युवकांनी ११२ शाळांमध्ये स्थापले मोफत संगणक कक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bicycle-Computer
युवकांनी ११२ शाळांमध्ये स्थापले मोफत संगणक कक्ष

युवकांनी ११२ शाळांमध्ये स्थापले मोफत संगणक कक्ष

पुणे : समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी खारीचा वाटा उचलता यावा, या उद्देशाने पुणे शहरात नोकरीनिमित्त आलेल्या प्रवीण महाजन या तरुणाने वयाच्या पंचविशीत युवकमित्र परिवाराची स्थापना केली. या परिवाराच्यावतीने राज्यातील होतकरू विद्यार्थ्यांना जुने संगणक, सायकली मोफत भेट देण्याचा उपक्रम सुरु केला आहे. यासाठी ‘सायकल बॅंक’ स्थापन केली आहे.
‘सायकल बॅंक’च्या उपक्रमांतर्गत वर्षभरात राज्यातील ११२ शाळांमध्ये मोफत संगणक कक्ष स्थापन केले आहेत. शिवाय ५०० गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे मोफत वाटप केले. राज्यातील पुणे, मुंबई या शहरांमधील सुखवस्तू कुटुंबांकडे पडून असलेल्या जुन्या सायकली, पुस्तके, इलेक्ट्रॉनिक वस्तू (उदा. संगणक, खेळणी) आदी वस्तूंची गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मदत व्हावी. या उद्देशाने प्रवीण महाजन यांनी समविचारी युवकांना एकत्रित करत युवकमित्र परिवाराची स्थापना केली. या परिवाराच्यावतीने मोठ्या शहरांतील नागरिकांकडे पडून असलेल्या जुन्या वस्तू संकलित करून त्यांची दुरुस्ती केली जाते. त्यानंतर या वस्तू ग्रामीण भागातील गरजू, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जातात.
महाजन यांनी २०१५ मध्ये पुणे शहरात हा ‘युवकमित्र परिवार’ स्थापन केला आहे. समविचारी युवकांना संघटित करत ग्रामीण व दुर्गम भागातील वंचित विद्यार्थ्यांच्या विकासासाठी हा परिवार काम करत आहे. सध्या राज्यभरातील १०० हून अधिक युवक या चळवळीशी जोडले आहेत. चळवळीच्या माध्यमातून गाव तिथे ग्रंथालय, संगणक साक्षरता अभियान व सायकल बँक आदी उपक्रम राबविण्यात येतात.

या चळवळीमार्फत नागरिकांनी देऊ केलेली जुनी पुस्तके, संगणक, सायकली संकलित केल्या जातात. या सर्व वस्तूंची स्वखर्चाने दुरुस्ती केली जाते आणि त्यानंतर त्या वस्तू ग्रामीण भागातील विनाअनुदानित, वंचित विद्यार्थ्यांच्या शाळांना त्यांच्या मागणीनुसार भेट दिल्या जात असल्याचे महाजन यांनी सांगितले.
‘युवकमित्र परिवार’चे संस्थापक प्रवीण महाजन हे मुळचे अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या नंदूरबार जिल्ह्यातील कोठली (ता. शहादा) येथील रहिवासी आहेत. ते सात वर्षांपासून पुणे शहरात सरकारी नोकरी करतात. त्यांनी सचिन म्हसे, बादलसिंग गिरासे, मयूर जाधव आणि मयूर बागूल आदी युवकांच्या मदतीने या उपक्रमात सातत्य कायम राखले आहे.

वस्तू संकलनासाठी ‘पुणे डोनेट हँड’ ॲप
पुणे, मुंबईतील नागरिकांकडे विना वापर पडून असलेल्या जुन्या वस्तू, पुस्तके, सायकली, संगणक हे नागरिकांना सहजरित्या युवकमित्र परिवाराकडे देता यावे आणि या वस्तू गरजूंपर्यंत पोचविता याव्यात यासाठी ‘पुणे डोनेट हँड’ हे ॲप विकसित केले आहे. इच्छुक नागरिक या ॲपच्या माध्यमातून वस्तू दान देण्यासाठी नोंदणी करू शकतात. तसेच गरजू व होतकरू विद्यार्थी व शाळा त्यांना आवश्‍यक वस्तूंची मागणी नोंदवू शकतात, अशी सोय केली आहे.

प्रवीण महाजन, संस्थापक युवकमित्र परिवार, पुणे
समाजात एकीकडे मोठ्या प्रमाणात सुखसुविधा असलेली कुटुंबे आहेत. दुसरीकडे विद्यार्थांना शाळेत जाण्यासाठी साधी सायकलही मिळत नाही. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना कधी कधी शालेय उपयोगी साहित्यही मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी खारीचा वाटा उचलता यावा, हा या युवकमित्र परिवार चळवळ सुरु करण्यामागचा उद्देश आहे. आमचा हा उद्देश यशस्वी झाला आहे.