ना ठेकेदाराची झंझट, ना लुटमारीची तक्रार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ना ठेकेदाराची झंझट, ना लुटमारीची तक्रार
ना ठेकेदाराची झंझट, ना लुटमारीची तक्रार

ना ठेकेदाराची झंझट, ना लुटमारीची तक्रार

sakal_logo
By

पुणे, ता. २२ ः पुणे महापालिकेच्या वाहनतळावर ठेकेदार हे ठरलेल्या पैशांपेक्षा जास्त पैसे घेतात, जाब विचारल्यावर दादागिरी करतात, अशी तक्रारी महापालिकेकडे वारंवार येतात. पण, सध्या पुणेकरांना एक सुखद अनुभव येत आहे. ठेकेदाराविना महापालिका चार वाहनतळ चालवत आहे, तेथे सुरक्षारक्षक किंवा अतिक्रमण विभागाचे कर्मचारी रीतसर पावती देतात अन् ठरल्याप्रमाणे पैसे घेतात. लूटमार वगैरे होत नसल्याने त्याची तक्रारही येत नाही. मंडईतील दोन्ही प्रमुख वाहनतळासह अन्य दोन वाहनतळ गेल्या १३९ दिवसांपासून महापालिका चालवत आहे, त्यातून ४५ लाख ५८ हजार ३१० रुपये उत्पन्न मिळाले आहे.

पुणे महापालिकेची शहरात ३० वाहनतळ आहेत. ही वाहनतळ ठेकेदारांना भाड्याने देऊन त्यातून एका वर्षाला सुमारे सहा कोटींचे उत्पन्न अपेक्षीत आहे. महापालिकेच्या वाहनतळाचे व्यवस्थापन आणि संचलन करण्यासाठी ठेकेदार नियुक्त केले जातात. पूर्वी ३० वाहनतळांसाठी ३० ठेकेदार नियुक्त केले होते. पण, या प्रत्येक ठेकेदारावर नियंत्रण ठेवणे अवघड जात असल्याने ३० वाहनतळांची ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’, ‘इ’ या पाच विभागांत वाटणी करून विभागनिहाय निविदा काढण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये केवळ ‘क’ विभागातील १० वाहनतळांचे काम एका ठेकेदाराला दिले आहे. उर्वरित विभागांसाठी निविदेची रक्कम एक कोटीच्या पुढे असल्याने ठेकेदारांनी निविदा भरली नाही. त्यामुळे पुन्हा प्रत्येक वाहनतळाची स्वतंत्र निविदा काढण्याची नामुष्की आली.

महापालिकेच्या १७ वाहनतळांच्या निविदा निघाल्या आहेत, तर काही ठिकाणी जुन्या करारांची अंमलबजावणी सुरू आहे. तसेच चार ठिकाणी ठेकेदार नसल्याने मध्यवर्ती भागातील गर्दीच्या ठिकाणांवरील वाहनतळ बंद पडले होते. ठेकेदार नियुक्त होईपर्यंत हे वाहनतळ महापालिकेने स्वतःचे कर्मचारी नियुक्त करून सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यातून महापालिकेला चांगले उत्पन्न मिळत असल्याचे समोर आले आहे.

...अशा पद्धतीने चालवितात वाहनतळ
महापालिकेने वाहनतळ चालविण्यासाठी संबंधित क्षेत्रीय कार्यालयांना सुरक्षारक्षक किंवा अतिक्रमण विभागाचे कर्मचारी तेथे नियुक्त करण्याचे आदेश दिले. सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत हे वाहनतळ सुरू असतात. त्यामध्ये महात्मा फुले मंडईतील कै. सतीशशेठ मिसाळ (मिनर्व्हा), हुतात्मा बाबूगेनू वाहनतळ (आर्यन), हमालवाडा येथील कै. शिवाजीराव आढाव वाहनतळ आणि पुणे स्टेशन येथील कै. तुकारामशेठ शिंदे या चार वाहनतळांचा समावेश आहे. या प्रत्येक वाहनतळावर पाच ते सहा कर्मचारी नियुक्त केलेले आहेत. तेथे निश्चित केलेल्या रकमेनुसार वाहनचालकांकडून पैसे घेऊन त्यांना पावती दिली जात आहे. दररोजच्या रकमेचा भरणा थेट महापालिकेच्या बँक खात्यात जमा होत असून, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक उप अभियंता नियुक्त केला आहे. आतापर्यंत या चार वाहनतळांच्या माध्यमातून ४५ लाख ७८ हजार ३१० रुपये बँक खात्यात जमा झाले आहेत.

‘‘महापालिकेचे जे वाहनतळ बंद आहेत, तेथे यंत्रणा लावून ते सुरू केले. याठिकाणी जमा होणारे दररोजचे शुल्क बँक खात्यात जमा केले जाते. आतापर्यंत ४६ लाख ७८ हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे.’’
- डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त आयुक्त, मनपा

असे मिळाले उत्पन्न
वाहनतळाचे नाव - सुरू असलेले दिवस - मिळालेले उत्पन्न
कै. सतीशशेठ मिसाळ (मिनर्व्हा)- १३९ - ९,९२,८८६
हुतात्मा बाबूगेनू वाहनतळ (आर्यन)-१३२ - १३,६८,३००
कै. शिवाजीराव आढाव हमालवाडा- १३४ - ९,४४,४६०
कै. तुकारामशेठ शिंदे, पुणे स्टेशन - ८८ - १२,७२,६६४

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d92360 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..