वर्ष संपेपर्यंत कुलगुरू मिळण्याची चिन्हे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वर्ष संपेपर्यंत कुलगुरू मिळण्याची चिन्हे
वर्ष संपेपर्यंत कुलगुरू मिळण्याची चिन्हे

वर्ष संपेपर्यंत कुलगुरू मिळण्याची चिन्हे

sakal_logo
By

मीनाक्षी गुरव : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ६ : राज्यात सत्तापालटानंतर आता विद्यापीठांच्या कुलगुरू निवड प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे. कुलगुरूंची निवड ही जुन्या सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसारच होईल, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. तर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘कुलगुरूंच्या निवडीची प्रक्रिया लवकरच सुरू करणार असून येत्या दोन महिन्यांत या नियुक्ती होईल,’ असा सूतोवाच केला. त्यामुळे राज्यातील विद्यापीठांना वर्ष संपताना नवे कुलगुरू मिळण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडी सरकारने यापूर्वी नव्या कायद्यानुसार कुलगुरूंची निवड प्रक्रिया करण्याचा आग्रह धरला. मात्र, राज्यपाल कोश्यारी यांनी विधेयकावर स्वाक्षरी न केल्याने ही प्रक्रिया सुरूच होऊ शकली नाही. त्यानंतर नव्या सरकारने जुन्या विद्यापीठ कायद्यानुसारच कुलगुरूंची निवड होणार असल्याचे स्पष्ट केले.

मविआ सरकारच्या काळात २०१६ च्या विद्यापीठ कायद्यात बदल करण्यात आला होता. या बदलानुसार कुलगुरूंच्या निवड समितीने पाचऐवजी दोनच नावे कुलपतींकडे पाठविण्याचे बंधन घालण्यात आले. शिवाय उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांना कुलपतींप्रमाणे अधिकार दिले. मविआ सरकारने हा नवा कायदा मंजूर करून घेतला, परंतु राज्यपालांनी सुधारणा विधेयकावर स्वाक्षरी न केल्याने विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले नाही.

कुलगुरूंच्या प्रतीक्षेतील विद्यापीठे
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : सध्या लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्याकडे पुणे विद्यापीठाचा प्रभारी कुलगुरू पदाचा कार्यभार आहे. कुलगुरू निवड समितीसाठी विद्यापीठाने दोन नावे राज्यपालांना पाठवली आहेत.
- मुंबई विद्यापीठ : सध्याचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांचा कार्यकाळ ८ सप्टेंबरला संपत आहे. विद्यापीठाने कुलगुरू निवड समितीतील सदस्यांची नावे मान्यतेसाठी पाठवली आहेत.
- वायसीएमओयू, नाशिक : विद्यापीठाचे यापूर्वीच्या कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांचा कार्यकाळ ७ मार्चला संपला. त्यानंतर राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्याकडे विद्यापीठाचा प्रभारी कुलगुरूपदाचा कार्यभार सोपविण्यात आला, परंतु या विद्यापीठात मागील आठवड्यात कुलगुरूंच्या निवड/शोध समितीसाठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया जाहीर केली.

कुलगुरू निवड समिती स्थापन करणे, अर्जांसाठी जाहिरात प्रसिद्ध करणे, त्यानंतर मुलाखतीचा कालावधी ठरविणे, या संपूर्ण प्रक्रियेला कमीत कमी तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे माननीय कुलपती महोद्यांनी या प्रक्रियेला गती देऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा विचार करून लवकरात लवकर कुलगुरूंची निवड करावी.
- डॉ. अरुण अडसूळ, माजी कुलगुरू

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d97319 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..