जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी कसरत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी कसरत
जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी कसरत

जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी कसरत

sakal_logo
By

पुणे, ता. ३० ः माझं गाव खडकवासला. खडकवासला ग्रामपंचायतीची स्थापना सन १९७० नंतरची. पण, माझे आजोबा तुकाराम संतू मते यांचा मृत्यू १९६३ चा. खडकवासला ग्रामपंचायतीचा आता पुणे महापालिकेत समावेश झाला आहे. मात्र, पालिकेकडे समाविष्ट गावांमधील ग्रामपंचायतींच्या स्थापनेपूर्वीच्या जन्म-मृत्यूच्या नोंदीचे रेकॉर्डच उपलब्ध नाही. यामुळे या गावांमधील नागरिकांना ग्रामपंचायत स्थापनेपूर्वीचे जन्म किंवा मृत्यूचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागत आहेत. यामुळे नागरिकांचा वेळ, श्रम आणि पैसा वाया जात आहे, असा अनुभव खडकवासला येथील रहिवासी नरेंद्र मते सांगत होते.

मते हे त्यांचे आजोबा तुकाराम मते यांच्या मृत्यूचे प्रमाणपत्र घेण्यासाठी पुणे महापालिकेत गेले होते. असाच अनुभव ग्रामपंचायतीची स्थापना होण्यापूर्वी संबंधित गावात झालेल्या जन्म-मृत्यूचा दाखला काढण्यासाठी पालिकेत जाणाऱ्या नागरिकांना येत आहे. महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील जन्म-मृत्यूच्या नोंदींचे केवळ ग्रामपंचायत स्थापनेपासूनचेच रजिस्टर पालिकेकडे उपलब्ध आहे. ग्रामपंचायतीच्या स्थापनेपूर्वी तहसील कार्यालयात जन्म-मृत्यूच्या नोंदी केल्या जात, त्यामुळे अशा दाखल्यांसाठी नागरिकांना पालिकेकडून केवळ ना हरकत प्रमाणपत्र दिले जात आहे. या प्रमाणपत्राच्या आधारे न्यायालयात जाऊन संबंधित नोंदीबाबतचा न्यायालयीन आदेश मिळाल्याशिवाय तहसील कार्यालयातून हे प्रमाणपत्र उपलब्ध होत नसल्याचे मते यांनी सांगितले.

पुणे महापालिकेत २०१७ पासून आजतागायत जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील ३८ गावे समाविष्ट झाली आहेत. या सर्वच गावांच्या ग्रामपंचायतींची स्थापना ही एकावेळी झालेली नाही. काही ग्रामपंचायती या साठच्या दशकातील, तर काही ७०च्या दशकातील आहेत. ज्या ग्रामपंचायतींची स्थापना ही १९७० नंतर झाली आहे, अशाच गावांमध्ये हा पेच निर्माण झाला आहे. समाविष्ट गावांमधील ग्रामपंचायतींच्या स्थापनेपूर्वीचे जन्म-मृत्यूचे नोंदणी रजिस्टर, नोंदणी अभिलेख नोंदवह्या आणि इतर आवश्‍यक नोंदवह्या पुणे पालिकेकडे त्वरित हस्तांतरित कराव्यात, अशी मागणी मते यांनी हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, या मागणीसाठी पालिकेच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत यांनीही तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांना पत्र दिले आहे. पालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील नागरिकांच्या जन्म-मृत्यू नोंदींचे ग्रामपंचायत स्थापनेपूर्वीचे रेकॉर्ड उपलब्ध करून देण्याची मागणी बळीवंत यांनी केली आहे.

दाखल्यांची तरतूद काय?
ग्रामीण भागातील गावांमधील जन्म किंवा मृत्यूची नोंद ही जन्म किंवा मृत्यूनंतर २१ दिवसांच्या आत ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांकडे करणे बंधनकारक आहे. या कालावधीत नोंद करू न शकलेले नागरिक ग्रामसेवकाने नियमानुसार आकारलेला दंड भरून जन्म किंवा मृत्यूनंतर कमाल ३० दिवसांपर्यंत रीतसर नोंदणी करू शकतात. परंतु, हा कालावधी संपल्यानंतर कमाल एक वर्षापर्यंत संबंधित पंचायत समीतीच्या गट विकास अधिकाऱ्यांकडे अपील करून त्यांच्या आदेशाद्वारे नोंद करता येते. एक वर्षाचा कालावधी लोटून गेल्यानंतर मात्र न्यायालयाच्या आदेशाशिवाय ग्रामपंचायतीला जन्म-मृत्यूची नोंद करता येत नाही, असे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातून सांगण्यात आले.

ग्रामपंचायत स्थापनेपूर्वीची पद्धत
राज्याच्या स्थापनेनंतर अनेक गावांना ग्रामपंचायती नव्हत्या. काही गावांना जोडग्रापंचायती असतं. ज्या गावात ग्रामपंचायत आहे, अशा गावांमध्ये ग्रामसेवक हेच जन्म-मृत्यूच्या नोंद करत. परंतु, ज्या गावात ग्रामपंचायत अस्तित्वात नव्हती, अशा गावांमधील नोंदी या महसूल विभागामार्फत केल्या जात, त्यामुळे याबाबतचे नोंदणी रजिस्टर हे तहसील कार्यालयांकडे उपलब्ध आहे. मात्र, तहसीलदारांना जन्म-मृत्यूचे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार नाहीत. त्यामुळे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडून असे प्रमाणपत्र उपलब्ध करून घ्यावा लागत असे.


‘‘पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील नागरिकांना ग्रामपंचायत स्थापनेपूर्वीचा जन्म किंवा मृत्यूचा दाखला हा महापालिकेकडून मिळाला पाहिजे. हवेली तहसील कार्यालयाने
त्यांच्याकडील रेकॉर्ड पालिकेला उपलब्ध करून दिल्यास हे शक्य होईल. यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचेल. शिवाय नागरिकांना जन्म किंवा मृत्यूच्या किरकोळ प्रमाणपत्रासाठी न्यायालयात जाण्याची गरज भासणार नाही.’’
- नरेंद्र मते, रहिवासी, खडकवासला

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d95005 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..