स्टिअरिंग पुन्हा कर्मचाऱ्यांच्या हाती : कंत्राटी चालकांना बाहेरचा रस्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MSRTC ST Bus
स्टिअरिंग पुन्हा कर्मचाऱ्यांच्या हाती कंत्राटी चालकांना बाहेरचा रस्ता; डबलड्यूटीची नौबत

स्टिअरिंग पुन्हा कर्मचाऱ्यांच्या हाती : कंत्राटी चालकांना बाहेरचा रस्ता

पुणे : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपकाळात रुतलेल्या लालपरीला डेपोतून बाहेर काढण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने कंत्राटी चालकांची भरती केली होती. राज्यात सुमारे २१७६ चालकांना कंत्राटी पद्धतीने कामांवर घेण्यात आले होते. आता त्यांना अचानकच काम थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुळात एसटीमध्ये चालकांची संख्या कमी आहे. त्यात आता कंत्राटी चालकदेखील नसल्याने त्याचा भार एसटीच्या चालकांवर पडणार आहे. काही विभागांतल्या चालकांना डबलड्यूटी करावी लागणार आहे.

गेल्यावर्षी दिवाळीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी अभूतपूर्व संप केला. हा संप मोडीत काढण्यासाठी सरकारने वेगवेगळी शक्कल लढवली. कंत्राटी चालकांना कामावर घेऊन लालपरीचे स्टिअरिंग त्यांच्या हाती देण्यात आले. पुण्यासह राज्यातील २४ विभागांत कंत्राटी चालकांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांना ३ सप्टेंबरपासून काम थांबविण्याचे आदेश दिले आहेत. यामागे एसटी प्रशासनाने या कर्मचाऱ्यांचा पुरेसा वापर होत नसल्याचे कारण दिले आहे. तेव्हा त्यांच्या वेतनावर होणारा अनावश्यक खर्च कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र चालकांची संख्या कमी असताना हा निर्णय घेणे एसटीच्या चालकांवर एक प्रकारे अन्याय करणारा ठरू शकतो.

डबलड्यूटी नाहीतर एसटी डेपोतच

राज्य परिवहन महामंडळामध्ये चालक व वाहकांची संख्या पुरेशी नाही. यात २ हजार कर्मचाऱ्यांमुळे एसटीची गरज काहीअंशी भागत होती. आता एसटीची प्रवासी वाहतूक ९० टक्के सुरू झाली आहे. चालकांची संख्या कमी असल्याने काही चालकांना डबलड्यूटी करावी लागू शकते. अन्यथा एसटी पुन्हा डेपोतच थांबून राहतील.

आकडे बोलतात (पुणे विभाग)

  • ८३० प्रवासी गाड्या

  • ७३ कार्गो (मालवाहतूक)

  • ४१९५ एकूण कर्मचारी

  • १४९४ चालक

  • १३५० वाहक

  • ८०६ यांत्रिक

  • ५४५ प्रशासकीय

राज्य परिवहन महामंडळाने २१७६ कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती. मात्र प्रत्यक्षात केवळ ४४३ कर्मचारीच कामावर होते. शिवाय आता सर्व कर्मचारी कामावर आहेत. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांची आवश्यकता नाही. त्यामुळे त्यांची सेवा थांबविण्यात आली आहे.

- शिवाजी जगताप, सरव्यवस्थापक (वाहतूक), राज्य परिवहन महामंडळ, मुंबई

पुणे विभागाला १०० कंत्राटी कर्मचाऱ्यांची आवश्यकता होती. त्यानुसार काही दिवस त्यांनी काम केले. सद्य:स्थितीत ४० चालक कर्मचारी काम करीत होते. त्यांचे काम थांबविण्यात आल्याने तसेच चालकांची कमतरता असल्याने आता एसटी चालकांनाच डबलड्यूटी करावी लागेल.

- ज्ञानेश्वर रणवरे, विभागीय वाहतूक अधिकारी, राज्य परिवहन महामंडळ, पुणे विभाग

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d96755 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..