गावांची पाण्याची तहान भागविणारी ‘ज्ञानप्रबोधिनी’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावांची पाण्याची तहान भागविणारी ‘ज्ञानप्रबोधिनी’
गावांची पाण्याची तहान भागविणारी ‘ज्ञानप्रबोधिनी’

गावांची पाण्याची तहान भागविणारी ‘ज्ञानप्रबोधिनी’

sakal_logo
By

पुणे, ता. २९ : रस्ते आणि पाणी या पायाभूत सुविधा असतील तर ग्रामीण भागातील व्यक्तीच्या आयुष्याचा प्रवास हा अधिक सुसह्य होतो. मात्र पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक गावे आणि वस्त्या अशा आहेत की, जेथे रस्ते पोचले आहेत. मात्र पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. पिण्याच्या पाण्याची गरज जेमतेम भागते. पण उपजीविकेचे मुख्य साधन असलेल्या शेतीला पाणी मिळत नव्हते. अशा गावांना खरिपातील भातशेतीसाठी संरक्षित सिंचनाची व्यवस्था करण्याचे काम ज्ञानप्रबोधिनीने केले आहे.
ज्ञानाबरोबर पाण्याची तहान भागविण्यात ज्ञानप्रबोधिनीतील ग्राम विकसन विभागातील विवेक गिरीधारी व त्यांचे सहकारी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. गिरीधारी यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्ह्यातील भोर आणि वेल्हा तालुक्यात अनेक गावांमध्ये पाणलोट क्षेत्र विकास आणि पाणीटंचाई निवारणाची कामे करण्यात आली आहेत. पाण्याची चिंता मिटल्याने किंवा त्याची तीव्रता कमी झाल्याने ज्ञानप्रबोधिनीने केलेले हे काम ग्रामस्थांसाठी मोलाचे ठरत आहे.
याबाबत गिरीधारी यांनी सांगितले, की हवेली तालुक्यातील शिवगंगा खोऱ्यात पहिल्यांदा ज्ञानप्रबोधिनीने पाण्याविषयीचे काम सुरू केले. १९७२ च्या दुष्काळात प्रबोधिनीने मोठ्या प्रमाणात दुष्काळ निवारणाचे प्रासंगिक काम केले. परंतु पाणी प्रश्‍न मुळापासून सोडवायचा असेल तर पाणलोट क्षेत्राच्या विकासावर काम करावे लागणार होते. म्हणून सर्वप्रथम ससेवाडी आणि सणसवाडी या दोन गावांत प्रायोगिक तत्त्‍वावर पाण्याविषयीची कामे करण्यात आली. तेथे आलेले यश आणि अनुभवाच्या जोरावर त्याच परिसरातील अन्य १६ गावांत राज्य आणि केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत १५ हजार हेक्टर क्षेत्रावर विविध प्रकल्प राबविण्यात आले.

लोकवर्गणी, श्रमदान ठरले महत्त्वाचे
कोणतेही काम करत असताना ते शाश्‍वत ठेवण्यासाठी लोकवर्गणी आणि श्रमदान असले पाहिजे. त्यासाठी आम्ही सुरवातीपासूनच आग्रही होतो. कारण ज्या कामात ग्रामस्थ पुढाकार व सहभाग घेतात, ते काम त्यांना आपले वाटते. असे झाले तर ते त्या कामाच्या भविष्य काळातील देखभाल दुरुस्तीमध्ये सहभागी होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे ग्रामस्थांचा प्रतिसाद उत्स्फूर्त व उत्साही होता. या कामात प्रबोधिनीचे अन्य कार्यकर्ते अजित देशपांडे, सुनीता गायकवाड, प्रदीप जाधव, अनिल पालकर व सुनील जोरकर यांचादेखील मोठा सहभाग असल्याचे गिरीधारी यांनी सांगितले.

ज्ञानप्रबोधिनीने केलेली कामे
- शेततळी - ८५
- माती बंधारे - १५
- सिमेंट बंधारे - १५
- विहिरींची निर्मिती - ३५
- पाणी साठवणुकीच्या टाक्या - ५६

विविध प्रकल्पांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची उपलब्धता वाढवत गावातील पाणीटंचाई कमी करण्यावर आमचा सध्या अधिक भर आहे. त्यासाठी ग्रामस्थांशी संवाद साधून तेथे नेमके काय काम करायचे, यावर चर्चा घडवून आणली. जुन्या विहिरी खोल करणे, नवीन विहिरी बांधणे, जुन्या नळपाणी योजना दुरुस्त करणे, नवीन नळपाणी योजना करणे, पाणी साठवणुकीच्या टाक्या बांधणे आदी पर्याय त्यातून पुढे आले. तांत्रिकदृष्ट्या योग्य पर्याय निवडून त्यासाठी वैयक्तिक देणगीदार, रोटरी व इनरव्हील क्लब आणि विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडाच्या माध्यमातून निधी देणगी स्वरूपात उभा करण्यात आला. त्यामुळे अनेकांचा पाणी प्रश्‍न कायमचा सुटला आहे.
- विवेक गिरिधारी, प्रमुख, ग्राम विकसन विभाग, ज्ञानप्रबोधिनी, पुणे

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d94664 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..