गणपती विसर्जनात असुविधांचे विघ्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणपती विसर्जनात असुविधांचे विघ्न
गणपती विसर्जनात असुविधांचे विघ्न

गणपती विसर्जनात असुविधांचे विघ्न

sakal_logo
By

पुणे, ता. ५ ः नदीत विसर्जन करण्यास घातलेली बंदी, नदी पात्रात उपलब्ध नसलेले हौद अशा स्थितीत गणपतीला निरोप देण्यासाठी पेठांमधील नागरिक नदीकाठी विसर्जनासाठी गर्दी केली. मात्र, घाटावर सुविधा नसल्याने मोठा गोंधळ उडाला. नागरिकांनी प्रशासनाला जाब विचारल्यानंतर फिरते हौद उपलब्ध करून देण्यासाठी अधिकाऱ्यांनी धावपळ केली.

गणेशोत्सवात आज सहाव्या दिवशी गौरीसह गणपती विसर्जन करण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया...’ ‘पुढच्या वर्षी लवकर या...’ अशा घोषणा देत उत्साहात नागरिक घाटावर आले. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्यात गणेश विसर्जन करू नये असे आवाहन पालिकेने केले आहे. नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये यासाठी सर्व घाटांना बांबू लावून रस्ता बंद केले आहे. त्यात भिडे पूल, वृद्धेश्वर, सिद्धेश्वर घटांवरील कृत्रिम विसर्जन हौद माती टाकून बंद केले आहेत.

भिडे पूल येथे नारायण पेठ, सदाशिव पेठ, शनिवार पेठ यासह इतर भागातून नागरिक विसर्जनासाठी गेले, मात्र, त्यावेळी तेथील हौद बंद असल्याचे निदर्शनास आले. संतापलेल्या नागरिकांनी तेथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना जाब विचारल्यानंतर त्यांनी दुसऱ्या फिरत्या हौदाची व्यवस्था केली. तोपर्यंत येथे १००-१५० भाविक हातात मूर्ती घेऊन विसर्जनासाठी वाट पाहात उभे होते. अशीच स्थिती इतर घटांवरही निर्माण झाली होती. यावरून पालिका विसर्जनावर कोट्यावधी रुपये खर्च करत असली तरी त्याचा नागरिकांना उपयोग होत नसल्याचे समोर आले आहे.

कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त आशिष महाडदळकर म्हणाले, ‘‘हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे धरणातून पाणी सोडले तर महापालिकेने केलेली सर्व उपाययोजना वाया जाईल. त्यामुळे आम्ही हौद सुरू केले नाहीत. पण क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ३८ ठिकाणी लोखंडी हौद व ९ फिरते हौद उपलब्ध करून दिले आहेत. विसर्जन टाक्या कुठे आहेत, याची माहिती देणारे फ्लेक्स २२ ठिकाणी लावले आहेत.’’

आम्ही नदीपात्रातील हौदामध्ये वर्षानुवर्षे विसर्जन करत आहोत, पण यंदा नदीपात्रातील हौद बंद आहेत हे महापालिकेने कधीही जाहीर केले नाही. त्यामुळे आम्ही भिडे पूल येथे गेलो. तेथे एकच फिरता हौद होता, त्याचीही क्षमता संपल्याने अनेक नागरिक ताटकळत उभे होते. आरडाओरडा केल्यानंतर दुसरी गाडी पाठविण्यात आली. महापालिकेने किमान यापुढे तरी विसर्जनातील गोंधळ टाळला पाहिजे.
- सचिन गोडबोले, कुठमेकर रस्ता

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d97491 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..