सतरा धरणांमध्ये शंभर टक्के साठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सतरा धरणांमध्ये शंभर टक्के साठा
सतरा धरणांमध्ये शंभर टक्के साठा

सतरा धरणांमध्ये शंभर टक्के साठा

sakal_logo
By

पुणे, ता. २५ : भीमा खोऱ्यातील २६ धरणांपैकी १७ धरणे १०० टक्के भरली आहेत, तर सहा धरणांमध्ये ९० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांत जवळपास शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. धरण परिसरात समाधानकारक पाणीसाठा निर्माण झाल्याने शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला आहे.

यंदा मॉन्सूनचे वेळेवर आगमन झाले. मात्र, जूनअखेरपर्यंत पावसाने दडी मारली. त्यामुळे धरणातील पाण्याने तळ गाठला होता. धरणांमधील कमी झालेला पाणीसाठा पाहून शहरात पाणीकपातीचा निर्णय झाला होता. मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवातीला धरण परिसरात पावसाने पुन्हा हजेरी लावण्यास सुरुवात केली. त्यानंतर ऑगस्टच्या सुरुवातीपासून पावसाचा जोर कायम राहिल्याने धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली. त्यामुळे अवघ्या २० ते २५ दिवसांत सर्वच धरणात समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

जिल्ह्यातील २६ धरणांतील उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता १९८.३४ टीएमसी एवढी आहे. त्यापैकी धरणांत १९२.३४ टीएमसी म्हणजेच ९७ टक्के पाणीसाठा झाला आहे. यामध्ये मुठा खोऱ्यातील टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला या धरण साखळीत एकूण २९.१५ टीएमसी म्हणजेच १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. नीरा खोऱ्यातील धरणांत ४८.२३ टीएमसी म्हणजेच ९९.७९ टक्के पाणीसाठा झाला आहे. यामध्ये पवना, कळमोडी, चासकमान, आंध्रा, वडिवळे, शेटफळ, भाटघर, नाझरे, गुंजवणी, नीरा देवघर ही धरणे शंभर टक्के; तर कासारसाई, भामा आसखेड, वीर या धरणांत ९५ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे.

कुकडी खोऱ्यातील पिंपळगाव जोगे, येडगाव, वडज, डिंभे या धरणांत ९० टक्क्यांहून अधिक; तर माणिकडोह, चिल्हेवाडी, घोड धरणांत ७० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे. विसापूर धरणांत ०.९० टीएमसी (१०० टक्के), उजनी ५२.८० टीएमसी (१०० टक्के) व मुळशी धरणात २०.१६ टीएमसी (१०० टक्के) पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील माणिकडोह धरणात ७.४७ टीएमसी (७३.४४ टक्के), घोड ४.०२ टीएमसी (८२.४७ टक्के), तर चिल्हेवाडी धरणात १.५१ टीएमसी (७६.५५ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d93677 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..