गौरी जेवणालाच पाणी गायब! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गौरी जेवणालाच पाणी गायब!
गौरी जेवणालाच पाणी गायब!

गौरी जेवणालाच पाणी गायब!

sakal_logo
By

पुणे, ता. ४ : ‘‘गौरींचा स्वयंपाक सोवळ्यामध्ये करावा लागतो. परंतु, आज (रविवारी) सकाळी पाणीपुरवठा झालाच नाही. त्यामुळे घरातील जेमतेम पाण्यावरच गौरी पूजनासाठी नैवेद्य करावा लागला,’’ अशी खंत सारिका यांनी व्यक्त केली. शहराच्या मध्यवर्ती भागातील महिलांची हीच अवस्था झाली. पेठांसह निम्म्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पर्वती जलशुद्धीकरण केंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या केबलमध्ये बिघाड झाला, यामुळे पाणीपुरवठा न झाल्याने त्याचा परिणाम घरोघरी होणाऱ्या गौरी पूजनावर झाला.

गौरींचे शनिवारी घरोघरी आगमन झाले. आज (रविवारी) जेवण असते, त्यासाठी सकाळपासून महिलांची लगबग सुरू होती. त्यात पाणी न आल्यामुळे घरोघरी महिलांची तारांबळ उडाली. पर्वती जलशुद्धीकरण केंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या केबलमध्ये सकाळी बिघाड झाला. वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठा होऊ शकला नाही. शहरातील पेठांमध्ये गौरी पूजनाच्या वेळी पाणी गायब झाले. सायंकाळी उशिरापर्यंत पुरवठा सुरळीत झाला नव्हता.

दररोज पाणीपुरवठा होत असल्यामुळे मध्यवर्ती भागांमध्ये पाणी साठविले जात नाही. गौरींचा स्वयंपाक हा सोवळ्यात करावा लागतो. परंतु, पाणी न आल्याने अनेकांवर घरातील जेमतेम पाण्यावरच गौरी जेवणाचा कार्यक्रम उरकावा लागल्याच्या तक्रारी महिलांनी केल्या. पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातून लष्कर जलशुद्धीकरण केंद्रातही पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे लष्कर जलकेंद्रातून पुरवठा होणाऱ्या भागालाही हाच फटका बसला, त्यामुळे असंख्य तक्रारी ‘सकाळ’कडे आल्या.

आमचा संबंध नाही ः महावितरण
महावितरणच्या केबलमध्ये बिघाड झाल्याने पाणीपुरवठा करण्यात अडचणी आल्याचा दावा महापालिकेने केला असला, तरी यासंदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर वेगळीच वस्तुस्थिती समोर आली आहे. पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातील केबलमध्ये बिघाड झाला आहे, त्याची जबाबदारी ही महापालिकेची आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराशी आमचा काहीही संबंध नाही, असे महावितरणकडून सांगण्यात आले. जून महिन्यात संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालख्या पुण्यात विसाव्यासाठी आल्या होत्या. त्या दिवशीही नेमका असाच शहराच्या मध्यभागात पाणीपुरवठा होऊ शकला नव्हता. तोच प्रकार आज गौरपूजनाच्या दिवशीही झाला. दर गुरुवारी देखभाल -दुरुस्तीसाठी महापालिकेकडून पाणीपुरवठा बंद ठेवला जातो. मग ऐन सणांच्या दिवशी का गडबड होते? असा प्रश्‍न पुणेकरांकडून विचाराला जात आहे.


‘‘महावितरणाच्या केबलमध्ये सकाळीच बिघाड झाला, त्यामुळे पाण्याच्या टाक्या पुरेशा भरू शकल्या नाहीत. परिणामी पाणीपुरवठा करण्यात अडचणी आल्या. परंतु, हा बिघाड दुरुस्त झाल्यानंतर ज्या भागाला पुरवठा होऊ शकला नाही, त्या भागात दुरुस्तीनंतर तातडीने पुरवठा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.’’
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d96967 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..