पर्यावरणाचा संदेश देऊन ऊर्जा वाढविणारे देखावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यावरणाचा संदेश देऊन ऊर्जा वाढविणारे देखावे
पर्यावरणाचा संदेश देऊन ऊर्जा वाढविणारे देखावे

पर्यावरणाचा संदेश देऊन ऊर्जा वाढविणारे देखावे

sakal_logo
By

पुणे, ता. ४ : पुण्यनगरीत वैभवशाली गणेशोत्सवात सदाशिव, नारायण आणि शनिवार पेठेतील विविध मंडळे अग्रभागी असतात. दोन वर्षांच्या खंडानंतर मोठ्या दिमाखात साजरा होणाऱ्या यंदाच्या गणेशोत्सवातही हीच परंपरा शहराच्या मध्यवस्तीतील पेठांनी कायम ठेवली आहे. भव्य हलते देखावे, मराठ्यांच्या झंजावाताची चुणूक दाखविणारे, नसा-नसात राष्ट्रप्रेम चेतविणारे आणि पर्यावरणाचा संदेश देऊन माणसातील ऊर्जा वाढविणारे देखावे हे या भागातील गणेश मंडळांचे वैशिष्ट्य ठरले आहे.
कोरोना उद्रेकात गेली दोन वर्षे गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा झाला. कोणतेही देखावे नाहीत, की उत्सवात कोणताच उत्साह नाही. यंदा मात्र, कोरोनाचे संकट कमी झाल्याने विविध गणपती मंडळांनी आपल्या परंपरेप्रमाणे भव्य हलते देखावे उभारले आहेत. पौराणिक कथा, ऐतिहासिक प्रसंगांवर केलेले देखावे पाहताना भाविकांची पावले मंडळासमोर थांबतात. भारतीय संस्कृती, मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासातून प्रत्येकाला ऊर्जा देण्याचा प्रयत्न यातून केला आहे.

धार्मिक देखाव्यांवर भर
शनिवार वीर मारुती मंडळाने १३० व्या वर्षी श्री स्वामी समर्थांच्या अक्कलकोट येथील मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. त्यातील साधेपणा हेच याचे आकर्षण ठरले आहे. स्वामींपुढे मनःपूर्वक डोकं टेकवून भाविक पुढे सरकतात. त्यानंतर मुठेश्वर मंडळाने सद्‍गुरू योगीराज शंकर महाराज यांची भव्य मुर्ती केली आहे. त्यांचा आशीर्वाद घेऊन भाविकांची पावले माती गणपतीच्या दिशेने वळतात. तेथे पानखिंडीचा सजीव देखावा मंडळाने केला आहे.


सेल्फी विथ बाप्पा
भव्य आणि आकर्षक देखाव्याची परंपरा असलेल्या नारायण पेठेतील गजानन मंडळाने शिश महल उभारला आहे. त्याच्या समोर उभे राहून ‘सेल्फी विथ बाप्पा’, फेसबुक लाइव्ह तसेच, ‘स्टेटस्’ ठेवण्याकडे गणेश भक्तांचा कल दिसत होता. तसेच, विविध मंडळांच्या देखाव्यांचे व्हिडिओ काढण्यासाठी मोबाईल उंचावले जात होते. सदाशिव पेठेतील नवजवान मित्र मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील ‘काळजात लागल्या शौर्याच्या स्मृती, उजळल्या शिवज्योती’ हा प्रभावी देखावा पाहण्यासाठी गणेश भक्त गर्दी करत आहेत. हे मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे.

पौराणिक देखाव्यांवर भर
नारायण पेठेतील नवजीत तरुण मंडळाने केलेला गंगावतरण देखावा आबालवृद्धांचे लक्ष वेधत आहे. शंकराच्या जटेतून अवतरणारी गंगा पाहण्यासाठी लोकांची गर्दी होताना दिसते. मुंजोबाचा बोळ तरुण मंडळाने कालिका मातेने रक्तदीब राक्षसाचा केलेला वध, माणिकप्रभु मित्र मंडळ आणि इच्छापूर्ती गणेश मंडळांनी साकारलेला हनुमानाचा अशोक वनात प्रवेश, संयुक्त मित्र मंडळाने श्रीकृष्णाचे विराट रुप असे विविध पौराणिक देखावे भाविकांनी आकर्षित करत आहेत.

आवर्जून पहावे असे देखावे
छत्रपती राजाराम मंडळ, सदाशिव पेठ : तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती
हत्ती गणपती, सदाशिव पेठ : श्रीकृष्णाची रासलीला
निंबाळकर तालीम मंडळ, सदाशिव पेठ : राम, लक्ष्मण यांची नागपाश मुक्ती
ग्राहक पेठ सेवक गणेशोत्सव, सदाशिव पेठ : पारले गणेश मंदिर
नागनाथ पार मंडळ, सदाशिव पेठ : गणेश भक्ती
भोलेनाथ मित्र मंडळ, नारायण पेठ : भक्ती गणेश महाल
गरुड गणपती, नारायण पेठ : गरुड महाल
गजानन मंडळ, नारायण पेठ : शिश महाल

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d96983 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..