आजीच्या प्रसंगावधानाने टळले नातीचे अपहरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजीच्या प्रसंगावधानाने टळले नातीचे अपहरण
आजीच्या प्रसंगावधानाने टळले नातीचे अपहरण

आजीच्या प्रसंगावधानाने टळले नातीचे अपहरण

sakal_logo
By

पुणे, ता. २६ : बालवाडीत शिकणाऱ्या मुलीची आत्या असल्याचे शाळेच्या सुरक्षारक्षकास सांगून एका महिलेने मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखत आजीने हा प्रकार उधळून लावला. तसेच सुरक्षारक्षकास हा प्रकार सांगून संबंधित महिलेस पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना खडकी येथील एका शाळेच्या आवारात घडली.

छाया युवराज शिरसाट (वय २८, रा. अकोला) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची मुलगी बालवाडीत असून ती व त्यांचा पुतण्या खडकीतील एका शाळेत शिक्षण घेतात. दररोज फिर्यादीची आई मुलांना शाळेमध्ये सोडण्यासाठी व आणण्यासाठी जातात. दरम्यान, बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास संबंधित शाळेतील बालवाडीतील मुलांना सोडण्यात आले. त्यावेळी छाया शिरसाट हिने प्रवेशद्वाराजवळील सुरक्षारक्षकास संबंधित मुलीची आपण आत्या आहोत, असे सांगून मुलींना घेऊन जाऊ लागली. त्याचवेळी प्रवेशद्वाराजवळ थांबलेल्या फिर्यादीच्या आई व मुलीच्या आजीला हा प्रकार निदर्शनास आला. एक महिला आपल्या नातीला घेऊन जात असल्याचे पाहिल्यानंतर तिला जाब विचारला, तेव्हा शिरसाट हिने आपण मुलीची आत्या असल्याचे सांगितले. या प्रकारानंतर सुरक्षारक्षकाला आवाज देत शिरसाट हिला पकडून ठेवले. त्यानंतर या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना देऊन शिरसाट हीस पोलिसांच्या ताब्यात दिले. महिलेस न्यायालयात हजर केल्यानंतर तिची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली.

मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती
पोलिसांनी संबंधित महिलेची चौकशी केली, तसेच सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तेव्हा, संबंधित महिला एसटीने पुण्यात आल्याचे, तसेच मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास एका घरामध्ये काम मागण्यासाठी गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी अधिक माहिती घेतली, तेव्हा संबंधित महिला वर्धा येथील असून ती पतीपासून वेगळी राहात असल्याची व महिलेची मानसिक स्थिती ठीक नसल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली.

संबंधित महिला अकोला येथील असून तिला ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशीमध्ये संबंधित महिलेची मानसिक स्थिती व्यवस्थित नसल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहोत. पालकांनीही शाळा, शिक्षकांशी दररोज संपर्क ठेवावा.
- दत्ता चव्हाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, खडकी पोलिस ठाणे

आमच्या मुलांच्या शाळेने मुलांचे दोन ओळखपत्र तयार केले आहेत. एक विद्यार्थ्याकडे तर दुसरे पालकांकडे असते. संबंधित ओळखपत्र पाहिल्याशिवाय मुलांना सोडले जात नाही. मुलांना वेळेपूर्वी नेण्यासाठीही व्हॉटस्ॲप, ई-मेलद्वारे अर्ज करावा लागतो. शाळेचे शिक्षक अनोळखी व्यक्तींकडे मुलांना सोपवित नाहीत.
- वैशाली काळोखे, पालक

मुलांच्या सुरक्षिततेसाठी अशी घ्या काळजी
- शाळांनी वर्गशिक्षक आणि पालकांची भेट घडवून आणावी
- शाळा सुटल्यावर वर्गशिक्षकांनी मुलांना त्यांच्या-त्यांच्या पालकांकडेच सोपवावे
- विद्यार्थी स्कूल बस, स्कूल व्हॅनने जात असल्यास शिक्षक, शिपाई, महिला कर्मचाऱ्यांनी स्वत: जातीने लक्ष द्यावे
- शाळांनी रोज मुलांना ने-आण करणाऱ्या पालकांची नोंद ठेवावी
- पालकांकडे विद्यार्थ्यांचे एक ओळखपत्र द्यावे, असे ओळखपत्र असल्यास विद्यार्थ्यांना सोडावे
- शाळेच्या आवारात तसेच बाहेरच्या बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे कटाक्षाने बसवावेत
- पालकांव्यतिरिक्त अन्य माणसांकडे विद्यार्थ्यांना सोपवू नये.
- पालकांना अडचण असल्यास शिक्षकावर विद्यार्थ्यांची जबाबदारी सोपवावी
- पालकांशी फोन, ईमेल, व्हॉटस्ॲपद्वारे तत्काळ संपर्क साधावा

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d93817 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..