गीतायोग 24 ऑगस्ट 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गीतायोग 24 ऑगस्ट 2022
गीतायोग 24 ऑगस्ट 2022

गीतायोग 24 ऑगस्ट 2022

sakal_logo
By

दैनिक सकाळ
श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे,
आत्मसंतुलन व्हिलेज,
कार्ला ४१० ४०५.

अध्याय ११ श्र्लोक ४०
भगवंतांना सर्व बाजूंनी नमस्कार व त्यांच्या अतुल सामर्थ्याचे वर्णन
नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व ।
अनन्तवीर्यामितविक्रमस्त्वं सर्वं समाप्रोषि ततोऽसि सर्वः ॥ ४०॥
हे सामर्थ्यशाली अनंता, आपणाला पुढून व मागून नमस्कार असो. हे सर्वात्मन्‌, आपणाला सर्व बाजूंनीही नमस्कार असो. कारण हे अनंत पराक्रमशाली परमेश्र्वरा, आपण सर्व जगत व्यापले आहे म्हणून आपणच सर्वरूप आहात.
वीर्य ही शक्ती आहे. ती अशा पायरीवर आहे, की ती त्यानंतर प्रकाशात, ज्ञानात उत्क्रांत होते. ‘अनंतवीर्या’ असे संबोधून येथे त्यातील संख्यात्मकता, अनंतत्व सांगितले आहे, तसेच त्याचे पराकोटीचे सामर्थ्यही स्पष्ट केले गेले आहे. हे अनंतरूपा, तू सर्व रूप आपल्यात दाखवलीस आणि आताच माझ्या लक्षात आले, की तूच सर्वरूप आहेस, असे अर्जुन सांगतो आहे. सूक्ष्म जीव पहिल्यांदा उत्पन्न झाले. नंतर कीटक जन्माला आले. मग पक्षी आकाशात संचार करू लागले. मग भूचर, वनात तसेच गावात राहणारे प्राणी तयार झाले. मनुष्यप्राणी जन्माला आला. हे सगळे समजून घेताना लक्षात आले, की हे सर्व प्राणी म्हणजे तूच आहेस. तुझा अंश म्हणावा, तर हे सगळे जीव जन्माला आल्यानंतरही तू संपूर्ण आहेस.
मला नेहमीच आश्र्चर्य वाटते, की आपण सारे परमेश्र्वरापासूनच जन्माला आलो आहोत, तरी भेदभाव का करतो? हीन-दीन का मानतो?
हे परमेश्र्वरा, तुला नमस्कार असो. तुला पुढून आणि मागूनही नमस्कार करतो. सर्व दिशांना व्यापून राहिलेल्या परमेश्र्वराला हा नमस्कार आहे. परमेश्र्वराचे रूप एवढे विशाल आहे, की ते डोळ्यांत मावत नाही. परमेश्र्वर हाच सर्व ब्रह्मांडाचे मूळ कारण आहे. तेव्हा हे परमेश्र्वरा, मी आपल्याला चारही बाजूंनी नमस्कार करतो. यासाठीच देवाला प्रदक्षिणा घालण्याची पद्धत आहे.
संपूर्ण ब्रह्मांडाला एकाच वेळी उठवेल असे सामर्थ्य परमेश्र्वराचे आहे. येथील सर्व सृष्टीत प्राणशक्ती भरणारा तो अनंत पराक्रमशाली आहे. आपण त्याच्यामुळेच श्र्वास घेतो आहोत. कोणत्याही विध्वंसकारी कृत्यापेक्षा सर्जनाची क्रिया नेहमीच मोठी असते. पूर्वी सम्राट अश्र्वमेध यज्ञ करून अन्य राजांना मांडलिक करायचे. आपण आपल्या पिंडामधला अश्र्वमेध करायचा तो इंद्रियांना ताब्यात ठेवण्यासाठी. परमेश्र्वर सर्वत्र आहे. त्याला अश्र्व सोडावा लागत नाही. अशा सर्वव्यापी परमेश्र्वराला नमस्कार असो.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d92290 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..