‘एफआरपी’पोटी ४२ हजार कोटी जमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘एफआरपी’पोटी ४२ हजार कोटी जमा
‘एफआरपी’पोटी ४२ हजार कोटी जमा

‘एफआरपी’पोटी ४२ हजार कोटी जमा

sakal_logo
By

पुणे, ता. २५ : राज्यात नुकत्याच झालेल्या गाळप हंगामात दोनशेपैकी ८९ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊस बिलापोटी संपूर्ण एफआरपी (रास्त आणि किफायतशीर दर) दिली आहे. तर, उर्वरित १११ कारखान्यांनी शेतकऱ्यांना अद्याप पूर्ण एफआरपी दिलेली नाही. या कारखान्यांकडे एक हजार २९१ कोटी रुपये इतकी एफआरपी थकीत असून, सात कारखान्यांवर साखर आयुक्तांनी ‘आरआरसी’ची कारवाई केली आहे. पुढील हंगामासाठी एक ऑक्टोबरपासून ऊस गाळपाचा परवाना देण्यात येणार आहे. संपूर्ण एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांना येत्या हंगामासाठी गाळप परवाना देण्यात येणार नाही, असा इशारा साखर आयुक्तांनी दिला आहे.
महाराष्ट्रात २०२१-२२ च्या हंगामात दोनशे साखर कारखान्यांनी १ हजार ३२२ लाख टन उसाचे गाळप केले. कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या उसाच्या बिलापोटी ४३ हजार ३०२ कोटी रुपये देणे अपेक्षित होते. त्यापैकी १५ ऑगस्टअखेर ४२ हजार ११ कोटी रुपये शेतकऱ्यांना अदा केले आहेत.

सात कारखान्यांवर ‘आरआरसी’ कारवाई
ऊस नियंत्रण आदेशानुसार १४ दिवसांत शेतकऱ्यांना एफआरपी देणे बंधनकारक आहे. एफआरपी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सात कारखान्यांवर साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी ‘आरआरसी’ कारवाई केली आहे. त्यात इंद्रेश्वर शुगर मिल्स (बार्शी, जि. सोलापूर), वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना (परळी वैजनाथ, जि. बीड), भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना (उमरगा, जि. उस्मानाबाद), साईकृपा कारखाना (हिरडगाव, जि. नगर), राजगड सहकारी साखर कारखाना (भोर, जि. पुणे), जयलक्ष्मी शुगर प्रॉडक्ट्स (निवळी, जि. उस्मानाबाद) आणि किसनवीर ससाका भुईंज (वाई, जि. सातारा) या कारखान्यांचा समावेश आहे.

काही साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांसोबत दिवाळीपर्यंत पूर्ण एफआरपी देण्याबाबत करार केले आहेत. कारखान्यांनी एफआरपीपोटी ९७ टक्क्यांहून अधिक रक्कम अदा केली आहे. पुढील हंगामासाठी एक ऑक्टोबरपासून कारखान्यांना गाळप परवाना देण्यात येणार आहे. संपूर्ण एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांना गाळप परवाना देण्यात येणार नाही.
- शेखर गायकवाड, साखर आयुक्त, महाराष्ट्र

गाळप हंगाम २०२१-२२ :
गाळप हंगाम घेणारे कारखाने २००
एकूण ऊस गाळप १३२२ लाख मेट्रिक टन
देय एफआरपी ४३ हजार ३०२ कोटी
शेतकऱ्यांना दिलेली एफआरपी ४२ हजार ११ कोटी (९७ टक्के)
थकीत एफआरपी १२९१ कोटी

कारखाने आणि कंसात एफआरपी देण्याचे प्रमाण
८९ (१०० टक्के)
१०० (८० ते ९९.९९ टक्के)
८ (६० ते ७९.९९ टक्के)
३ (शून्य ते ५९.९९ टक्के)

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d93622 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..