लाडक्या लेक योजनाही ‘नकोशी’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लाडक्या लेक योजनाही ‘नकोशी’
लाडक्या लेक योजनाही ‘नकोशी’

लाडक्या लेक योजनाही ‘नकोशी’

sakal_logo
By

पुणे, ता. २६ ः मुलीच्या जन्माचे स्वागत होत असले तरी तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी गुंतवणूकही तेवढीच आवश्‍यक. यासाठी महापालिकेने यासाठी ‘लाडकी लेक दत्तक’ योजना सुरू केली. गेल्या आठ वर्षांपासून ही योजना सुरू असली तरी तिला मिळणारा प्रतिसाद कमी होत आहे. महापालिकेकडून अपुरी जनजागृती, उत्पन्नाची अट अन दुसरीकडे १० हजार रुपये सुद्धा पालकांकडे नसणे यामुळे लेकीला आर्थिक सुरक्षा देणारी योजना लाभार्थ्यांपासूनच दूर असल्याची स्थिती आहे. गेल्यावर्षी केवळ २२ मुलींनाच याचा लाभ मिळाला आहे.
वंशाला दिवा हवा यापासून ते मुलीचे शिक्षण, लग्न याचा खर्च नको म्हणून मुलगाच हवा अशी मानसिकता समाजात आहे. त्यामुळे मुलींचा जन्मदरही कमी आहे. ही मानसिकता बदलावी, गरीब कुटुंबातील मुलींना आधार मिळावा यासाठी महापालिकेने २०१४-१५ मध्ये ‘लेक लाडकी दत्तक’ योजनेची अंमलबजावणी सुरू केली. त्यावेळी मोठा गाजावाजा करून ही योजना सुरू करण्यात आली. शहरात मोठ्याप्रमाणात जनजागृती झाली, नगरसेवकांकडून पुढाकार घेण्यात आला. त्यामुळे अल्प उत्पन्न गटातील नागरिकांकडून या योजनेला प्रतिसाद दिला. दरवर्षी सुमारे अडीच हजार मुलींना या योजनेचा लाभ देण्याचा मानस त्याकाळी व्यक्त केला होता. पण पहिल्या वर्षी ३५५ मुलींच्या नावाने सुरक्षा ठेव ठेवण्यात आली आहे. पण त्यानंतर दरवर्षी लाभार्थी मुलींची संख्या कामी होत गेली आहे.
पुणे शहरात दरवर्षी किती मुले आणि मुली जन्माला येतात, त्यातील पुणे महापालिकेच्या रुग्णालयात जन्माला आलेल्या मुला, मुलींची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे उपलब्ध नाही. पण दरवर्षी सरासरी ५० हजार अपत्य जन्माला येतात, त्यापैकी सुमारे २४ हजार मुली आहेत. तर यापैकी महापालिकेच्या रुग्णालयात पाच ते सात हजार मुलींचा जन्म होतो. त्यापैकी ९० टक्के मुली या अल्प उत्पन्न गटातील कुटुंबातील आहेत. महापालिकेच्या दवाखान्यात जन्म घेणाऱ्या बहुतांश मुली या योजनेमध्ये समाविष्ट होऊ शकतात, पण समाज विकास विकास, आरोग्य विभाग यांच्यात असलेला समन्वयाचा अभाव व अपुरी जनजागृती यामुळे या योजनेचा गरजवंतांना लाभ मिळत नाही.

नगरसेवकांकडून प्रयत्न कमी
योजनेची सुरवात झाली तेव्हा अनेक नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात मोठ्याप्रमाणात जनजागृती केली. हक्काचा मतदारासोबत ऋणांनुबंध ठेवण्यासाठी १० हजार रुपयांची मदत करून योजना सुरू करून दिली. मात्र, त्यानंतर नगरसेवकांनी लाभार्थी वाढवावेत यासाठी प्रयत्न केले नाहीत.

या आहेत योजनेच्या अटी
- संबंधित कुटुंब तीन वर्षांपेक्षा जास्त महापालिकेच्या हद्दीत वास्तव्यास असणे आवश्‍यक
- कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत असल्याचा पुरावा
- मुलीच्या जन्मानंतर एका वर्षात महापालिकेकडे अर्ज करणे बंधनकारक
- दुसऱ्या अपत्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झालेली असणे अनिवार्य

असा मिळतो लाभ
- पहिल्या मुलीसाठी ४० हजार रुपये महापालिका भरते
- जर दुसऱ्या मुलीसाठी असेल तर २० हजार रुपये महापालिका भरते
- पालकांनी योजनेसाठी १० हजार रुपयांचा सहभाग देणे आवश्‍यक
- राष्ट्रीयकृत बँकेत मुलगी, पालक आणि महापालिका यांच्या नावाने ठेव ठेवली जाते
- मुलीचे १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम मुलीला मिळते
- शिक्षण व इतर कारणांसाठी मुलीला किमान दोन लाख रुपये मिळू शकतील

काय आहेत अडचणी
- महापालिकेच्या समाज विकास विभाग, आरोग्य विभागात समन्वय नाही
- महापालिकेच्या रुग्णालयात योजनेची माहिती पालकांना दिली जात नाही

- अल्प उत्पन्न गटातील कुटुंबाला १० हजार रुपयांची गुंतवणूक करणे अवघड होते
- पालकांचे समुपदेशन करणे आवश्‍यक

वर्ष - लाभार्थी संख्या
२०१४-१५ - ३५५
२०१५-१६ - ७८
२०१६-१७ - ११४
२०१७-१८ - माहिती उपलब्ध नाही
२०१८-१९ - माहिती उपलब्ध नाही
२०१९-२० - ७८
२०२०-२१ - २२

महापालिकेतर्फे लेक लाडकी योजनेसाठी पात्र नागरिकांनी अर्ज करावेत यासाठी आम्ही क्षेत्रीय कार्यालयांना माहिती देतो, बचत गटांच्या बैठकीत महिलांना ओळखीतील लाभार्थ्यांना माहिती द्या असे आवाहन केले जाते. पण तरतूद उपलब्ध असूनही अर्ज केले जात नाहीत. अनेकदा गरीब कुटुंबाकडे १० हजार रुपये नसल्यानेही ते यासाठी अर्ज करत नाहीत. पण लाभार्थी वाढविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
- आर. आर. चव्हाण, समाज विकास अधिकारी

माझ्या मुलीसाठी आम्ही महापालिकेच्या योजनेत सहभाग घेतला आहे. आमच्याकडेही १० हजार रुपये नव्हते, पण माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांनी आम्हाला मदत केली. आता माझी मुलगी चौथीत आहे, पुढच्या काही वर्षात मोठी रक्कम आम्हाला मिळेल. त्यातून तिचे शिक्षण पुढे सुरू ठेवता येईल. आपल्या मुलीच्या सुरक्षीत भविष्यासाठी नागरिकांनी महापालिकेच्या योजनेत सहभाग नोंदवावा.
- सविता नांगरे, जनवाडी

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d93804 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..