खास सुटीच्या ‘गिफ्ट’मुळे पोलिस आनंदले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खास सुटीच्या ‘गिफ्ट’मुळे पोलिस आनंदले
खास सुटीच्या ‘गिफ्ट’मुळे पोलिस आनंदले

खास सुटीच्या ‘गिफ्ट’मुळे पोलिस आनंदले

sakal_logo
By

पुणे, ता. २ : ‘‘गणेशोत्सव सुरू असतानाही मला वाढदिवसामुळे खास सुटी मिळाली, त्यामुळे गुरुवारी दिवसभर मला मुली, पत्नी यांच्यासमवेत दिवस आनंदात घालविता आला. पत्नी, मुलींना कपडे खरेदीसाठी नेता आले. रात्री कुटुंबासमवेत केक कापून आनंदाचे क्षण साजरा करता आले, असे सांगत होते पोलिस नाईक प्रदीप गर्जे. गणेशोत्सवाची सर्वत्र धामधूम सुरू असताना पोलिसांवर मात्र नेहमीप्रमाणे बंदोबस्ताचा ताण आहे. अशा परिस्थितीतही गर्जे यांना वाढदिवसादिवशी गुरुवारी खास सुटी मिळाली. एरवी पोलिसांना हक्कांच्या सुट्यांवरही पाणी सोडण्याची वेळ येत असताना, ही खास सुटी आनंदाची ‘गिफ्ट’च ठरली.

गर्जे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्याही चेहऱ्यावरही या खास सुटीचा आनंद स्पष्टपणे झळकत होता. वर्षातून त्यांनी पुन्हा कुटुंबासमवेत आनंदाचे चार क्षण वाटून घेतले, हे शक्‍य झाले पुणे पोलिसांकडून मिळणाऱ्या वाढदिवसाच्या विशेष सुटीमुळे! अशा पद्धतीने पुणे पोलिस दलातील दररोज किमान २० ते २५ पोलिसांना वाढदिवसाच्या सुटीचे ‘गिफ्ट’ मिळत आहे.

प्रसंग कुठलाही असो, पोलिस सतत ताणात असतात. अनेकदा टिकेचे धनीही ठरतात. परंतु पोलिसही माणूस आहे, याचा नकळत विसर पडत जातो. सणासुदीचे दिवस, मुलांचे वाढदिवस, समारंभ असल्यानंतरही अनेकदा त्यांना ‘ड्युटी’मुळे जाणे होत नाही. वेळी-अवेळी तत्काळ कामावर हजर रहावे लागेल, याची शाश्‍वती पोलिसांना नसते. कर्तव्यावर असताना कधी घरचे जेवण नाही, की कधी विश्रांती. अशा प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या पोलिसांच्या वाट्याला वाढदिवसाच्या सुटीचा एक हक्काचा दिवस हमखास येतो.

तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ऑगस्ट २०१४ मध्ये अशी सुटी देण्याची घोषणा केली. मात्र बऱ्याच विलंबाने त्याची अंमलबजावणी सुरू झाली. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी हा मानसिक आधार सुरू ठेवला. परिणामी पोलिस कर्मचाऱ्यांपासून ते सह पोलिस आयुक्तांपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही त्यांचा वाढदिवस कुटुंबासमवेत साजरा करता येणे शक्‍य झाले.

पोलिस आयुक्तांकडून खास शुभेच्छा
पुणे पोलिस दलामध्ये दररोज किमान २० ते २५ पोलिसांना वाढदिवसाची सुटी मिळते. पोलिसांचे दैनंदिन गॅझेट वाढदिवस असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नाव, रॅंक, नेमणूक व वाढदिवस असा उल्लेख करून प्रसिद्ध केले जाते. विशेषतः पुणे पोलिस आयुक्तांकडून कर्मचाऱ्यांना खास शुभेच्छा दिल्या जातात.

शहरातील पोलिसांची संख्या - ७ हजार ८००
दररोज वाढदिवसानिमित्त सुटी मिळणाऱ्यांची संख्या - २० ते २५

प्रत्येक व्यक्तीला त्याचा वाढदिवस हा त्याच्या कुटुंबासमवेत साजरा करण्याची इच्छा असते. आम्ही पोलिसांना वाढदिवसाची सुटी देतो. संबंधित पोलिसाचा वाढदिवस आहे, हे आम्ही गॅझेटही प्रसिद्ध करीत असल्यामुळे सर्वांनाच त्याची माहिती मिळते.
- डॉ. जालिंदर सुपेकर, अतिरिक्त पोलिस आयुक्त (प्रशासन)

आज आणि येत्या काळात वाढदिवस असणाऱ्या पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा...रोज विलक्षण ताण सहन करणाऱ्या पोलिस दलातील कर्मचारी, अधिकाऱ्यांची नकारात्मकतेच्या सावलीतून सुटका नसते. ही सावली अनेकदा घरापर्यंतही पोचते. पोलिसांच्या कुटुंबांनाही नकारात्मकतेचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत वाढदिवस व्यक्तिगत, कौटुंबिक आणि मित्र-मैत्रिणींच्या परिवाराला आनंद देणारा दिवस. आम्हालाही समजून घ्यायला आवडेल, की वाढदिवसाला पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांनी रोजच्या धबडग्याला कसा ब्रेक दिला? तुम्ही कसा साजरा केला वाढदिवस हे आम्हाला editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d96483 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..