चांदणी चौकातील कोंडी, गैरसोयीबाबत चर्चाच नाही पूल पाडल्यानंतर होणाऱ्या परिस्थितीबाबत नागरिकांसह पोलिसही साशंक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चांदणी चौकातील कोंडी, गैरसोयीबाबत चर्चाच नाही
पूल पाडल्यानंतर होणाऱ्या परिस्थितीबाबत नागरिकांसह पोलिसही साशंक
चांदणी चौकातील कोंडी, गैरसोयीबाबत चर्चाच नाही पूल पाडल्यानंतर होणाऱ्या परिस्थितीबाबत नागरिकांसह पोलिसही साशंक

चांदणी चौकातील कोंडी, गैरसोयीबाबत चर्चाच नाही पूल पाडल्यानंतर होणाऱ्या परिस्थितीबाबत नागरिकांसह पोलिसही साशंक

sakal_logo
By

पुणे, ता. २८ : पुरेशी पर्यायी व्यवस्था अजूनही तयार नसतानाही चांदणी चौकातील एनडीए-पाषाण रस्त्याला जोडणारा जुना पूल पाडल्यानंतर होणाऱ्या वाहतूक कोंडीचा नागरिकांनी आतापासूनच धसका घेतला आहे. वारजे, कोथरूडहून पाषाण, बावधनकडे जाणाऱ्या तसेच मुंबईहून आलेल्यांना बावधन-पाषाणकडे जाताना प्रचंड गोंधळ उडणार आहे. पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने वाहतुकीचे नियोजन करणार तरी कसे? असा प्रश्‍न सर्वसामान्य नागरिकांसह पोलिसांनाही पडला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना दिल्यानंतर शनिवारी सर्व विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चांदणी चौक येथे भेट देऊन एनडीए-पाषाणला जोडणारा जुना पूल पाडून टाकण्याचे निश्‍चित केले. रविवारी मुख्यमंत्री शिंदे यांनी परतीच्या प्रवासात चांदणी चौकामध्ये पाहणी केल्यानंतरही अधिकाऱ्यांनी मांडलेल्या सूचनांचा पुनरुच्चार केला. मात्र मुळशीकडून पाषाण, बावधन, कोथरूडकडे जाणाऱ्या वाहनांसाठी अजूनही ठोस पर्यायी मार्ग ठरलेला नाही. पोलिसांकडून एनडीए चौकमार्गे कोथरूड अंडरपासची चाचपणी केली जात असली, तरीही त्यामुळे कोंडीमध्ये आणखीनच भर पडण्याची चिन्हे असल्याने पोलिसही त्याबाबत अधिक साशंक आहेत. तर पूल पाडल्यानंतर सर्वच रस्त्यांवर काही दिवस तरी होणाऱ्या प्रचंड कोंडीच्या शक्‍यतेबाबत मुख्यमंत्र्यांना कल्पना देण्याचे धाडस कोणी दाखवले नाही ही वस्तुस्थिती आहे.

मनुष्यबळ मिळेल, पण पायाभूत सुविधेचे काय?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १०० वॉर्डन देण्याची घोषणा केली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनीही सूस-पाषाणसाठी स्वतंत्र वाहतूक विभागाची निर्मिती करून त्यासाठी आवश्‍यक मनुष्यबळही देण्याचे निश्‍चित केले आहे. त्यामुळे चांदणी चौकामध्ये मनुष्यबळ उपलब्ध होईल, मात्र वारज्याहून चांदणी चौकातून पुढे जाण्यासाठी पर्यायी रस्ते मर्यादित असल्याने आणि मुळशीकडून कोथरूड, साताऱ्याकडे जाण्यासाठीचा पुलही अद्याप पूर्ण नसल्याने पुन्हा वाहतूक कोंडी होण्याची चिन्हे आहेत.

मुळशीकडून कोथरूडकडे जाणाऱ्या वाहनांचा उडणार गोंधळ
मुळशी, एनडीए चौकामार्गे कोथरूडला जाण्यासाठीचा मार्ग सध्या बंद आहे. मात्र एनडीए-पाषाण जुना पूल पाडण्यापूर्वी मुळशीकडून कोथरूडला जाण्यासाठी एनडीए चौकातून कोथरूड अंडरपासमार्गे वाहतूक सुरू करण्याचा वाहतूक शाखेचा प्रयत्न आहे. मात्र त्यामुळे कोथरूड अंडरपास येथे दोन्हीकडून येणारे रस्ते एकत्र मिळत असल्याने गोंधळात अधिकच भर पडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

पूल पाडल्यानंतरच्या कोंडीचे काय?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील १५ दिवसांमधील वाहतूक नियोजन, मनुष्यबळ व पूल पाडण्याबाबतची माहिती दिली. मात्र १५ दिवसानंतर उद्‌भवणाऱ्या कोंडीबाबत त्यांनी कुठलेही भाष्य केले नाही. या कोंडीचा प्रश्‍न गंभीर होण्याची शक्‍यता असूनही मुख्यमंत्र्यांना त्याबाबत माहिती देण्याचे धाडस प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दाखविले नसल्याची स्थिती आहे.

मुळशीकडून कोथरूडकडे जाण्यासाठी जुना पूल वापरता जातो, पण हा पूल पाडल्यानंतर आम्ही कोथरूडला जाणार कसे? एनडीए चौकातून कोथरूड अंडरपासकडे जाण्याचा पर्यायी मार्ग अजून तरी तयार नाही. हा विचार कोण आणि केव्हा करणार?
- कनिका राघवन, विद्यार्थिनी, भूगाव

पूल पाडल्यानंतर वारज्याहून थेट चांदणी चौकात जाता येणार नाही. त्यामुळे एक-दीड किलोमीटर अलीकडूनच वेदभवन समोरून, एनडीए चौक येथून मुळशी रस्त्याने महामार्गाला मिळणाऱ्या नव्या रॅम्पने पुढे जावे लागणार आहे. तेथील रस्ता पाहता किमान दोन तास तरी नव्या वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची शक्‍यता वाटत नाही.
- अनिकेत कारला, संगणक अभियंता

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d94618 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..