प्रश्‍नाला उपप्रश्‍नाने उत्तर मुलाखतकारच निरुत्तर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रश्‍नाला उपप्रश्‍नाने उत्तर
मुलाखतकारच निरुत्तर...
प्रश्‍नाला उपप्रश्‍नाने उत्तर मुलाखतकारच निरुत्तर...

प्रश्‍नाला उपप्रश्‍नाने उत्तर मुलाखतकारच निरुत्तर...

sakal_logo
By

पुण्यातील एका मोठ्या बॅंकेत मुलाखतीसाठी देशभरातून उमेदवार आले आहेत. पुण्यातील सुनंदनही त्यात आहे.
मुलाखतकार : तुमचं संपूर्ण नाव काय?
सुनंदन : (खेकसत) तुम्हाला कळत नाही का? मी कामात आहे ते. चार नंबरच्या खिडकीत चौकशी करा.
मुलाखतकार (संयम ठेवत) ः तुम्ही आमच्याकडे मुलाखतीसाठी आला आहात. त्यामुळे सुरवातीला स्वतःचे नाव सांगणे अत्यावश्यक आहे.
सुनंदन ः हा काय प्रकार आहे? मुलाखतीची तयारी काय फक्त उमेदवारानेच करायची असती का? आपण ज्याची मुलाखत घेणार आहोत, त्याचं नाव-गाव आधीच माहिती करून घेता येत नाही का? माझं संपूर्ण नाव-गाव त्या अर्जावर आहे. तेवढं वाचायची तसदीसुद्दा आपण घेत नाही, याला काय म्हणावं. माणसानं किती आळशी असावं, याला काही मर्यादा. तुमच्यासारख्या लोकांमुळेच देशाची आर्थिक परिस्थिती बिघडलीय.
मुलाखतकार ः तुम्ही आमच्याशी एवढ्या उद्धटपणाने बोलत आहात, तुम्हाला वाटतं, आम्ही तुम्हाला नोकरी देऊ?
सुनंदन ः हा उद्धटपणा नाही. याला स्पष्टवक्तेपणा म्हणतात आणि तो आमच्या रक्तातच आहे. तुम्ही ज्याला उद्धटपपणा म्हणता, त्याचं प्रशिक्षण तुम्ही नोकरीला लागल्यानंतर कर्मचाऱ्यांना देताच की. त्यामुळे नोकरीला लागल्यानंतर ग्राहकांशी उद्धटपणे कसे वागावे, अशा प्रशिक्षणावर खर्च करण्यापेक्षा आमच्यासारख्या ओरिजनल स्पष्टवक्तेपणा असलेल्या माणसाला नोकरी देणं, बँकेला केव्हाही फायद्याचं आहे.
मुलाखतकार ः आमच्या बॅंकेच्या अटी व नियम तुम्हाला माहिती असतीलच, असे मी गृहित धरतो.
सुनंदन ः हे बघा, कोणालाही असं गृहित धरणं, एकदम चुकीचं आहे. काही महिन्यांपूर्वी माझी प्रेयसी मला गृहित धरून, वागायला लागली. त्यावेळी तीनवेळा तिला लेखी व तोंडी समज देऊन समजावले. त्यानंतरही तिने ऐकले नाही. त्यामुळे आमचं ब्रेकअप झालं. मी एकवेळ अविवाहित राहीन. पण माझ्या तत्वांशी तडजोड करणार नाही.
मुलाखतकार ः बरं मी बॅंकेचे अटी व नियम सांगू का?
सुनंदन ः काही गरज नाही. पण तुमच्या बॅंकेत नोकरी करताना माझ्याही काही अटी व नियम आहेत. पहिली अट म्हणजे माझ्या हातून काही चूक झाली तरी वरिष्ठांनी माझा अपमान करायचा नाही. अन्यथा त्यांना त्याच भाषेत उत्तर दिले जाईल. दुसरी अट प्रमोशन वा पगारवाढीसाठी मी कोणाच्याही पुढे-पुढे करणार नाही. या गोष्टी आपोआप झाल्या पाहिजेत. तिसरी अट म्हणजे मी कोणाच्याही धमक्यांना भीक घालणार नाही. जिथल्या तिथं सडेतोड उत्तर देईल. बॅंकेच्या कामात मी वाघ आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे शेळ्या-मेंढ्यांनी माझ्यापासून जपून राहावं.
मुलाखतकार : बॅंकेतील कॅश संपलीय पण ग्राहकांची रांग लागलीय, अशावेळी तुम्ही काय कराल?
सुनंदन : लंच ब्रेक किंवा ‘सिस्टीम हॅंग झालीय’ असा बोर्ड लावेन.
मुलाखतकार : डिमांड ड्राप्ट काढण्यासाठी आलेला ग्राहक चुकून पैसे काढायच्या रांगेत आल्यावर तुम्ही त्याच्याशी कसं वागाल?
सुनंदन : आधी मी कपाळावर आठ्याचं जाळं पसरणार. नंतर त्याच्यावर चांगलं खेकसणार. यानंतर त्याला तीन-चार खिडक्या फिरवून यायला लावणार. तुम्हाला वाचता येत नाही का? येथं फक्त पैसे काढता येतात. डिमांड ड्राफ्ट कोठं भरतात, हे मला काय माहीत? ती माहिती देणं माझं काम नाही. रांगेत उभं राहण्यापूर्वी खात्री करता येत नाही का? उगाचंच माझा वेळ वाया घालावलात. येथून फुटा पटकन.
मुलाखतकार : एखादी व्यक्ती मोठमोठ्या व्यक्तींची नावे सांगून काम करण्यासाठी तुमच्यावर दबाव टाकत असेल तर तुम्ही त्याच्याशी कसं वागाल?
सुनंदन : अशा लोकांशी वेगळं वागावं लागत. त्यांच्याशी हसून बोलणार. साहेबांची सही व्हायची आहे, असे सांगून तीन-चार तास थांबवून ठेवणार. त्यानंतर उद्या या, असे सांगून आठवडाभर हेलपाटे मारायला लावणार. आयुष्यात ती व्यक्ती बॅंकेत येऊन कोणावर दबाव टाकणार नाही, असा धडा शिकवणार.
मुलाखतकार : तुम्ही तर आमच्या बॅंकेसाठी फिट्ट बसत आहात. त्यामुळे तुम्ही उद्यापासून कामावर या किंवा आताच जॉईन झालात तरी चालेल.

सुनंदन : एवढं तातडीने मी कोणतंही काम करत नसतो. सगळं कसं तब्येतीनं करायची मला सवय आहे. त्यामुळं सवडीने मी पुढच्या महिन्यात जॉईन होईल. बरं मी चलू का? मलाही आज आठ-दहा मुलाखती घ्यायच्या आहेत.
मुलाखतकार ः तुम्ही कोणाच्या मुलाखती घेणार आहात?
सुनंदन ः अहो आताच सांगितलं नाही का, माझं ब्रेकअप झालंय. त्यामुळे नवीन प्रेयसीसाठी अर्ज मागवले होते. त्यांच्याच मुलाखती घ्यायच्या आहेत. ही जागा किती दिवस रिकामी ठेवणार? आज मुलाखत घेऊन लगेचच लेटर देणार म्हणजे लव्हलेटर हो.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d95345 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..