‘सर्व शिक्षण’ निधीसाठीच्या बँकेत पुन्हा बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सर्व शिक्षण’ निधीसाठीच्या बँकेत पुन्हा बदल
‘सर्व शिक्षण’ निधीसाठीच्या बँकेत पुन्हा बदल

‘सर्व शिक्षण’ निधीसाठीच्या बँकेत पुन्हा बदल

sakal_logo
By

पुणे, ता. १ ः सर्व शिक्षण मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील शाळांना मिळणाऱ्या निधीसाठी असलेले जिल्हा परिषद शाळांचे बॅँक खाते पुन्हा एकदा बदलण्याचा घाट राज्य सरकारने घातला आहे. शाळांचे बॅंक खाते बदलण्याची ही गेल्या दोन वर्षातील ही तिसरी वेळ आहे. या खात्यांवर प्रतिवर्षी लागणारा सादिल खर्च, शालेय पोषण आहाराबाबतचा निधी आणि मोफत गणवेशासाठीचा निधी जमा केला जातो. मात्र बॅंक खाते सातत्याने बदलण्याचा आदेश देण्यात येत असल्याने शाळा आणि मुख्याध्यापकांची मोठी अडचण झाली आहे.

केंद्र पुरस्कृत सर्व शिक्षण अभियान सुरु झाल्यापासून पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळांची ही खाती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (पीडीसीसी) होती. सन २००४ मध्ये ही सर्व बॅंक खाती बंद करून नव्याने महाराष्ट्र बॅंकेत खाते उघडण्याचा आदेश राज्य सरकारने दिला. या आदेशानुसार सर्व शाळांनी आपापल्या भागातील महाराष्ट्र बॅंकेच्या विविध शाखेत हे खाते उघडले. खाते उघडण्यासाठीची आवश्यक रक्कम‍ भरून हे सर्व खाते उघडण्यात आले होते. परंतु तीन वर्षांपूर्वी अचानकपणे महाराष्ट्र बॅंकेतील पूर्वीचे खाते बंद करून पुन्हा त्याच बॅंकेत नव्याने शून्य शिल्लक खाते (झिरो बॅलन्स अकाउंट) उघडण्याचा आदेश शाळांना देण्यात आला. महाराष्ट्र बॅंकेतील नवीन खाते उघडून पूर्ण होतात, न होतात, तोच पुन्हा बॅंक खाती बदलण्याचा आदेश जूलै २०२२ मध्ये काढण्यात आला आहे.

या नव्या आदेशानुसार पुन्हा महाराष्ट्र बॅंकेतील खाते बंद करून, ती नव्याने एचडीएफसी बॅंकेत उघडण्याचा आदेश शाळांना देण्यात आला असल्याचे महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष गौतम कांबळे यांनी सांगितले. यानुसार जिल्ह्यातील मुख्याध्यापकांनी या नव्या बॅंकेत खाते उघडण्यास सुरवात केली आहे. मात्र एचडीएफसी बॅंकेच्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पुरेशा प्रमाणात शाखा उपलब्ध नाहीत. त्यामुळे खाते उघडल्यानंतर पुन्हा पुरेशा शाखांअभावी नवीन खातेही बंद करण्याची वेळ मुख्याध्यापकांवर येते की काय, अशी शंका कांबळे यांनी उपस्थित केली आहे.

मुळात प्रत्येक शाळेसाठी किमान प्रत्येकी तीन बॅंक खाती उघडावी लागतात. यामध्ये शालेय पोषण आहार, विद्यार्थ्यांसाठीच्या मोफत गणवेशाचे आणि सादिल खर्चासाठीच्या अशा खात्यांचा समावेश आहे. ही सर्व खाती ही शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापकांच्या संयुक्त नावाने असतात. केंद्र सरकारकडून थेट या खात्यांवर निधी जमा केला जातो. मात्र तसे न करता पूर्वीप्रमाणे जिल्हा परिषदांच्या माध्यमातून हा निधी शाळांच्या खात्यावर जमा केला जाणे गरजेचे आहे.

- गौतम कांबळे,
राज्य अध्यक्ष, कास्ट्राईब शिक्षक महासंघ.

जिल्ह्यातील मुख्याध्यापकांनी शाळांच्या खात्यांसाठी बॅंका बदलायच्या तरी किती आणि प्रत्येक वेळी नवे खाते उघडण्यासाठी आवश्‍यक असलेली कमीत कमी शिल्लक रक्कम आणायची कुठून, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. आतापर्यंत किमान चार वेळा बॅंक खाते बदलावे लागले आहेत. आता नव्याने पुन्हा एचडीएफसी बॅंकेत खाते उघडण्यास सांगितले आहे. या बॅंकेत नव्याने खाते उघडण्यासाठी प्रत्येकी दोन हजार रुपायांची कमीत कमी शिल्लक रक्कम घेतली जात आहे. शिवाय खात्यावर किमान दहा हजार रुपये शिल्लक रक्कम ठेवण्याचे बंधन घातले जात आहे. त्यातच धनादेशाद्वारे केले जाणारे बॅंक व्यवहार बंद केले आहेत. यामुळे मुख्याध्यापकांना खूप मानसिक त्रास होऊ लागला आहे.

- रुक्मिणी देवडकर,
मुख्याध्यापक, झेडपी शाळा कांब्रे ना. मा. , ता. मावळ.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d96078 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..