खोट्यांची खरी दुनिया! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खोट्यांची खरी दुनिया!
खोट्यांची खरी दुनिया!

खोट्यांची खरी दुनिया!

sakal_logo
By

हल्ली खऱ्याची दुनिया राहिली नाही. प्रामाणिकपणाला तर हल्ली कोणी किंमतही देत नाही. बरं दिलेला शब्दही कोणीही पाळत नाही. माणुसकी तर औषधालाही शिल्लक नाही. कोण कधी दगाफटका करील, याचाही भरवसा देता येत नाही. आमच्यासारख्या सरळमार्गी माणसाचं जगणं खरंच अवघड झालंय.
आता काही दिवसांपूर्वीची गोष्ट. ‘फाईलवर वजन ठेवल्याशिवाय, ती पुढे सरकत नाही’ हा आधुनिक न्यूटनचा सिद्धांत आम्ही एका शेतकऱ्याला पटवून दिला. मग फाईलचं अंतर, कामाचा वेग आणि त्यासाठी लागणारा वेळ या गोष्टी ठरवून ‘काळ, काम आणि वेगाचं सूत्रं’ मांडून, वजन किती ठेवावं लागंल, याचं उत्तर शोधलं. एक लाख रुपये उत्तर कॅल्क्युटरवर आलं. आम्ही समोरच्याची परिस्थिती बघून, प्रत्येकाला दहा ते पन्नास टक्के डिस्काऊंट देतो. हल्लीच्या काळात कोण कोणासाठी एवढं डिस्काऊंट देतं? पण आम्ही अजून माणुसकी सोडली नाही. आम्ही शेतकऱ्याची परिस्थिती बघून २५ टक्के डिस्काऊंट दिला. त्यातही शेतकऱ्याने तीन हप्ते पाडून मागितले. आम्ही कधी कोणाला अडवत नाही की नडवत नाही. एकरकमी पैसे भरायची, कोणाची परिस्थिती नसेल तर आम्ही सुलभ हप्त्यांवरही रक्कम स्वीकारून, त्याचे काम करतो. हल्लीच्या काळात कोणता सरकारी अधिकारी दुसऱ्यांच्या अडचणी एवढ्या समजावून घेतो? पण आमच्यासारख्या सरळमार्गी माणसानं इतरांसारखं वागून कसं जमेल? एवढा पैसा कमवून काय वर न्यायचा आहे का? त्यामुळे डिस्काऊंट दिला वा हप्ते पाडून दिले तर बिघडलं कोठं? गरिबांचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. लोकांचं भलं केलं तर आपलंही भलं होतं, याचा अनुभव आम्ही घेत आहोत. त्यामुळेच पुण्यात आमचे दहा फ्लॅट, गावाकडे पंचवीस एकर जमीन व पाच कोटींचे फार्महाऊस आहे. कोट्यवधी रूपयांच्या ‘एफडी’ बॅंकेत पडून आहेत. घरात रोकड किती आहे, याची मोजदादही केली नाही. ‘कर भला, तो हो भला’ याचं उदाहरण आम्ही घालून दिलं आहे.
संबंधित शेतकऱ्याकडून पहिला हप्ता मिळाल्यानंतर आम्ही त्या फाईलवरील धूळ झटकली. आम्ही पैशांचे जसे हप्ते पाडतो, तसेच काम करण्याचेही हप्ते पाडतो. दुसरा हप्ता मिळाल्यानंतर आम्ही फाइल उघडली. त्यावर कामही केलं आता तिसरा हप्ता आला की सही व शिक्का मारून काम ‘ओके’ करायचं, हा आमचा शिरस्ता आहे. अंतिम हप्ता शेतकऱ्याने दिला आणि आम्ही सही- शिक्क्यांसकट फाइल त्यांच्या हाती सुपूर्त केली. एका शेतकऱ्याचं काम केल्याचं समाधान आमच्या मनी होतं. अशा अनेक शेतकऱ्यांची कामे आम्ही मार्गी लावली आहेत. अनेकांना सुखाचे दिवस दाखवले आहेत पण कधीही आम्ही उपकाराची भाषा वापरली नाही की कधी गर्वाने वागलो नाही.
तेवढ्यात शिटी वाजली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात आम्ही अडकलो होतो. त्याक्षणी आमचा माणुसकीवरचा विश्‍वास उडाला. खऱ्याची दुनिया राहिली नाही, याची प्रचिती आली. एवढा डिस्काऊंट देऊन व हप्ते पाडून काय उपयोग झाला? कोणाला मदतीसाठी हात पुढे करण्याचे दिवस राहिले नाहीत, हे आम्हाला पटले. या प्रकरणातून आम्हाला सहीसलामत सोडण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसमोर पाच लाखांचा प्रस्ताव ठेवला पण गरीबांचं ऐकतो कोण? आम्ही आयुष्यभर माणुसकी पाळली. आमच्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधकवाल्यांनी थोडीतरी माणुसकी पाळायला नको? पण त्या निष्ठुर अधिकाऱ्यांनी आमची रवानगी थेट तुरुंगात केली. या काळात आमचा एकही सहकारी वा अधिकारी आम्हाला भेटायला आला नाही. जामीनावर सुटल्यानंतरही आमची कोणी डीजेच्या तालावर मिरवणूकही काढली नाही. कोणी हारतुऱ्यांनी स्वागतही केलं नाही. ही दुनिया फारच स्वार्थी आणि अप्पलपोटी आहे, हे आता आम्हाला पटलंय. त्यामुळे इथूनपुढे कोणालाही मदत करायची नाही, हे आम्ही ठरवलंय. पुन्हा नोकरीत रुजू झाल्यानंतर डिस्काउंट आणि सुलभ हप्ते पाडून देणे बंद करणार आहोत. नाहीतर काय ! उगाचंच कोणाचे फाजील लाड कशाला करायचे?
(हा कागदाचा बोळा आम्हाला तुरूंगाशेजारील कचराकुंडीशेजारी सापडला.)

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d95984 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..