प्रवासी, रिक्षाचालक भाडेवाढीवरून समोरासमोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रवासी, रिक्षाचालक भाडेवाढीवरून समोरासमोर
प्रवासी, रिक्षाचालक भाडेवाढीवरून समोरासमोर

प्रवासी, रिक्षाचालक भाडेवाढीवरून समोरासमोर

sakal_logo
By

पुणे, ता. २९ ः रिक्षाची नवी दरवाढ १ सप्टेंबरपासून लागू होत आहे. त्यासाठी ‘आरटीओ’ने मीटरचे कॅलिब्रेशन (प्रमाणीकरण) करण्यासाठी दोन महिन्यांचा अवधी दिला. मात्र, तो पुरेसा तर नाहीच शिवाय या दोन महिन्यांत प्रवासी व रिक्षा चालकांत वाद होण्याची चिन्हे आहे. कारण, रिक्षाचालक नव्या दराप्रमाणे पैशांची मागणी करतील तर मीटरमध्ये तो दर दिसत नसल्याने रिक्षाचालक व प्रवाशांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.

प्रादेशिक परिवहन समितीने पुणे, पिंपरी व बारामती क्षेत्रात रिक्षाची भाडेवाढ केली. मात्र, रिक्षा मीटरचे कॅलिब्रेशन (प्रमाणीकरण) करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी दिला. रिक्षाची संख्या लक्षात घेता दोन महिन्यांत कॅलिब्रेशन होणे अशक्य आहे. त्यामुळे आरटीओ व रिक्षा चालकांची डोकेदुखी वाढणार आहे. जोपर्यंत कॅलिब्रेशन होत नाही, तो पर्यंत नवीन दराप्रमाणे भाडे आकारायचे नाही, हा नियम आहे. मात्र, अनेक रिक्षाचालक याचे उल्लंघन करतात. त्यामुळे कॅलिब्रेशन वादाचे कारण ठरेल, यात शंका नाही.

पुणे, पिंपरी व बारामती क्षेत्राचा विचार करता जवळपास सव्वालाख रिक्षा आहेत. त्या सर्व रिक्षांच्या मीटरचे प्रमाणीकरण करावे लागणार आहे. यासाठी आरटीओने १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे, मात्र अवघ्या दोन महिन्यांत सव्वा लाख रिक्षांचे प्रमाणीकरण करणे अवघड आहे. मीटरच्या प्रमाणीकरणाची प्रक्रिया वेळखाऊ असून ती आता कालबाह्य झाल्याचे रिक्षा संघटनांचे म्हणणे आहे. यासाठी आरटीओचे मोठे मनुष्यबळ खर्ची पडते. त्यामुळे रिक्षा संघटनांनी टेरिफ कार्ड सुरु करावे; अथवा मोबाईल बेस ॲपवर रिक्षांचे दर ठरविण्याची मागणी केली. मात्र त्यास आरटीओ तयार नाही. त्यामुळे मीटर प्रमाणीकरणाची पारंपरिक पद्धत सुरु आहे.


कसे होते प्रमाणीकरण?
सर्वात आधी मीटरमध्ये टेरिफ संदर्भातले सॉफ्टवेअर अपलोड करावे लागते. त्यानंतर संबंधित कंपनीकडून प्रमाणपत्र दिले जाते. ते प्रमाणपत्र आरटीओच्या निरीक्षकांना दाखवावे लागते. त्यानंतर टेस्ट ट्रॅकवर मीटरसाठीची चाचणी होते. यावेळी रिक्षा २१०० मीटर धावते. त्याप्रमाणे मीटरचे रीडिंग बरोबर येते की नाही, हे आरटीओचे निरीक्षक तपासतात. त्यात काही बदल झाला तर निरीक्षक त्या टेस्टमध्ये रिक्षा चालकाला नापास करतात. त्यामुळे त्यांना पुन्हा चाचणी द्यावी लागते.

याठिकाणी होते चाचणी....
दिवे घाट, आळंदी रस्त्यावरील आरटीओ कार्यालय, खराडी आयटी पार्क, कर्वेनगर- अलंकार पोलिस चौकी, राम टेकडी औद्योगिक क्षेत्र या ठिकाणी चाचणी होते. त्यासाठी रिक्षा चालकांना पहाटे चार-पाच वाजल्यापासूनच रांगेत थांबावे लागते. एका दिवसात सरासरी दीड ते दोन हजार रिक्षांच्या मीटरचे प्रमाणीकरण होते.


कॅलिब्रेशनसाठी दिलेला कालावधी पुरेसा आहे. आवश्यकता भासल्यास अतिरिक्त मनुष्यबळ देऊ व चाचणीची ठिकाणे वाढवू. मात्र, दोन महिन्यांतच मीटरचे कॅलिब्रेशन पूर्ण करू.
- डॉ. अजित शिंदे,
प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे


पुणे आरटीओने टेरिफ कार्डची पद्धत सुरु करावी अथवा मोबाईल ॲपच्या साह्याने रिक्षाचे भाडे ठरविता येते. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून एकावेळी सर्व मीटरचे कॅलिब्रेशन करावे. म्हणजे रिक्षा चालकांचा वेळ वाचेल.
- नितीन पवार,
सरचिटणीस, रिक्षा पंचायत, पुणे

मीटर कॅलिब्रेशन ही अत्यंत वेळखाऊ प्रक्रिया आहे. शिवाय यामुळे रिक्षा चालकांचे आर्थिक नुकसान होते. तेव्हा ही पद्धत रद्द करावी. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा.

- आनंद अंकुश,
अध्यक्ष, आम आदमी रिक्षा चालक संघटना, पुणे

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d94530 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..