भारतात लोकशाही धोक्यात, हुकमशाहीची सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारतात लोकशाही धोक्यात, हुकमशाहीची सुरुवात
भारतात लोकशाही धोक्यात, हुकमशाहीची सुरुवात

भारतात लोकशाही धोक्यात, हुकमशाहीची सुरुवात

sakal_logo
By

पुणे, ता. २० ः जगभरात आतापर्यंत ॲडॉल्फ हिटलरसह सर्व उदयास आलेले हुकूमशहा हे लोकशाही मार्गाने निवडून आले होते. त्याचीच पुनरावृत्ती आता भारतात होऊ लागली आहे. सध्या देशातील लोकशाही धोक्यात आली असून, हुकूमशाहीला सुरवात झाली आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी (ता.२०) पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना केले.

ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा लिखित ‘शोध नेहरू गांधी पर्वाचा’ या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीदिनी शनिवारी पुण्यात चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, खासदार कुमार केतकर, माजी आमदार मोहन जोशी, कम्युनिष्ट पक्षाचे नेते दत्ता देसाई, पुस्तकाचे लेखक सुरेश भटेवरा, प्रकाशक अरविंद पाटकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

चव्हाण पुढे म्हणाले, ‘‘माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या होत्या. त्यामुळेच त्यांनी १९७५ च्या आणीबाणीनंतरही देशात पुन्हा लोकशाही मार्गाने पुन्हा निवडणुका घेतल्या. पण इंदिरा गांधी या नेहरूंच्या कन्या नसत्या तर, आणीबाणीनंतर देशात निवडणुका घेतल्याच नसत्या. गांधी यांना ही आणीबाणी राजकीय अगतिकतेतून लावावी लागली होती. परंतु त्या आणीबाणीनंतर अस्वस्थ होत्या. दरम्यान, तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात पंतप्रधान कार्यालयातील सरकारी फायली या सोनिया गांधी यांच्याकडे जात असत, असा आरोप केला जात आहे. या आरोपात तथ्य नाही. सोनिया गांधी यांनी मनमोहनसिंग यांच्या कामात कधीही हस्तक्षेप केला नाही. उलट त्या पंतप्रधान पदाचा प्रोटोकॉल कटाक्षाने पाळत असत.’’

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाची २०१२ पासून चौकशी केली जात आहे. या प्रकरणात तथ्य नसल्याचा निर्वाळा भाजपनेच २०१५ मध्ये देऊन हे प्रकरण बंद केले होते. तरीही हेच प्रकरण २०१९ मध्ये पुन्हा उकरून काढण्यात आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आदींची सुमारे ५५ तास चौकशी करण्यात आली आहे. तरीही काहीही तथ्य आढळलेले नाही. मात्र केवळ द्वेष व कारस्थानातून गांधी घराण्याला जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. हे केवळ एका माणसाची कमालीची विकृती, दुष्टता आणि कट कारस्थानातून हे घडत आहे. परंतु गांधी घराण्याच्या मागे आध्यात्मिक ताकद आहे. त्यामुळे ते अन्य नेत्यांसारखे दबाबाला बळी पडून भाजपत जाणार नाहीत, असे मत कुमार केतकर यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी उल्हास पवार, दत्ता देसाई यांचीही भाषणे झाली. प्रकाशक अरविंद पाटकर यांनी प्रास्ताविक केले. यशराज पारखी यांनी सूत्रसंचालन केले. मोहन जोशी यांनी आभार मानले.

‘... तर देशाचे चित्र वेगळे दिसले असते’

दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यामुळेच भारतात संगणक व मोबाईल क्रांती आली. सध्याच्या डिजिटल क्रांतीची मुहूर्तमेढ राजीव गांधी यांनी रोवली. त्यांच्याकडे देशाच्या विकासाचा एक दृष्टिकोन होता. त्यामुळे आज राजीव गांधी हयात असते तर, देशाचे राजकारण वेगळे दिसले असते. शिवाय मीसुद्धा वेगळा दिसलो असतो, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

०८४२०