पूर्वीच्याच जागी पुरंदर विमानतळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पूर्वीच्याच जागी पुरंदर विमानतळ
पूर्वीच्याच जागी पुरंदर विमानतळ

पूर्वीच्याच जागी पुरंदर विमानतळ

sakal_logo
By

पुणे, ता. ३० : पुरंदरमधील नियोजित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्वीच्या जागी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच पुढील प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्यामुळे आता भूसंपादन आणि मोबदल्याची रक्कम निश्‍चित करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे विमानतळाच्या रखडलेल्या कामाला पुन्हा चालना मिळण्याची चिन्हे आहेत.

पुरंदर तालुक्‍यातील पारगाव, खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण, वनपुरी आणि उदाची वाडी या सात गावांतील जमीन विमानतळासाठी यापूर्वीच निश्‍चित करण्यात आली होती. मध्यंतरी या जागेत बदल करण्यात आला. त्यामुळे विमानतळाबाबत अनिश्‍चितता निर्माण झाली होती. दरम्यान, सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये यापूर्वी निश्‍चित केलेल्या जागेवरच विमानतळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर पुढील प्रक्रिया सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले.

पुरंदर विमानतळासाठी सात गावांतील २ हजार ८३२ हेक्‍टर जागेची आवश्‍यकता आहे. जमिनीच्या मोबदल्यासाठी २ हजार ७१३ कोटी रुपये, तर फळझाडे, विहिरी, ताली आदींसाठी ८०० कोटी रुपये अशी एकूण ३ हजार ५१५ कोटी रुपयांच्या खर्चास शासनाने मान्यता यापूर्वीच दिली आहे. तसेच विमानतळाच्या भूसंपादनास येणाऱ्या खर्चासही यापूर्वीच प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मात्र भूसंपादनास विलंब झाल्याने खर्चात वाढ झाली आहे. दरम्यान, सोमवारच्या बैठकीत पूर्वीच्या जागी विमानतळ उभारण्यास आणि पुढील प्रक्रिया करण्यास राज्य सरकारने आदेश दिल्यामुळे आता भूसंपादन अधिसूचना आणि त्या पोटी द्यावयाचा मोबदला निश्‍चित करणे असा टप्पा असणार आहे. त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
----------

भूसंपादन होणारे क्षेत्र

वनपुरी - ३३९ हेक्‍टर
कुंभारवळण - ३५१ हेक्‍टर
उदाची वाडी - २६१ हेक्‍टर
एखतपूर २७१ हेक्‍टर
मुंजवडी -१४३ हेक्‍टर
खानवडी -४८४ हेक्‍टर
पारगाव - १०३७ हेक्‍टर

एकूण २ हजार ८३२ हेक्‍टर

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d95320 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..