Weather Update : सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rain update
सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस

Weather Update : सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता

पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्यात धुवांधार बॅटींग करणारा मॉन्सून सप्टेंबर महिन्यातही सक्रिय राहणार आहे. एवढंच नाही तर देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हंगामाच्या अखेरच्या महिन्यात देशभरात १०९ टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. वायव्य भारतातून मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सप्टेंबर महिन्याच्या मध्यानंतर सुरू होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

(Maharashtra Rain Updates)

हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी गुरुवारी (ता. १) ऑनलाइन पत्रकार परिषदेत सप्टेंबर महिन्यातील पावसाचा अंदाज जाहीर केला. १९७१ ते २०२० कालावधीत देशातील मॉन्सून पावसाची आकडेवारी पाहता, सप्टेंबर महिन्यात देशात सरासरी १६७.९ मिलिमीटर पाऊस पडतो. सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस सर्वसाधारण मानला जातो.

सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसाचा अंदाज विचारात घेता राज्याच्या सर्वच भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. यातही कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या नकाशावरून स्पष्ट होत आहे. प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागात ला-निना स्थिती वर्षाअखेरीपर्यंत कायम राहण्याची शक्यता असून, इंडियन ओशन डायपोल (आयओडी) नकारात्मक राहण्याचे संकेत वर्तविण्यात आले आहेत.

पुणे शहरात सरींची शक्यता

पुणे शहर व परिसरात आकाश सामान्यतः ढगाळ आणि एक-दोन जोरदार सरींची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. शुक्रवारी (ता.२) तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज आहे. सकाळपासून निरभ्र आकाशामुळे उन्हाचा चटका आणि उकाडा वाढेल.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d96148 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..