौकाचौकात क्रेनवर फुलांनी सजविलेल्या दहीहंडी, झगमगाट करणारा लेझर शो आणि दिव्यांची रचना अशा वातावरणात गाण्यांच्या दणदणाटात तरुण नाचत होते. शहरातील गोकुळभक्तांचे आकर्षणाचे ठिकाण असलेल्या हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी पाहण्यासाठी उपनगरासह मध्यवर्ती भागातील जनसमुदाय उसळला होता. मानाचा तिसरा गणपती मंडळ गुरुजी तालीम आणि श्रीमंत भाऊ रंगारी गणपती मंडळ ट्रस्टने यंदा प्रथमच आयोजित केलेल्या उत्सवाला सिनेतारकांना लावलेली हजेरी गर्दी खेचणारी ठरली.
रोख रकमेपासून दुचाकी, सोन्याची अंगठी, महागड्या सायकल अशी आकर्षित पारितोषिके गोविंदा पथकांसाठी जाहीर करण्यात आली होती. पुण्यासह इंदापूर, भोर, बारामती, दौंड, मुंबईसह अनेक ठिकाणांहून गोविंदा पथके पुण्यामध्ये दाखल झाली होती. अनेक मंडळांपुढे स्पीकरसह ढोलपथकांचा गजर झाला. सायंकाळनंतर गर्दी वाढतच गेली. रात्री नऊच्या सुमाराला प्रमुख मंडळांच्या दहीहंडी फुटल्यानंतर गर्दी ओसरली.

उपनगरांतही उत्साह :
कोथरूड, बाणेर, बालेवाडी, औंध, हडपसर, कात्रज, वारजे, सिंहगड रस्ता, धायरी, चंदननगर आणि वडगाव शेरी या उपनगरांमधील मंडळांनी मोठ्या प्रमाणात साउंड सिस्टिम लावले होते. उपनगरांतील काही मंडळांनी ‘प्रमुख आकर्षण’ म्हणून मराठी-हिंदी सेनेक्षेत्रातील अभिनेत्री किंवा अभिनेत्यांना बोलावले होते.

इच्छुकांची बॅनरबाजी
आगामी महानगरपालिकेची निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर दहीहंडीचा मुहूर्त साधत इच्छुकांची मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केल्याचे शहरासह उपनगरांत अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. दहीहंडीचे आयोजन करण्यामध्ये देखील इच्छुकांनी हिरहिरीणी सहभाग घेतला होता. मतदारांना आकर्षित करण्यासाठी आपला दहीहंडी उत्सव इतरांच्या तुलनेत वरचढ ठरावा यासाठी चढाओढ असल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही राजकीय मंडळींनी देखील मंडळांना भेटी दिल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d91632 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..