एक चुटकी तपकीरकी किमत तुम क्या जानो... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama
एक चुटकी तपकीरकी किंमत तुम क्या जानो...

एक चुटकी तपकीरकी किमत तुम क्या जानो...

‘आज सकाळी बशीत चहा ओतल्यावर दीपकला एकदम शिंक येऊ लागली. अशावेळी काय करावं, हेच त्याला लवकर सुचेना. बशी खाली ठेवून शिंकावं की बशी घट्ट पकडून शिंकावं, या पेचात तो पडला. बरं बशी खाली ठेवताना शिंक आली तर कपातील चहा कपड्यावर सांडण्याची शक्यता होती तसेच खाली ठेवलेल्या बशीवर पाय पडून फरशीवर चहा सांडला असता. बशी हातात घट्ट पकडून शिंकावं तरी सारं अंग हेंदकाळून चहा कपड्यांवर सांडण्यासारखी परिस्थिती होती.

‘परमेश्‍वरा, असलं संकट कोणावरही आणू नकोस रे बाबा’, अशी प्रार्थना त्याने मनोमन केली.

‘अगं एऽऽऽ माझ्या हातातील बशी घे.’ असे म्हणून त्याने मयुरीला हाक मारली. पण तिने ऐकण्याआधीच त्याला जोराची शिंक आली व सगळा चहा फरशीवर सांडला.

‘अहो किती वेंधळेपणाने वागता. सगळा चहा सांडला. मी आले आणि इलायची घालून कडक चहा केला होता. तो सगळा वाया गेला. शिवाय फरशीही घाण झाली. आता हे निस्तारणार कोण?’ मयुरीने त्याला धारेवर धरले.

‘अगं मला कोठे भाजलं की नाही, याची चौकशी करशील की चहा वाया गेला, याचे दुःख करशील.’ दीपकने म्हटले.

‘मी म्हणते, चहा पिताना तुम्हाला शिंक येतेच कशी? आली तरी तुम्हाला कपबशी बाजूला ठेवता येत नाही का? तुमच्यापेक्षा पाच वर्षांची तन्वी हुशार आहे. तिने बरोबर परिस्थिती हाताळली असती.’ मयुरीने म्हटले.

‘शिंकेला मी काय आमंत्रण दिलं होतं का? बरं मला शिंक येत असताना तुला मी आवाजही दिला होता. मात्र, मुद्दाम माझ्या मदतीला तू धावली नाहीस.’ दीपकने आरोप केला.

‘काही नाही, हा तुमचा आळशीपणा आहे. तुम्ही नियमित व्यायाम केला असता तर शिंक आली असती का? किमान तुम्ही योगासने तरी करायला पाहिजेत. शिंका येणं हे काही चांगलं लक्षण नाही. त्यामुळे आता तरी सुधारा. रोज पहाटे उठून व्यायामाला सुरवात करा.’ मयुरीने सल्ला दिला.

‘अगं कधीच्या काळी मला शिंक आली तर किती बोलतेस. कोठला विषय कोठे नेतेस? व्यायामाचा आणि शिंकेचा काय संबंध? माझ्या शिंकेवर नको त्या शंका घेऊ नकोस.’ दीपकने श्‍लेष साधत म्हटले.

‘तरीपण शिंक आल्यावर स्वतःला सावरता आलं पाहिजे. तुम्हाला ते कधीच जमलं नाही.’ मयुरीने त्याला टोमणा मारला.

‘सॉरी. मी चहा पिताना शिंकायला नको पाहिजे होते. पुढच्यावेळी मी काळजी घेईल.’ असे म्हणून विषयावर पडदा पाडत दीपक घराबाहेर पडला. पंधरा मिनिटाने तो परत घरी आला. मयुरी किचनमध्ये तांदूळ निवडत होती. त्याने हळूच पुडीतील तपकीर चिमटीत पकडली व ती हवेत उडवली. त्यानंतर तो बेडरूममध्ये जाऊन बसला. थोड्याच वेळात तीन-चार वेळा ऑकऽऽऽ छीऽऽऽ’ असा आवाज आल्याने तो पळत बाहेर आला. त्यावेळी सुपातील सगळे तांदूळ फरशीवर सांडले होते व मयुरी शिंकत होती.

‘काय गं काय झालं?’ त्याने काळजीने विचारले व तिला प्रेमाने सोफ्यावर आणून बसवले.

‘अहो, मला अचानक शिंका येत आहेत.’ तिने म्हटले.

‘येऊ देत. काही हरकत नाही. चल आपण डॉक्टरकडून जाऊ. शिंकावरील औषध आणू.’ दीपकने प्रेमाने म्हटले व घरभर पसरलेले तांदूळ त्याने गोळा केले व झाडू घेऊन फरशी स्वच्छ केली.

‘सॉरी ! मघाशी तुम्हाला एक शिंक आली तर मी वाट्टेल तसे बोलले आणि मला इतक्या शिंका आल्या तरी तुम्ही माझ्याशी प्रेमाने बोलताय. डॉक्टरांकडे घेऊन जाताय. तुमचं माझ्यावर खरंच किती प्रेम आहे. मी तुम्हाला उगाचंच बोलते. मला माफ करा.’ मयुरीने असं म्हटल्यावर दीपकलाही मोठ्याने शिंक आली. त्यानंतर तो ‘सत्य आहे’ एवढंच म्हणाला.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d92980 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :punePanchnama