विसर्जन मिरवणुकीची तयारी अंतिम टप्प्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विसर्जन मिरवणुकीची तयारी अंतिम टप्प्यात
विसर्जन मिरवणुकीची तयारी अंतिम टप्प्यात

विसर्जन मिरवणुकीची तयारी अंतिम टप्प्यात

sakal_logo
By

पुणे, ता. ७ ः पुण्यातील वैभवशाली गणेशोत्सवाचा मानबिंदू असलेल्या विसर्जन मिरवणुकीची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. शुक्रवारी (ता. ७) अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या गणरायाला जंगी मिरवणुकीद्वारे भावपूर्ण निरोप देण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळे सज्ज झाली आहेत. नेहमीप्रमाणेच नावीन्यपूर्ण कल्पनांनी सजवलेले भव्य रथ, ढोल-ताशा पथके ही यंदाच्या मिरवणुकीचे आकर्षण असणार आहे.

१) कसबा गणपती मंडळ ः
मानाचा पहिला गणपती असलेल्या ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंडळाच्या मिरवणुकीमध्ये चांदीच्या पालखीमध्ये गणरायाची मूर्ती विराजमान होणार आहे. विशेष म्हणजे मंडळाचे कार्यकर्ते खांद्यावरून पालखी नेणार आहेत. मिरवणुकीत नगारखाना, आर्ट ऑफ लिव्हिंग, प्रभात बँड, कामायनी प्रशाला, बँक ऑफ इंडिया आणि रोटरी क्लबची पथके असतील. तर, रमणबाग, रुद्रगर्जना आणि कलावंत ही तीन ढोल-ताशा पथके वादन करणार आहेत.
----------
२) तांबडी जोगेश्वरी मंडळ ः
मानाच्या दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या मिरवणुकीच्या अग्रभागी सतीश आढाव यांचा नगारावादनाचा गाडा आणि न्यू गंधर्व बँडपथक असेल. समर्थ प्रतिष्ठान, शिवमुद्रा आणि ताल ही ढोल-ताशा पथके तसेच विष्णूनाद हे शंखवादकांचे पथक, पारंपरिक पेहरावातील अश्वारूढ कार्यकर्ते मिरवणुकीमध्ये असतील. चांदीच्या पालखीमध्ये विराजमान गणरायाची मूर्ती कार्यकर्ते वाहून नेणार आहेत.
----------
३) गुरुजी तालीम मंडळ ः
सरपाले बंधू यांनी साकारलेल्या भक्तीरथातून मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम मंडळाच्या गणपतीची मिरवणूक निघणार आहे. या रथावर फुलांच्या सजावटीसह विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांची प्रतिकृती असणार आहे. मिरवणुकीच्या अग्रभागी जयंत नगरकर यांचा नगारावादनाचा गाडा असेल. गर्जना आणि नादब्रह्म, अशी दोन ढोल-ताशा पथके सहभागी होणार आहेत.
----------
४) तुळशीबाग मंडळ ः
मानाचा चौथा गणपती असलेल्या तुळशीबाग गणपतीची फुलांच्या आकर्षक सजावटीने साकारलेला श्री गजमुख रथामध्ये मिरवणूक निघेल. लोणकर बंधूंचा सनई आणि नगारावादन अग्रभागी असेल. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त साकारलेला विशेष रथ त्यामागे असेल. स्व-रूपवर्धिनी, गजलक्ष्मी आणि गजर ही तीन ढोल-ताशा पथके असतील.
----------
५) केसरीवाडा गणपती ः
केसरीवाडा गणपती या मानाच्या पाचव्या गणपतीची मूर्ती फुलांनी सजविलेल्या मेघडंबरी रथामध्ये मूर्ती विराजमान होणार आहे. विसर्जन मिरवणुकीत बिडवे बंधू यांचा नगारावादनाचा गाडा असेल. श्रीराम, शिवमुद्रा, वज्र या ढोल-ताशा पथकांचे वादन होणार आहे.
-----------
६) भाऊ रंगारी ट्रस्ट ः
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची मूर्ती रथामध्ये विराजमान होणार आहे. श्रीराम, नादब्रम्ह, सर्ववादक, समर्थ प्रतिष्ठान ही ढोल-ताशा पथके मिरवणुकीत वादन करणार असून शंख वादन, तसेच मर्दानी खेळ होणार आहेत.

-----------
७) अखिल मंडई मंडळ ः
अमोघ त्रिशक्ती नाग रथातून अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाची विसर्जन मिरवणूक निघेल. विशाल ताजणेकर यांनी रथाचे कलादिग्दर्शन केले असून विविधरंगी प्रकाशझोतामध्ये रथ उजळून निघेल. मिरवणुकीमध्ये जयंत नगरकर यांचा सनई-चौघडाचा गाडा, गंधर्व बँड तसेच शिवगर्जना वाद्य पथकासह दोन ढोल-ताशा पथके सहभागी होतील.
------------
८) श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ः
श्री स्वानंददेश रथातून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक निघणार आहे. एलईडी व मोत्याच्या रंगाच्या दिव्यामध्ये हा रथ साकारण्यात आला आहे. मिरवणुकीत पुण्यातील महत्त्वाच्या
ठिकाणांची छायाचित्रे असलेला आणि स्वच्छतेचा संदेश देणारा ‘जय गणेश स्वच्छता अभियान रथ’ असणार आहे. अग्रभागी देवळणकर बंधू यांचा नगारा, प्रमोद गायकवाड यांचे सनईवादन असेल. स्व-रूपवर्धिनी संस्थेचे पथक, दरबार व प्रभात ही बँडपथके आणि केरळचे चंडा या पारंपरिक वाद्यवादकांचा चमू मिरवणुकीमध्ये असेल.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d98192 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..