पुणे अडकले वाहतूक कोंडीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे अडकले वाहतूक कोंडीत
पुणे अडकले वाहतूक कोंडीत

पुणे अडकले वाहतूक कोंडीत

sakal_logo
By

पुणे, ता. ७ : गणेशोत्सवाच्या मंडपांनी अरुंद झालेले रस्ते, अरुंद रस्त्यांवर वाहनांच्या रांगा, वाट पाहून कर्कश हॉर्न वाजवणारे वाहनचालक, जीव मुठीत घेऊन रस्ता शोधणारे पादचारी आणि आभाळातून दणादण कोसळणारा पाऊस असे त्रासदायक वातावरण बुधवारी दिवसभर पुणेकरांनी; विशेषतः मध्य पुण्यात अनुभवले. या वातावरणात भर घातली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणेशोत्सव मंडळांना भेटीच्या दौऱ्याने. दौऱ्याची अतिच खबरदारी पुणे वाहतूक पोलिसांनी घेतली; मात्र सर्वसामान्य नागरीकांना किती कोंडीला सामोरे जावे लागेल, याचा विचार नियोजनात केला नाही. परिणामी, मध्य पुण्यातील पेठांमध्ये ऐन गणेशोत्सवात वाहतूक कोंडीचा जिवंत देखावा पाहायला मिळाला.

नियोजित वेळापत्रकानुसार मुख्यमंत्री बारा मंडळांच्या श्री गणेशाचे दर्शन घेणार होते. त्यापैकी दहा मंडळे मध्य पुण्यातील होती. दिवसभर पावसाचा इशाराही हवामान खात्याने दिला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन म्हणून दौऱ्याच्या मार्गावरील वाहतूक बॅरिकेड लावून बंद केली. त्याचा फटका सकाळपासून पुणेकरांना बसला. बाजीराव रोडवरच्या बॅरिकेडिंगमुळे स्वारगेटकडून आलेल्या वाहनांना सकाळपासूनच टिळक रोड अथवा सुभाष नगरमार्गे मार्ग पेठांमधून रस्ते शोधावे लागले. त्यातून सदाशिव पेठ, नारायण पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठेत सकाळपासून वाहतूक कोंडी सुरू झाली. मुख्यमंत्र्यांचे विमानतळावर साडेबारा वाजता आगमन झाले व ते दीड वाजता कसबा गणपती येथे पोचले होते. सुमारे दोन तास ते शहराच्या मध्यवस्तीत होते. तथापि, सकाळी नऊपासून सुरू झालेली वाहतूक कोंडी रात्री आठ वाजेपर्यंत कायम होती.

म्हणून रस्ते लवकरच बंद केले
मुख्यमंत्र्यांच्या नियोजित दौऱ्यानुसार ते सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी पुणे विमानतळावर उतरणार होते. मात्र ते ११ च्या सुमारास पुण्यात येतील असे वाहतूक विभागाला मंगळवारी (ता. ६) रात्री कळविण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. ठरलेल्या वेळेपेक्षा मुख्यमंत्री लवकर येणार असल्याचे समजल्याने पोलिसांनी देखील ठरलेल्या वेळेच्या आधीच रस्ते बंद करून टाकले. मात्र मुख्यमंत्र्यांना येण्यास उशीर झाला व ते साडेबाराला पुण्यात उतरले. त्यांना उशीर होणार असल्याची माहिती पोलिसांकडे आली होती. मात्र बंद केलेले रस्ते पुन्हा काही वेळेसाठी खुले केले मोठी कोंडी होऊन मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला वाहतुकीचा अडथळा निर्माण होवू शकतो. ही शक्यता विचारून घेऊन पोलिसांनी लवकर बंद केलेले रस्ते मुख्यमंत्र्यांचे गणेश दर्शन झाल्यानंतरच खुले केले. त्यामुळे मुख्यमंत्र्याने घातलेल्या वेळेच्या घोळामुळे पुणेकरांना नाहक वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला.

या चौकांत झाली होती मोठी कोंडी
लक्ष्मी रस्त्यावर रामेश्‍वर चौक, उंबऱ्या मारुती चौक, कुंटे चौक. केळकर रस्त्यावर केळकर चौक, रमणबाग चौक, लोखंडे तालीम, पत्र्या मारुती चौक. तर कुमठेकर रस्त्यावर फडतरे चौक, तथास्तु दुकानाजवळचा चौक आणि जोंधळे चौकात सकाळी नऊपासून संध्याकाळपर्यंत कोंडी होती.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d98216 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..