पॅरामेडिकलचे विद्यार्थी अडचणीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पॅरामेडिकलचे विद्यार्थी अडचणीत
पॅरामेडिकलचे विद्यार्थी अडचणीत

पॅरामेडिकलचे विद्यार्थी अडचणीत

sakal_logo
By

पुणे, ता. २५ ः नंदूरबारसारख्या दुर्गम भागातून आलेला राहुल रुग्णसेवेच्या अभ्यासक्रमासाठी (पॅरामेडिकल) पुणे गाठतो. एका नामांकित महाविद्यालयात प्रवेशही मिळवतो. मात्र वसतिगृहाची व्यवस्था नसल्यामुळे त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यात महाविद्यालयात पूर्णवेळ प्राध्यापकांचा अभाव आणि शेवटच्या वर्षाला मानधनाशिवायची इंटर्नशीपमुळे त्याचे आर्थिक कंबरडेच मोडते. आज राहूलसारखे शेकडो पॅरामेडिकलच विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत.

डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून प्रयोगशाळा तंत्रज्ञ, रेडिओग्राफी तंत्रज्ञ, आपत्कालीन प्रथमोपचार आदी रूग्णसेवेतील कर्मचारी काम करतात. रुग्णसेवेसाठी आवश्यक कुशल मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत २०१३ मध्ये शासकीय महाविद्यालयांत रुग्णसेवा अर्थात पॅरामेडिकलच शिक्षण सुरू करण्यात आले. मात्र या विद्यार्थ्यांना योग्य सेवा व सुविधा नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पॅरामेडिकलचा विद्यार्थी सुरेश जाधव (नाव बदललेले) सांगतो, ‘‘वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांप्रमाणे आम्हाला सुविधा मिळत नाहीत. पदवी मिळते पण पदवीप्रदान समारंभही होत नाही. कोरोनाकाळात आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी वैयक्तीक अडचणींचा सामना करत काम केले. मात्र अजूनही शासनाने आमच्या अडचणींची दखल घेतलेली नाही.’’ कोरोना काळात पॅरामेडीकलच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या सुविधा देण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. मात्र पॅरामेडीकलच्या मागण्या अजूनही प्रलंबीत असल्याचे विद्यार्थ्यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

विद्यार्थ्यांच्या मागण्या

- पूर्णवेळ प्राध्यापकांसह वर्ग खोल्या आणि वसतिगृहाची स्वतंत्र व्यवस्था
- शेवटच्या वर्षाला इंटर्नशीपला वैद्यकीयप्रमाणे मानधन मिळावे.
- डीएमईआर मार्फत नोकर भरती करावी
- सरकारी रुग्णालयांतील सर्व प्रकारच्या तंत्रज्ञांची भरती करावी

चौथ्या वर्षाला इंटर्नशिप अनिवार्य करण्यात आली आहे. निश्चितच ही चांगली गोष्ट आहे, पण वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांप्रमाणे आम्हाला मानधन मिळत नाही. आधीच कोणत्याच सुविधा नसल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडले असल्यामुळे चौथे वर्ष मानधनाशिवाय पूर्ण करणे आव्हानात्मक जाते. या काळात निवास आणि भोजन व्यवस्थेसाठी उसने पैसे घेऊन खर्च करावा लागतो.
- श्वेता परदेशी (नाव बदललेले), पॅरामेडिकल विद्यार्थिनी, नागपूर

वैद्यकीय अभ्यासक्रमांप्रमाणे आम्हालाही पूर्णवेळ प्राध्यापक, वसतिगृहाची व्यवस्था आणि इंटर्नशिपकाळात मानधन मिळायला हवे. कोरोना काळात राहण्याची व्यवस्था नसतानाही पॅरामेडीकलच्या विद्यार्थ्यांनी इंटर्नशीपमध्ये जीव तोडून कामे केली. मात्र त्यांना कोणतेच मानधन मिळाले नाही. नव्या सरकारने आमच्या मागण्यांची दखल घ्यावी.
- महेंद्र भोये, पॅरामेडिकल विद्यार्थी, पुणे

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d93491 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..