शपथपत्र देण्याचा महापालिकेला आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शपथपत्र देण्याचा महापालिकेला आदेश
शपथपत्र देण्याचा महापालिकेला आदेश

शपथपत्र देण्याचा महापालिकेला आदेश

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ३१ : पुणे महानगरपालिकेने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बांधण्याच्या आणि सिंचनासाठी साडेसहा अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी देण्याबाबत शपथपत्र दाखल करावे. तसेच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे काम पूर्ण होईपर्यंत शहराला दररोज लागणाऱ्या पाण्याची मागणी कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती नियम प्राधिकरणाने (एमडब्ल्यूआरआरए) महानगरपालिकेला दिले.

पुणे महापालिकेला जलसंपदा विभागाकडून करण्यात येणारा पाणीपुरवठा हा शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आणि मापदंडाप्रमाणे असावा, या मागणीसाठी जलसंपत्ती प्राधिकरणाकडे याचिका दाखल केली आहे. महानगरपालिका, जलसंपदा विभाग आणि याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर प्राधिकरणाकडून महानगरपालिकेला हे आदेश दिले आहेत. पुढील सुनावणी २८ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता होणार आहे. सुनावणी दरम्यान जलसंपदा पुणे विभागाचे अधीक्षक अभियंता सं. द. चोपडे म्हणाले, ‘‘महापालिकेकडून दररोज सरासरी १७४२ दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) उचलण्यात येते. जलसंपदा विभागाकडून १४ ग्रामपंचायती आणि खासगी संस्थांना १७४ दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी पुरवठा करण्यात येतो. मापदंडाचे पालन करण्यासाठी पुरेसे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प महापालिकेकडून अद्याप उभारण्यात आलेले नाहीत. परिणामी प्रक्रिया न केलेले पाणी नदीत जाते. तसेच महापालिकेकडून वेळोवेळी लोकसंख्येची आकडेवारी बदलण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या पाणी उचलण्यावर जलसंपदा विभागाचे नियंत्रण नाही. महानगरपालिकेने पाणी पुरवठा कमी केल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते असे कळवले आहे.’’

अतिरिक्त आयुक्त म्हणतात...
महापालिकेकडून बंद जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्याचे काम प्रस्तावित असून त्या अंतर्गत वाहिन्या टाकण्याचे काम ६७ टक्के पूर्ण झाले आहे. हे काम १०० टक्के पूर्ण झाल्यानंतर सध्या पाणीकराच्या कक्षेत नसलेल्यांचे प्रमाण कमी होईल. महानगरपालिकेचा अनियमित होणारा पाणीपुरवठा भामा आसखेड प्रकल्पातून घेण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नियमित झाला आहे. सध्या प्रक्रिया केलेले पाणी बांधकाम कार्यासाठी वापरले जात आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी सुनावणी दरम्यान सांगितले.

याचिकाकर्त्याची मागणी
महानगरपालिकेकडून बाजू मांडताना ॲड. अभिजित कुलकर्णी म्हणाले, ‘‘सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणीच्या कामाचे कार्यादेश देण्यात आले असून तीन वर्षांत काम पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे. याबाबत महापालिकेकडून यापूर्वीच शपथपत्र देण्यात आले आहे.’’ तर ‘महापालिकेकडून शहराच्या लोकसंख्येचे अचूक आकडे देण्यात आलेले नाहीत. तसेच महापालिकेने लोकसंख्येच्या प्रमाणानुसार आणि दररोजच्या पाण्याच्या मागणीनुसार सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे नियोजन केलेले नाही. त्यामुळे महापालिका आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांवर जलसंपत्ती प्राधिकरणाच्या नियमानुसार कारवाई करावी’, अशी मागणी याचिकाकर्ते यांनी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d95709 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..