जिल्ह्यात पावसाची कृपादृष्टी ३१ टक्के अधिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात पावसाची कृपादृष्टी ३१ टक्के अधिक
जिल्ह्यात पावसाची कृपादृष्टी ३१ टक्के अधिक

जिल्ह्यात पावसाची कृपादृष्टी ३१ टक्के अधिक

sakal_logo
By

पुणे, ता. ४ ः नैऋत्य मोसमी वारे राज्यात दाखल झाल्यापासून सर्वदूर पावसाची कृपादृष्टी कायम ठेवली आहे. पुणे जिल्ह्यात यंदाच्या मोसमात रविवारपर्यंत (ता. ४) सरासरीपेक्षा ३१ टक्के अधिक पाऊस पडल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

जूनच्या पहिल्याच आठवड्यात दाखल होणाऱ्या मॉन्सूनने सुरुवातीपासूनच जोरदार बॅटींग केली आहे. जिल्ह्यातील घाटमाथ्यावर अतिवृष्टीसदृश, तर अनेक तालुक्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून, धरणेही पूर्ण क्षमतेने भरली आहेत. काही तालुक्यांत अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याचेही पाहायला मिळाले. आता लवकरच मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होईल. मध्यावधीत आलेल्या मॉन्सूनच्या पर्जन्यवृष्टीची आकडेवारी हवामान खात्याने जाहीर केली आहे. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत जिल्ह्यात सरासरी ७९१ मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, यंदा तब्बल १०३७.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सुमारे ३१ टक्के अधिक पर्जन्यवृष्टी या काळात झाली आहे. राज्यात नाशिक, धुळे, नांदेड, गडचिरोली, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांनतर सर्वाधिक पाऊस पुणे जिल्ह्यात झाला आहे.

मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाबद्दल सांगताना ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे म्हणतात, ‘‘परतीच्या पावसासाठी आजमितीला फारसे अनुकूल वातावरण नाही. कदाचित तिसऱ्या आठवड्यापर्यंतही वाट पहावी लागेल. बुधवारपासून (ता. ७) वातावरणात बदल होत असून, पौर्णिमेच्या दिवशी १० तारखेच्या दरम्यान संपूर्ण कोकण व उत्तर महाराष्ट्रात जोरदार, तर उर्वरित मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता जाणवते.’’ शनिवारपर्यंत (ता. १०) शहर व जिल्ह्यात आकाश सामान्यतः ढगाळ राहील. या काळात आकाश निरभ्र झाल्यास उन्हाचे चटके आणि उकाडा वाढण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी पावसाच्या एक-दोन जोरदार सरी, हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. घाटमाथ्यावर मात्र गुरुवारनंतर (ता. ८) तुरळक ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मोसमातील आजवरचा पाऊस
(१ जून ते ४ सप्टेंबर २०२२)
जिल्हा ः सर्वसामान्य पर्जन्यमान (मिमी) ः प्रत्यक्ष पाऊस (मिमी)
पुणे ः ७९१.२ ः १०३७.८
नाशिक ः ७४०.७ ः ११७३.८
अहमदनगर ः ३२३.९ ः ३७९.८
सोलापूर ः ३०७.२ ः ३५५.६
कोल्हापूर ः १५४२.१ ः १६७८.०

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d96966 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..