वर्षभर विधायक कामांचे व्रत! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वर्षभर विधायक कामांचे व्रत!
वर्षभर विधायक कामांचे व्रत!

वर्षभर विधायक कामांचे व्रत!

sakal_logo
By

पुणे, ता. ३१ ः आरोग्य शिबिरे, अडचणीला धावून जाण्यापासून कठीण प्रसंगात समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची परंपरा जोपासणारी पुण्यातील गणेशोत्सव मंडळे. आता मुलांवरील लैंगिक अत्याचारावर प्रतिबंध घालण्यापासून ते नक्षलग्रस्तभागातील नागरिक, लहान मुले व महिलांचे प्रश्‍न सोडविण्यापर्यंतची विधायक कामे करीत आहेत. अनाथांसाठी खास मामाच्या गावाची सफर, असो किंवा कोरोना कालावधीत मोठ्या कष्टाने तयार केलेली ‘ऑक्‍सिजन बॅंक’ अशा सामाजिक कामातून ही मंडळे आपल्यातील वेगळेपणा टिकवून आहेत.
शहरातील गणेशोत्सवाला १२९ वर्षे पूर्ण झाली आहे. प्रदीर्घ अनुभवाची शिदोरी घेऊन गेली अनेक वर्षांपासून पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी विधायक गणेशोत्सवाची कास धरली आहे. शहरातील अनेक मंडळे केवळ गणेशोत्सवापुरतेच मर्यादित न राहता वर्षभर सामाजिक उपक्रमांद्वारे समाजाला आधार देण्याचे काम करतात. शहराच्या वेगवेगळ्या भागातील चार मंडळांनी उल्लेखनीय काम करून आपला वेगळा ठसा उमटविला आहे.

लैंगिक अत्याचारावर जनजागृती
वर्षभर शंभरहून अधिक उपक्रम राबविणारे बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टकडून मागील काही वर्षांपासून मुलांवरील लैंगिक अत्याचार या विषयाबाबत शाळांमध्ये जाऊन जनजागृती केली जात आहे. गणेशोत्सवातील ‘सावधान बागुलबुवा आलाय’ या देखाव्याच्या माध्यमातून, २० हजार पुस्तिका मुले, पालक, शाळांमध्ये पोचवून पालकांना जागृत करण्याचे काम केले आहे. याविषयी मंडळाचे प्रमुख पियुष शहा म्हणाले, ‘‘आम्ही महापालिकेच्या व वस्त्यांमध्ये असलेल्या शाळांवर लक्ष केंद्रित केले आहे. कष्टकरी पालक कामावर गेल्यानंतर मुलांवर जवळच्या व्यक्तींकडून लैंगिक अत्याचार केले जातात. मुलांकडून हे सांगितले जात असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. यासाठी हा उपक्रम राबविला आहे. पालकांनी मुलांशी संवाद वाढविला पाहिजे, अशा घटना टाळण्यासाठी तत्काळ १०९८ या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी.’’

समस्या सोडविण्यासाठी काम
‘गुन्हेगारी मुक्त शहर’ या उपक्रमापासून ते गडचिरोली येथील नक्षलग्रस्त भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी धनकवडी येथील आदर्श मित्र मंडळ मागील काही वर्षांपासून काम करीत आहे. मंडळाचे प्रमुख उदय जगताप म्हणाले, ‘‘नक्षलग्रस्त भागामध्ये मासिक पाळी येणाऱ्या महिलांना एका झोपडीत ठेवले जाते, त्यास ‘कुर्मा पद्धती’ असे म्हटले जाते. त्यामध्ये अनेक महिला या साप, विंचू चावल्याने दगावतात. म्हणूनच अशा महिलांसाठी आपण घरे बांधून दिली आहे. असंख्य गावांमध्ये, पाड्यांवर वीज पोचली नव्हती, तेथे वीज पोचविण्याचे काम केले. वेळेवर रुग्णालयात न पोचल्याने रुग्णांचा मृत्यू होत असे, हे टाळण्यासाठी दोनशेहून अधिक ‘टू व्हीलर ऍम्बुलन्स’ दिल्या. त्याचबरोबर अनेक नक्षलवाद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या हातात लेखणी देण्याचे काम केले.’’

‘मामाच्या गावची सफर’ उपक्रम
मागील अनेक वर्षांपासून शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळाकडून अनाथ मुलांसाठी ‘मामाच्या गावची सफर’ हा उपक्रम राबविला जात आहे. त्याविषयी मंडळाचे विश्‍वस्त वैभव वाघ म्हणाले, ‘‘शहरातील अनेक अनाथालयांमध्ये हजारो मुले आहे. अशा मुलांसाठी मागील काही वर्षांपासून आम्ही हा उपक्रम राबवीत आहोत. त्यामध्ये मुलांचे मनोरंजन करण्याबरोबरच त्यांच्या आरोग्याची काळजीही घेतली जाते. हजारो मुले दरवर्षी या उपक्रमाची आतुरतेने वाट पाहतात. त्याचबरोबर अंध मुलांचे विवाह करण्याचेही काम मंडळाने केले आहे.’’

तीनशेहून अधिक लोकांना जीवनदान
कोरोना काळात नागरिकांना मानसिक आधाराबरोबरच ‘ऑक्‍सिजन’ देण्याचे काम धनकवडीतील अखिल मोहननगर मित्र मंडळाने केले. या मंडळाचे अनिरुद्ध येवले म्हणाले, ‘‘कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात अन्नदान, दुसऱ्या टप्प्यात मात्र नागरिकांचा ऑक्‍सिजन अभावी जीव जात होता. आमच्या मंडळातील कार्यकर्त्यालाही आम्ही गमावले. त्यामुळे आम्ही कॉन्सन्ट्रेटर आणून स्वतःच ऑक्‍सिजन निर्मिती केली. आमच्या ऑक्‍सिजन बॅंके’द्वारे दोनशे ते तीनशेहून अधिक लोकांना ऑक्‍सिजन पुरवठा करून त्यांना जीवनदान देण्याचे काम केले. वर्षभर मंडळाकडून सामाजिक व विधायक उपक्रम राबविले जात आहेत.’’

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d95392 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..