‘द्रुतगती’वर उभारणार ‘एचटीएमएस’ प्रणाली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘द्रुतगती’वर उभारणार ‘एचटीएमएस’ प्रणाली
‘द्रुतगती’वर उभारणार ‘एचटीएमएस’ प्रणाली

‘द्रुतगती’वर उभारणार ‘एचटीएमएस’ प्रणाली

sakal_logo
By

पुणे, ता. २६ ः पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बहुचर्चित व बहुप्रतिक्षित एचटीएमएस (हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम) उभारण्याचे काम सुरू झाले. ३४० कोटी रुपये खर्चून ही यंत्रणा उभी केली जात आहे. सर्व प्रकारच्या चाचणीसह ही यंत्रणा अस्तित्वात येण्यास आणखी एक वर्षे लागेल. यासाठी संपूर्ण मार्गांवर ९३ ठिकाणी ३७० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील. त्यामुळे अति वेगाने वाहन चालविणे, लेन कटिंग करणे, यांच्यावर तत्काळ कारवाई करणे सोपे होईल. शिवाय मार्गाच्या दोन्ही बाजूच्या प्रवेशालाच वाहनांचे वजन केले जाईल. त्यामुळे ओव्हरलोड वाहनांचा शोध घेऊन त्यांच्यावर सुरुवातीलाच कारवाई करणे सोपे होणार आहे. एचटीएमएस प्रणाली असलेला पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग हा देशातला पहिला मार्ग ठरणार आहे.

पुणे-मुंबई या दोन महानगरांना जोडणाऱ्या द्रुतगती मार्गांवर गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडी व वाढत्या अपघातांमुळे सामान्य प्रवासी मेटाकुटीला आला होता. माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर राज्य सरकारने या मार्गावर एचटीएमएस प्रणाली कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एमएसआरडीसीने (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) कामदेखील सुरू केले आहे. पीपीपी तत्त्वावर ही यंत्रणा विकसित केली जात आहे. याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पहिली १० वर्षे संबंधित ठेकेदाराकडे असेल. दहा वर्षांनंतर मात्र ‘एमएसआरडीसी’कडे ही जबाबदारी येणार आहे. यासाठी एकूण ३४० कोटींचा खर्च अपेक्षित असून, यातील ४० कोटींचा खर्च एमएसआरडीसी करणार आहे.

‘एचटीएमएस’मुळे काय होईल?
‘एचटीएमएस’ या प्रणालीमुळे द्रुतगती मार्गावरील वाहतुकीवर ‘सीसीटीव्ही’च्या माध्यमातून बारीक लक्ष ठेवले जाईल. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करणे सोपे होणार आहे. शिवाय मार्गावर कोठे अपघात झाला अथवा वाहतूक कोंडी झाली, तर तत्काळ याची माहिती संबंधित यंत्रणेला मिळणार आहे. अपघातानंतर नेमके लोकेशनची माहिती मिळेल. त्यामुळे पोलिस व रुग्णवाहिकांना वेळेत पोचून जखमींना तत्काळ वैद्यकीय उपचार मिळण्यास मदत होईल.

...याला बसेल चाप!
द्रुतगती मार्गावर अति वेगाने वाहन चालविणे, बेकायदेशीरपणे थांबणारे, विरुद्ध बाजूने वाहन चालविणे, लेन कट करणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, सीट बेल्ट न वापरणे, पादचारी क्रॉसिंग, टेल लाइट व रिफ्लेक्टरशिवाय वाहन चालविणे, फॅन्सी नंबर प्लेटची वाहने, ओव्हरलोड वाहने तसेच प्रतिबंधित क्षेत्रात दुचाकी चालविणे आदी वाहनांवर कारवाई करून त्याला चाप बसविला जाणार आहे.

...असे आहे ‘एचटीएमएस’
- ३९ ठिकाणी वाहनांची गती मोजली जाईल
- ३४ ठिकाणी लेन कटिंग शोधले जाईल
- द्रुतगती मार्गाच्या सर्व ठिकाणच्या प्रवेशाच्या ठिकाणी माल वाहतुकीच्या वाहनांसाठी वजन करणारी यंत्रणा असेल
- १३० ठिकाणी वाहतुकीवर नजर.
- ११ ठिकाणी हवामान निरीक्षण प्रणाली
- चार मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन
- लोणावळा येथे कमांड व कंट्रोल सेंटर

नियमांचे उल्लंघन केल्यास...
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर तत्काळ चलन बनविले जाईल. त्याला पुरावे म्हणून सर्व फोटो जोडले जातील. संबंधित वाहन मालकाला चलन पाठविले जाईल. टोल प्लाझा, ऑनलाइन पद्धतीने, वाहतूक पोलिसांकडे, फूड मॉल्समधील किओस्कद्वारे हा दंड वसूल केला जाईल.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d93886 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..