अधिकारी देणार नैराश्‍यग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अधिकारी देणार नैराश्‍यग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा
अधिकारी देणार नैराश्‍यग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा

अधिकारी देणार नैराश्‍यग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा

sakal_logo
By

पुणे, ता. ३० ः राज्यातील कर्जबाजारी आणि नैराश्‍याने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आता सरकारी अधिकारी गावा-गावांत जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेणार आहेत. या भेटीमध्ये अडीअडचणी जाणून घेऊन, त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यात येणार आहेत. यासाठी राज्याच्या कृषी विभागाच्यावतीने ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ हा उपक्रम सुरु करण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरवात येत्या गुरुवारी (ता.१) केली जाणार आहे.

शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी आणि त्यातून निर्माण होणारे नैराश्‍य यावर अधिकाऱ्यांना प्रभावी उपाययोजना करता याव्यात, या उद्देशाने हा खास उपक्रम सुरु केला जाणार असून तो ३० नोव्हेंबरपर्यंत चालू ठेवण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या समस्या, नैराश्‍य आणि त्यातून होणाऱ्या आत्महत्त्यांची कारणमीमांसा करता यावी. त्यातूनच सुलभ व प्रभावी कृषिविषयक धोरण तयार करता यावे, हा या उपक्रमाच्या अंमलबजावणीमागचा सरकारचा उद्देश असल्याचे कृषी विभागातील उपसचिव एच. जी. म्हापणकर यांनी सांगितले.

या उपक्रमात कृषी विभागाचे प्रधान सचिव, कृषी आयुक्त, कृषी संचालक, राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, कृषी विद्यापीठांतील सर्व विभागांचे प्रमुख, महाविद्यालयांचे अधिष्ठाता, विभागीय आयुक्त, विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक (आत्मा), कृषी विकास अधिकारी, कृषी उपसंचालक, प्रांताधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी आदी प्रमुख अधिकारी गावा-गावांत जाऊन नैराश्‍यग्रस्त शेतकऱ्यांना भेटणार आहेत.

असा असेल गावभेटींचा संभाव्य कार्यक्रम

- गावभेटीसाठीची जिल्हानिहाय, तालुकानिहाय गावे निश्‍चित करणार
- दुर्गम, डोंगराळ, कोरडवाहू, आदिवासी गावांना प्राधान्य देणार
- अधिकारी हे जिरायती शेतकऱ्यांना प्राधान्याने भेटणार
- गावातील सर्व सरकारी, निमसरकारी, खासगी संस्था, गावातील बॅंका, सोसायटी, दूध संस्थांना भेटी
- शेती करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, शेतीतून मिळणारे उत्पन्न, खर्च व बचत याबाबत चर्चा करणार

पावणेदोनशे शेतकरी आत्महत्या

दरम्यान, मागील वर्षभरात कर्जबाजारीपणातून आलेल्या नैराश्‍यापोटी राज्यातील सुमारे पावणे दोनशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्यांमध्ये विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात हे प्रमाण कमी असल्याचे राज्याच्या कृषी विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

विदर्भ, मराठवाड्याच्या तुलनेत पश्‍चिम महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण खुपच कमी आहे. शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव मिळत नसल्याने, शेतकऱ्यांना शेतीतून कमी उत्पन्न मिळू लागले आहे. याउलट या उत्पन्नासाठी येणारा खर्च हा अधिक आहे. परिणामी शेतकरी हा दिवसेंदिवस कर्जबाजारी होऊ लागला आहे. शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून बाहेर काढण्यासाठी उत्पादन खर्च कमी करणे आणि शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव देणे आवश्‍यक आहे.

- अमोल पांगारे,
प्रगतिशील शेतकरी, वेळू, ता. भोर.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d95355 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..