पालिकेत बोगस भरती राबवणारा जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिकेत बोगस भरती राबवणारा जेरबंद
पालिकेत बोगस भरती राबवणारा जेरबंद

पालिकेत बोगस भरती राबवणारा जेरबंद

sakal_logo
By

पुणे, ता. १९ ः पुणे महापालिकेत भरती प्रक्रिया सुरू असताना एकाने चक्क सहा ते सात जणांना आरोग्य विभागात नोकरी लावून देतो, असे सांगून मुलाखतीला बोलविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मात्र, पालिकेतील सतर्क सुरक्षा रक्षकांनी बोगस भरतीची प्रक्रिया राबविणाऱ्याला रंगेहाथ पकडून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नेले. या व्यक्तीने नोकरीच्या आमिषाने सहा ते सात लाख रुपये उकळल्याचे चौकशीत उघड झाले. दरम्यान पालिका प्रशासनाने आमिषाला बळी पडू नये असे आवाहन केले आहे.

सुरक्षा विभागाने पकडलेला व्यक्ती कोल्हापूर येथील असून त्याने त्याच्या ओळखीतल्या काही जणांना नोकरी लावून देण्याच्या आमिषाने ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पैसे घेतले आहे. शुक्रवारी (ता. १९) दुपारी आरोग्य विभागात नर्स आणि फार्मसिस्ट पदाच्या भरतीसाठी या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलविले होते. उमेदवार मुख्य प्रवेशद्वारातून आता येताना मुलाखतीसाठी आल्याचे सांगितले. दरम्यान, आरोपी व्यक्ती राज्य शासनाचे ओळखपत्र दाखवून तिसऱ्या मजल्यावर आरोग्य विभागात गेला. दरम्यान सुरक्षा रक्षकांनी पालिकेत मुलाखती आयोजित नसल्याची खातरजमा करत या व्यक्तीला सुरक्षारक्षक बाळासाहेब उंद्रे यांनी पकडले. सेवक वर्ग विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांच्यासमोर त्याला हजर केले. त्याच्या चौकशीनंतर त्याला सुरक्षा विभागाचे राजेश विटकर यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नेले. त्याच्यावर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

दीड लाखात भरती
या व्यक्तीने प्रत्येक उमेदवाराकडून दीड लाख रुपये घेतले होते. आज दुपारपर्यंत या उमेदवारांना त्याच्यावर संशय आला नाही, पण पालिकेत तो पकडला गेल्यावर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या उमेदवारांनी पालिकेच्या सुरक्षा रक्षकांचे आभार मानले.

पालिकेची भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे, त्यामुळे अशा प्रकारे कोणत्याही व्यक्तीवर विश्‍वास ठेवून आर्थिक व्यवहार करू नये. पालिकेत पकडलेल्या व्यक्तीवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार आहे.
- सचिन इथापे, उपायुक्त, सेवक वर्ग विभाग

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d91756 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..