विषयांमध्ये वैविध्य, मात्र सादरीकरणात त्रुटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विषयांमध्ये वैविध्य, मात्र सादरीकरणात त्रुटी
विषयांमध्ये वैविध्य, मात्र सादरीकरणात त्रुटी

विषयांमध्ये वैविध्य, मात्र सादरीकरणात त्रुटी

sakal_logo
By

पुणे, ता. २ ः ‘‘यंदाच्या पुरुषोत्तम करंडकाच्या प्राथमिक फेरीत समकालीन, राजकीय, सामाजिक, कौटुंबिक अशा अनेक वैविध्यपूर्ण विषयांवरील एकांकिका सादर झाल्या. तरुणाईने निवडलेल्या काही विषयांनी आणि त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांनी तर काही वेळा अवाक व्हायला झाले. मात्र, नाटकाच्या तंत्राविषयी अभ्यास नसल्याने सादरीकरणात काही त्रुटी जाणवल्या. त्यामुळे तरुण रंगकर्मींनी कष्टांना अभ्यासाची जोड दिल्यास सादरीकरण अधिक उठावदार होईल,’’ असे मत पुरुषोत्तम करंडकाच्या प्राथमिक फेरीच्या परीक्षकांनी व्यक्त केले.

‘महाराष्ट्रीय कलोपासक’तर्फे आयोजित पुरुषोत्तम करंडक या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी नुकतीच झाली. या फेरीचा निकाल लागून नऊ एकांकिकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. या फेरीसाठी परीक्षक म्हणून आशुतोष नेर्लेकर, किरण भुजबळ आणि स्वाती महाळंक यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या फेरीबाबत महाळंक म्हणाल्या, ‘‘महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेने स्पर्धेचा दर्जा टिकवून ठेवण्यात यश मिळवले आहे, हे यंदाही दिसून आले. सादर झालेल्या एकांकिकांमध्ये ८० टक्के एकांकिका विद्यार्थी लेखकांनी लिहिलेल्या होत्या, ही समाधानाची बाब होती. या एकांकिकांच्या विषयांमध्ये वैविध्य होते, संहिताही चांगल्या होत्या आणि सादरीकरणातही वेगवेगळे प्रयोग केले होते. मात्र, ‘पुरुषोत्तम’मधील प्रयोगापुरतेच नाटक मर्यादित नाही, हे ओळखून या तरुण रंगकर्मींनी नाटकाचा अभ्यास करायला हवा.’’

भुजबळ म्हणाले, ‘‘प्राथमिक फेरीचा दर्जा अतिशय चांगला होता. अंतिम फेरीसाठी केवळ नऊच संघ निवडणे, आम्हाला कठीण गेले. सर्वच संघांनी खोलात जाऊन, विचार करून एकांकिका सादर केल्या. काही वेळा अभिनेते व्यावसायिक आहेत की काय, अशी शंका येण्याइतका चांगला अभिनय पाहायला मिळाला. काही संघांनी मात्र संहिता निवडण्यातच चूक केली होती. संहिता योग्य निवडल्यास अर्धे काम फत्ते होते, त्यामुळे पुढच्या वेळी संहिता निवडताना अधिक विचार करावा.’’

‘‘यंदाच्या एकांकिकांमध्ये मांडलेले विषय खरोखर थक्क करणारे होते. तरुण रंगकर्मी इतक्या प्रगल्भतेने विचार करतात, हे कौतुकास्पद आहे. फार्सिकल, ब्लॅक कॉमेडी, उपहासात्मक असे विविध प्रकारही त्यांनी हाताळले. सादरीकरणही उत्तम होते, मात्र त्यांना दिग्दर्शन, अभिनय याच्या तंत्राची माहिती नसल्याचे जाणवले. नवरस, षड्रिपू, अभिनयाचे प्रकार आदींचा अभ्यास त्यांनी करायला हवा. त्यामुळे त्यांना विषय अधिक प्रभावीपणे पोचवता येईल.’’
- आशुतोष नेर्लेकर, परीक्षक

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d96313 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..