पुणे विमानतळावर लवकरच नवीन टर्मिनल नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे विमानतळावर लवकरच नवीन टर्मिनल
नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची माहिती
पुणे विमानतळावर लवकरच नवीन टर्मिनल नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची माहिती

पुणे विमानतळावर लवकरच नवीन टर्मिनल नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची माहिती

sakal_logo
By

पुणे, ता. २ : ‘‘पुण्याच्या विमानतळाचा विकास आम्ही शंभर टक्के करणार,’’ असे म्हणत नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी पुढील वर्षभरात पुणे विमानतळावर नवीन टर्मिनल उभाण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. पुण्याच्या सध्याच्या विमानतळाची सात दशलक्ष प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे. येथील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन येथे नवीन टर्मिनलचे नियोजन करण्यात येत आहे. पुढील वर्षभरात ते तयार होईल. त्यानंतर वर्षभरात १७ दशलक्ष प्रवाशांना येथून विमानप्रवास करता येईल.

‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर’ (एमसीसीआयए) यांच्यातर्फे पुण्यातील विमानतळाबद्दल आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, ‘एससीसीआयए’चे अध्यक्ष सुधीर मेहता आणि महासंचालक प्रशांत गिरबाने उपस्थित होते. या प्रसंगी शिंदे म्हणाले, ‘‘पुणे विमानतळाच्या विकासासाठी ‘एमसीसीआयए’तर्फे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्या अंतर्गत नागरी विमानांच्या उड्डाणांचे स्लॉट्स वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे हे भारतीय हवाई दलाचे विमानतळ असल्याने स्लॉट्स वाढविण्याची अंतिम मान्यता त्यांच्याकडून मिळते. येथील स्लॉट्स वाढविण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मदत केली. त्यामुळे पुण्यात नागरी विमानांच्या उड्डाणासाठी १४ अतिरिक्त स्लॉट्स मिळाले आहेत. सोमवार ते शनिवार या दरम्यान १०२ स्लॉट्स आतापर्यंत होते. ते आता ११६ पर्यंत वाढले आहेत. रविवारी १३१ स्लॉट्स होते. ते देखील वाढले आहेत.’’

आंतरराष्ट्रीय उड्डाणे
पुणे-सिंगापूर या विमानमार्गाला परवानगी लवकर देणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘त्याबाबत एका खासगी विमानकंपनीचा प्रस्तावदेखील मंत्रालयाकडे आला आहे. त्याला परवानगी दिल्यानंतर पुणे-सिंगापूर विमानसेवा सुरू होईल. त्याचबरोबर भविष्यात दोहा आणि बँकॉक या शहरांना जोडण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.’’

पुण्याची धावपट्टी वाढणार
पुणे विमानतळावरील धावपट्टी दोन हजार ५३५ मीटरची आहे. ती वाढविण्याबाबत विचार सुरू आहे. त्याच्या पश्चिमेकडे अकराशे मीटर धावपट्टी वाढविण्यासाठी जागेचे अधिग्रहण करण्यास राज्य सरकारची परवानगी आवश्यक आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. तसेच, पूर्वेकडे ९०० मीटरने धावपट्टीचा विस्तार करायचा आहे. त्यासाठी संरक्षण खात्याकडून मान्यता मिळवावी लागेल. त्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही शिंदे यांनी सांगितले.

मालवाहतूक
पुणे परिसरात मालवाहतुकीची मोठी क्षमता आहे. त्यासाठी हवाईमार्गे वाहतुकीची सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. सध्या २५ हजार मेट्रिक टन मालवाहतुकीची क्षमता आहे. पुण्यात आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीच्या सुविधेची गरज आहे. पण, ही वेळखाऊ प्रक्रिया आहे. त्यामुळे सध्याची मालवाहतूक क्षमता ४२ हजार मेट्रिक टनापर्यंत वाढविण्यात येईल.

पुणे हे फक्त ऐतिहासिक, औद्योगिक शहर नाही, तर आर्थिक, राजकीय विचारवंतांचे प्रमुख केंद्र आहे. अशा पुण्याच्या सर्वांगिण विकासासाठी किंबहुना पुण्याच्या सेवेसाठी मी कटिबद्ध आहे. कारण माझ्या बालपणाच्या सुंदर आठवणी या शहरात आहेत.
- ज्योतिरादित्य शिंदे, नागरी हवाई वाहतूक मंत्री

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d96439 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..