वाहतुकीच्या नियमनासाठी १०० वॉर्डनची नेमणूक मुख्यमंत्री शिंदे : मुंबईकडे परतताना चांदणी चौकात पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहतुकीच्या नियमनासाठी १०० वॉर्डनची नेमणूक
मुख्यमंत्री शिंदे : मुंबईकडे परतताना चांदणी चौकात पाहणी
वाहतुकीच्या नियमनासाठी १०० वॉर्डनची नेमणूक मुख्यमंत्री शिंदे : मुंबईकडे परतताना चांदणी चौकात पाहणी

वाहतुकीच्या नियमनासाठी १०० वॉर्डनची नेमणूक मुख्यमंत्री शिंदे : मुंबईकडे परतताना चांदणी चौकात पाहणी

sakal_logo
By

पुणे, ता. २८ : ‘‘चांदणी चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी येथील जुना पूल पुढील पंधरा दिवसात जमीनदोस्त करण्यात येईल. मात्र, सोमवारपासूनच चौकातील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी १०० वॉर्डनची तत्काळ नेमणूक करण्यात आली आहे. सेवा रस्तेही तत्काळ जोडून कोंडी फोडण्यात येईल. त्यामुळे सोमवारपासूनच नागरिकांना दिलासा मिळेल,’’ असे आश्‍वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिले. महाबळेश्वरहून रविवारी मुंबईकडे परतत असताना दुपारी चार वाजण्याच्या सुमारास चांदणी चौकात थांबून तेथील सद्यःस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली.

या वेळी शिंदे म्हणाले, ‘‘येथील काम युद्धपातळीवर करण्यात येईल. जुना पूल तोडण्यापर्यंत चांदणी चौकामध्ये सोमवारपासून तातडीने १०० वॉर्डनची नेमणूक केली जाईल. तसेच जड वाहतूकही वर्दळीच्यावेळी नियमित करता येईल, असा निर्णय घेतला आहे. या भागातील नागरिकांना होणारा त्रास कमी करण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. या ‍प्रश्नाचे गांभीर्य ओळखून मी स्वतः या ठिकाणी येऊन प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, युद्ध पातळीवर कामही सुरू आहे. सोमवारपासूनच नागरिकांना दिलासा मिळेल. नोएडा येथील ट्विन्स इमारती जमीनदोस्त करण्याचे काम करणारी एजन्सी दोन दिवसात येथील पाहणी करेल, त्यानंतर पुढील पंधरा दिवसांत चांदणी चौकातील जुना पूल तोडून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येईल. सेवा रस्ते एकमेकांना जोडण्यात येतील. सरकार लोकांना दिलासा देण्यासाठी प्रयत्नशील आहे.’’

शहरातील रिंगरोडच्या नियोजनासाठीची बैठक लवकर घेतली जाईल. तसेच जिल्ह्यांना पालकमंत्रीही देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, राज्यातील सत्ता परिवर्तनावर भाष्य करणाऱ्या गणेशोत्सवातील एका मंडळाच्या ‘सत्तामंथन’ या देखाव्याला परवानगी नाकारण्याच्या प्रश्‍नाबाबत त्यांनी माहिती घ्यावी लागेल, असे सांगितले.

हद्दीचा वाद नंतर, आधी मदत करा!
चांदणी चौकामध्ये अपघात घडल्यास पुणे, पिंपरी-चिंचवड व ग्रामीण पोलिसांकडून हद्दीचा वाद घालून संबंधित विषय एकमेकांकडे टोलविला जात असल्याच्या प्रश्‍नाबाबत शिंदे म्हणाले, ‘‘पोलिस प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. पोलिसांच्या हद्दीचा विषय नंतर येतो, आधी अपघातग्रस्तांना तत्काळ मदत देण्याच्या सूचना केल्या आहेत. पोलिस व संबंधित विभागांनीही एखादी दुर्घटना घडल्यास आधी मदत द्यावी, हद्दीचा मुद्दा नंतर ठरवावा. भविष्यात असा विषय येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘तो’ गोंधळ मिटविला आहे
महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, महापालिका, पोलिस यांमध्ये येथील परिस्थितीबाबत समन्वय नाही, त्यांच्यात कायम गोंधळ सुरू असतो, याविषयी विचारलेल्या प्रश्‍नावर शिंदे म्हणाले, ‘‘संबंधित विभागांमधील गोंधळ सध्या मिटविलेला आहे. यापुढे या विभागांमध्ये योग्य समन्वय असेल.’’

‘द्रुतगती’वरही कोकणवासीयांना टोलमाफी
मुंबई-गोवा द्रुतगती महामार्गाचे सध्या काम सुरू आहे, त्यामुळे गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांना अडचणी येत आहेत. त्यामुळे त्या मार्गाने तसेच पुणे-कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्या नागरिकांना टोलमाफी करावी, अशी मागणी केली जात होती. तसेच, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरूनही कोकणात जाणाऱ्यांनाही टोलमाफी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d94603 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..